आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचकहून जळगावात अंत्यविधीसाठी येणाऱ्या रिक्षाला ट्रकची धडक; 1 ठार, 11 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नातेवाईक महिलेच्या अंत्यविधीसाठी पंचक (ता.चोपडा) येथून जळगावात येत असलेल्या महिलेच्या रिक्षाला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजता विदगाव-कोळन्हावी दरम्यान घडली. या अपघातात दुर्गाबाई पोपट चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला. तर १ पुरुष, ११ महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी अाणण्यात अाले हाेते. या वेळी जखमींना वेळवर उपचार न मिळाल्यामुळे नातेवाइकांनी प्रचंड संताप व्यक्त केल्याने रुग्णालयात काहीवेळ गाेंधळ उडाला हाेता.


जुने जळगाव परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगरात राहणाऱ्या पुंडाबाई सोनवणे यांचे बुधवारी निधन झाले. पुंडाबाई यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचक (ता.चोपडा) येथील नातेवाईक एकत्रितपणे रिक्षाने जळगावात येत होते. दुपारी ३ वाजता विदगाव-कोळन्हावी दरम्यान, समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दोन वेळा कलंडून थेट रस्त्याच्या कडेला गेली. रिक्षामध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे ते एकमेकांवर आदळून चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे सर्वच प्रवाशांना दुखापत झाली.या अपघातानंतर पंचक्रोशीतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना एक रिक्षा व तीन रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. या वेळी जखमीवर उपचारासाठी बराचवेळ नातेवाईकांना धावपळ करावी लागली. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुर्गाबाई पोपट चव्हाण (वय ६५) यांचा रात्री ८.१५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसांनी रात्रीच दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णायात रात्री उशीरापर्यंत गर्दी हाेती.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जखमींना अाणण्यात अाले त्यावेळी झालेली नातेवाईकांची गर्दी.


सुमारे अर्धा तास जखमी विव्हळत
एकाचवेळी १३ जखमी रुग्णालयात अाल्यामुळे डॉक्टरांची भंबेरी उडाली. यातच जखमींसोबत असलेल्या नातेवाइकांनी देखील प्रचंड गर्दी केल्यामुळे उपचारात अनेक अडचणी येत होत्या. दरम्यान, रुग्णालयात ऐनवेळी स्ट्रेचर, डॉक्टर व मदतनीस उपलब्ध न झाल्यामुळे जखमींवर वेळेवर उपचार झाले नाही. सुमारे अर्धा तास जखमी विव्हळत राहिले. यानंतर एक डॉक्टर व काही मदतनिसांनी उपचारास सुरुवात केली. स्ट्रेचर नसल्यामुळे एका वॉर्डातून दुसऱ्या ठिकाणी हलवताना रुग्णांना स्वत:च पायी चालत जावे लागले. या गंभीर प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.


अपघातात अनेकांना बसला मुक्का मार
अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. तर इतर जखमी महिलांना मात्र, मुक्का मार लागला आहे. त्यामुळे त्यांना उभेदेखील राहता येत नव्हते. कमरेत मार लागल्यामुळे दोन्ही महिलांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढताना कसरत करावी लागली. जखमींना हालचाल करता येत नसल्यामुळे त्यांना प्रचंड त्रास झाला. या वेळी रुग्णालयातील इतर रुग्ण व नातेवाइकांची गर्दी झाली होती. अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न केले. प्रत्येक व्यक्ती धावपळ करून जखमींना अाधार देऊन उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात घेऊन जात हाेता. 

बातम्या आणखी आहेत...