आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही स्नानाची परंपरा असलेल्या ऐतिहासिक बारवेचे श्रमदानातून पुनरुज्जीवन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - वाॅटर कपमध्ये सहभागी गावात जाऊन राेज सकाळी श्रमदान करण्याचे कार्य सिन्नरमधले व्यापारी तरुण गेल्या वर्षापासून करत हाेते. पाणीटंचाई भेडसावणाऱ्या सिन्नर शहरातील बंद पडलेले पाण्याचे स्रोत जिवंत केले तर टंचाई कमी  हाेईल, असा विचार ‘अनुलाेम’ या एनजीओचे प्रतिनिधी सत्यजित कळवणकर यांनी मांडला. सर्वांनीच ताे उचलून धरला. चालुक्यकाळापासूनचा इतिहास असलेल्या सिन्नरमध्ये १२०० वर्षांपूर्वीच्या यादवकालीन पाण्याच्या १२ बारवा (पायऱ्या असलेल्या दगडाने बांधलेल्या विहिरी) पिण्याच्या पाण्यासाठी उपयेगात हाेत्या. मात्र धारणकर गल्लीत नरसिंह मंदिर व राम मंदिराच्या कुशीतील कमळेश्वर बारवेत दगडमातीचा भलामाेठा बुरूज ढासळल्याने वीस वर्षांपूर्वी ती बुजून गेली. मधल्या काळात पाणीटंचाई नसल्याने लाेकांनी अर्धवट बुजलेल्या बारवेत बांधकाम साहित्य व कचरा टाकून तिचे अस्तित्वच बुजवून टाकले. मात्र आता टंचाईच्या काळात कळवणकर, डाॅ. महावीर खिंवसरा व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत श्रमदानातून ही बारव पुनरुज्जीवित केली.


कुंभपर्वात शाही स्नानाच्या मानावरून साधूंमध्ये मतभेद हाेते. त्यात श्रावण शुद्ध २ संवत १७५८ मध्ये न्यायालयाने रामकुंडात बैरागी आखाडा व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तात संन्यासी आखाडा स्नान करेल असा हुकूम दिल्याचा ताम्रमट आहे. त्यात सिन्नर, पालखेड, राजापूर, दिंडाेरी, खेडगाव, सुकेणे, कपिलधारा, पिंपळनारा, बखरीपाला अशी बैरागी चाैक्यांची नावे दिली आहेत. कुंभस्नानासाठी येताना पूर्वी साधू हत्ती, घाेड्यावरून तसेच पायी प्रवास करत. नाशिकच्या आधी त्यांचा  मुक्काम सिन्नरच्या या स्थळी असे. तेव्हा साधुगण या बारवेत स्नान करत. मात्र कालांतराने  दळणवळणाची साधने झाल्यामुळे साधू थेट नाशिकला जाऊ लागले, त्यामुळे येथील विसावा टळला. तसेच बारव बुजल्याने येथील स्नानही बंद झाले. मात्र आता येत्या कुंभमेळ्यापासून त्याची पुन्हा सुरुवात करण्याचा संकल्प दिगंबर आखाड्याचे महंत भक्तिदासजी महाराज यांनी पुनर्जिवित बारवेतील पाण्याचे पूजन करताना व्यक्त केला. पुरातन राम मंदिराच्या जीर्णाेद्धारासाठी ते प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती मंदिराचे पुजारी दुर्गादास बैरागी यांनी दिली. या बारवेला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

 

१५७ ट्रॅक्टर मलबा काढला, आता जमा झाला १ लाख लिटर पाणीसाठा
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तरुणांनी बारव स्वच्छतेचा श्रीगणेशा केला. दर रविवारी श्रमदानासाठी लाेक येऊ लागले. व्यापारी, डाॅक्टर, वकील, आर्किटेक्ट, शिक्षक अशी मंडळीही काम करू लागली. राेज ३ ते ४ ट्रॅक्टर भरून मलबा बारवेतून बाहेर काढला जाई. ३७ दिवसांनी बारवेच्या तळापर्यंत खाेदकाम हाेताच बंद पडलेले पाण्याचे झरे वाहू लागले. तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. ४७ दिवसांत जमीन पातळीपासून ४५ फूट खाेल व बारवेच्या पायऱ्यांपासून १७ फूट खाेल खाेदकाम झाले. १५७ ट्रॅक्टर मलबा उपसण्यात आला. पाऊस नसतानाही या बारवेत लगेच १ लाख लिटर पाण्याचा साठा झाला. त्याचे जलपूजन करण्यात आले. आता सिन्नर परिसरात वृक्षाराेपण करण्याचा, त्यासाठी बारवेचे पाणी वापरण्याचा संकल्प सर्वांनी केला. 
 

बातम्या आणखी आहेत...