आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळाच्या ‘स्टाॅर्म सर्ज’कडे दुर्लक्ष केल्यास राेगराई, दूषित पाण्याचे संकट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -   चक्रीवादळे समुद्रात निर्माण होतात आणि जेव्हा कुठल्याही किनारी भागावर धडकतात तेव्हा होणारी संभाव्य अतिवृष्टी आणि वादळी वारे यांच्यावरच लक्ष केंद्रित केले जाते. मात्र चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या ‘स्टॉर्म सर्ज’मुळे सर्वाधिक नुकसान होते याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. परिणामी चक्रीवादळाचा जोर ओसरताच किनारपट्टीलगतच्या भागात प्रचंड प्रमाणात रोगराई, पाणी दूषित होणे, शेतजमिनीचे क्षारीकरण आणि जीवितहानी यांचे आकडे वाढतात. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी स्टॉर्म सर्जकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला हवामानशास्त्रज्ञांनी दिला आहे.   


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गज’ चक्रीवादळ गुरुवारी सकाळी हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीला धडकणार आहे. या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन आणि निवारण यंत्रणांनी स्टॉर्म सर्जमुळे होणाऱ्या नुकसानीची संभाव्यता जाणून दक्ष राहिले पाहिजे, असे मत वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी मांडले.   ते म्हणाले,‘स्टॉर्म सर्जचा सरळ अर्थ असा की, समुद्राचे पाणी उसळून जमिनीवर येणे आणि साठून राहणे, असा आहे. मात्र हे पाणी म्हणजे समुद्राची नियमित भरती नव्हे. भरती-ओहोटीचे चक्र ठरावीक असते आणि भरतीचे पाणी किती चढते याची किनाऱ्यावरील वस्त्यांना नेमकी कल्पना असते. त्यामुळे भरती रेषेच्या बाहेरच ते वस्ती करतात.

 

मात्र स्टॉर्म सर्जमुळे समुद्राचे पाणी अनियमित आणि अनपेक्षितरीत्या उसळते आणि त्याची आधी कल्पना करता येत नाही. तीन फुटांपासून ते कितीही उंच, असे पाणी स्टॉर्म सर्जमुळे उसळू शकते. तो चक्रीवादळाचा परिणाम असल्याने पाण्याच्या या उसळण्याला प्रचंड वेग आणि सामर्थ्य असते. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यांची कल्पना आपल्याला विकसित यंत्रणा आता देऊ शकतात, परंतु स्टॉर्म सर्जचा असा नेमका अंदाज देता येत नसल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी या घटकावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’  


आयएमडीचे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर म्हणाले,‘स्टॉर्म सर्जचे वैशिष्ट्य म्हणजे यातून उसळणारे समुद्राचे पाणी पुन्हा समुद्रात परत जात नाही. एरवी भरती कितीही मोठी असली तरी परतणारी लाट सर्व पाणी समुद्रात घेऊन जाते. तसे इथे घडत नाही. समुद्राचे अतिक्षारयुक्त पाणी जमिनीवर सरळ आक्रमण करते आणि जिथे पोहोचेल तिथे साचून राहते. बहुतेक ठिकाणी किनारी भाग सखलच असतो. त्यामुळे किनाऱ्यानजीकच्या वस्त्या, घरे, शेतजमीन, तलाव, पाण्याचे स्रोत, गुरेढोरे यांचे सर्वाधिक नुकसान स्टॉर्म सर्जमुळे होऊ शकते. शिवाय समुद्राचे पाणी साचून राहिल्याने परिसरात त्वरित रोगराई फैलावते. कॉलरा, मलेरिया, हिवतापाच्या साथी येतात. गुरेढोरे मेल्याने पाणीसाठे दूषित होतात. त्यातून रोगराई वाढत राहते. स्टॉर्म सर्जची तीव्रता नेमकी सांगता येत नसल्याने बहुतेक जीवितहानी स्टॉर्म सर्जमुळेच होते. तरीही आपल्या यंत्रणांनी या घटकाकडे अद्याप पुरेसे लक्ष दिलेले आढळत नाही.’ 

 

‘गज’ अरबी समुद्रातही घाेंगावणार; ओमानच्या दिशेने निघून जाईल

गज चक्रीवादळाची निर्मिती बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्राजवळ झाली आणि ते तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार हे स्पष्ट  झाले आहे. मात्र तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आदळल्यावर त्याची तीव्रता मंदावणार हेही वास्तव आहे. पण तिथेच हे वादळ संपणार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. तामिळनाडूमधून चक्रीवादळाचा प्रवास मंद वेगाने दुसऱ्या टोकाकडे होणार आहे. गज चक्रीवादळ तामिळनाडूला धडकून जमिनीवरचा प्रवास सुरू ठेवणार आहे. साधारण ४८ तासांनंतर ते दुसऱ्या टोकाकडे पोहोचून अरबी समुद्रात प्रवेशणार असल्याची माहिती हवामानशास्त्रज्ञांनी दिली. समुद्रावर असल्याने चक्रीवादळाला  मिळणारी ऊर्जा (कमी दाब, वारे) जमिनीवर आल्यावर कमी होणार असली तरी अरबी समुद्रात प्रवेश केल्यावर या मंदावलेल्या चक्रीवादळाला पुन्हा ऊर्जा (कमी दाब, वारे, बाष्प) मिळून अरबी समुद्रात पुन्हा ते शक्तिमान होणार आहे. मात्र त्याची दिशी समुद्राकडे असल्याने ते ओमानच्या दिशेने निघून जाईल, असा अंदाज अाहे.

 

गज चक्रीवादळाची वाटचाल   
गज चक्रीवादळ प्रतितास १० किमी वेगाने तामिळनाडूच्या किनाऱ्यावरील कुडलोर, नागपट्टणमदरम्यान गुरुवारी धडक देण्याची शक्यता अाहे. तामिळनाडूत हाय अलर्ट देण्यात आला आहे. कुंडलोरपाशी चक्रीवादळ धडकेल. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होईल असा अंदाज असून गुरुवारी पहाटे चक्रीवादळ तामिळनाडूचा किनारा पार करेल. जमिनीवर आल्यावर वादळाची तीव्रता मंदावेल. मात्र तामिळनाडू, आंध्रत  अनेक ठिकाणी अतिवृष्टी, मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज अाहे.

बातम्या आणखी आहेत...