आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • RFO Person Get Arrested To Taking A Bribe Of Rs.10,000

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरएफओ'सह निवृत्त कर्मचाऱ्याला दहा हजारांची लाच घेताना पकडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- लाकडाच्या वाहतुकीच्या परवानगीसाठी दहा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या अकोला वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) व त्यासाठी काम करणारा खासगी व्यक्ती यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. एसीबीने त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली आहे. 

 

अकोट येथील ४६ वर्षीय तक्रारदार हे लाकडाचे ठेकेदार आहेत. त्यांनी अकोट वनपरिक्षेत्रात नियमानुसार सागवानची ११९ झाडे तोडली होती. या तोडलेल्या लाकडांच्या वाहतुकीसाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. ही परवानगी मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी आरएफओ राजेंद्र शेषराव कातखेडे (४९, वन परिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, वर्ग २, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक, सिंधी कॅम्प) यांच्याशी संपर्क साधला असता नियमानुसार परवान्यासाठीच त्याने १० हजार लाचेची मागणी केली. 

 

मात्र आरएफओचे नेहमीचेच असल्याने, सर्व कायदेशीर असल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने १ जानेवारीला पडताळणी केली. यात आरएफओ राजेंद्र कातखेडेने लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार २ जानेवारीला एसीबीने पंचासमक्ष सिंधी कॅम्प येथील वन विभागात सापळा लावला. या सापळ्यात आरएफओ कातखेडे याचा साथीदार व त्यांचे खासगी काम करणारा काशीराम तुळशीराम मनवर ( वय ६४,वनमजूर म्हणून सेवा निवृत्त) याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये लाच स्वीकारली व ती रक्कम कातखेडे याला दिली. 

 

लाचेची रक्कम कातखेडे याला दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजय गोर्ले, पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल सुनील राऊत, संतोष दहीहंडे, राहुल इंगळे, नीलेश शेंगोकर, सचिन धात्रक, प्रवीण कश्यप यांनी केली. 

 

दुसऱ्या आरोपीने पुन्हा मागितले होते हजार रुपये 
कातखेडेचा सहकारी काशीराम तुळशीराम मनवर याने साहेबांसाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर आणि ती साहेबांना दिल्यानंतर तक्रारदाराकडून पुन्हा हजार रुपये स्वत:साठी मागितले होते. मात्र दोघांना एसीबीने शिताफीने पकडले. त्यांच्याकडून १० हजारांची लाचेची रक्कम जप्त केली.