आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत अफलातून पुस्तकाचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुकर धर्मापुरीकर हे नाव जसं कथालेखनासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते त्यांच्याकडच्या व्यंगचित्रांच्या प्रचंड संग्रहासाठीदेखील प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडचा देशी आणि विदेशी व्यंगचित्रांचा संग्रह इतका मोठा आहे की, तो त्यांच्या जगण्याचा भागच झालेला आहे. आपल्या दैनंदिन जगण्याची व्यंगचित्रांशी सांगड घालत त्यांनी काही ललित लेख लिहिले आहेत. अशा लेखनाचा संग्रह म्हणजे ‘आलटून पालटून’ हे वाचनीय व रंजक पुस्तक आहे. 

 

म राठीतले एक महत्त्वाचे कथालेखक मधुकर धर्मापुरीकर हे कथालेखनाशिवाय माहीत आहेत ते त्यांच्या आगळ्यावेगळ्या छंदिष्ट प्रकृतीमुळे. यांची ही झपाटलेली छंदिष्ट वृत्ती जशी कथालेखनात दिसते, तशीच कथांच्या संपादनात दिसते. आणि उर्दू शायरी, व्यंगचित्रांच्या विषयातही दिसते. धर्मापुरीकरांकडे देशी आणि विदेशी व्यंगचित्रांचा प्रचंड संग्रह आहे, आणि एवढा संग्रह राज्यात क्वचितच कुणाकडे असेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आवडलेल्या गोष्टीवर भरभरून लिहिणे - तेही खास अशा शैलीत - ही त्यांची खासियत आहे. व्यंगचित्रकलेवर एवढं लेखन करणारेही   लेखक विरळाच असावेत. व्यंगचित्रांच्या आस्वादाच्या निमित्ताने आजवर त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके त्याची साक्ष देतील : व्यंगचित्रं : एक संवाद (सहलेखक-वसंत सरवटे), हसऱ्या रेषेतून हसविण्याच्या पलीकडले, रेषालेखक : वसंत सरवटे (सहसंपादक-दिलीप माजगावकर), अनकॉमन मॅन - आर.के. लक्ष्मण असे त्यांचे संग्रह प्रसिद्ध झाले असून या लेखनाला शासनाने दोन वेळा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे. सध्या इयत्ता नववीच्या ‘कुमारभारती’ या पुस्तकात मधुकर धर्मापुरीकर यांचा ‘हास्यचित्रांतील मुलं’ हा पाठ घेण्यात आला असून त्या निमित्ताने मराठी आभ्यसक्रमात पहिल्यांदाच व्यंगचित्रांचा समावेश झाला आहे.


आता याच मालिकेतले धर्मापुरीकरांचे आणखी आगळेवेगळे पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाले आहे - आलटून पालटून! या पुस्तकाला, दृष्यमाध्यमाचा सखोल आभ्यास असणारे दीपक घारे यांची प्रस्तावना आहे. दैनंदिन अनुभवांच्या अनुषंगाने केलेले हे ललित लेखन आहे; मात्र त्याला निमित्त ठरलेले आहे ते सुरेख व्यंगचित्रांचे.


प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे व्यंगचित्रं ही धर्मापुरीकरांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. आपल्याला एखाद्या प्रसंगाच्या निमित्ताने गाणे आठवते. एखादी कथा-कविता आठवून जाते आणि त्यामुळे ते गाणे-कथा-कविता प्रत्ययकारी होते. वेगळ्या तऱ्हेचा अनुभव येतो. इथे धर्मापुरीकरांना दैनंदिन प्रसंगांच्या निमित्ताने आठवतात ती त्यांच्या संग्रहातली व्यंगचित्रे. आणि त्या व्यंगचित्रांची सांगड आपल्या अनुभवाशी ताडून पाहताना त्याचा सुरेख असा ललित लेख होतो. मुलाच्या लग्नाची पत्रिका करताना त्यांना सेम्पेचे अफलातून व्यंगचित्र आठवते आणि ते व्यंगचित्र पत्रिकेवर छापताना काय धांदल होते, हे ते शब्दांत मांडतात. कधी एखादे चित्र त्यांना एवढे आवडून जाते की, त्यावर एक सुरेख असा लेख तयार होतो. अशा लेखनाचा संग्रह म्हणजे ‘आलटून पालटून’ हे पुस्तक आहे. 


व्यंगचित्रांवरील लेखनाशिवाय धर्मापुरीकरांना व्यंगचित्रांच्या आस्वादावर आधारित स्लाइड शो घेण्याचाही छंद आहे. एकदा नांदेडच्या जिल्हा कारागृहात चक्क कैद्यांना त्यांनी स्लाइड शो दाखविला आणि त्या रोमहर्षक अनुभवावर आधारित ‘भिंतीची उंची’ हा मजेदार लेख तयार झाला. हा संग्रह आपल्या पत्नीला अर्पण करताना धर्मापुरीकरांनी एका मजेदार अशा फ्रेंच व्यंगचित्राचा वापर करून औचित्य साधले आहे. लेखासोबत व्यंगचित्र असून त्याशिवाय या संग्रहात वेगवेगळ्या देशातली विविध व्यंगचित्रे पूरक चित्रे म्हणून घेण्यात आलेली असल्याने हा संग्रह अपूर्व असा आनंद देणारा झालेला आहे. 


ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या एका हास्यचित्राचे मुखपृष्ठ घेऊन त्याची छान मांडणी केली आहे रविमुकुल यांनी. १७६ पृष्ठांच्या या पुस्तकात एकूण ९० व्यंगचित्रे आहेत आणि या व्यंगचित्रांची देखणी मांडणी केली आहे चित्रकार गिरीश सहस्त्रबुध्दे यांनी. 
व्यंगचित्रं किती गंभीर आणि मानवी जीवनाच्या सखोल अशा विसंगतीला स्पर्श करतात हे या संग्रहातील व्यंगचित्रांतून जाणवत राहते. आणखी जाणवत राहते, ते म्हणजे, व्यंगचित्रं ही केवळ हसण्यापुरती मर्यादित नसून ती अनुभवाचा भाग असू शकतात - लेखनाला निमित्त ठरू शकतात. अर्थात हे सगळे लक्षात येते ते, मधुकर धर्मापुरीकर यांच्या खुमासदार निर्मळ अशा लेखन शैलीमुळे. 

बातम्या आणखी आहेत...