आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपूर अभ्यास, संशोधनातून तयार झालेल्या कॉमिक्सलाही बसतो असहिष्णुतेचा फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद. अमर चित्रकथेचे कॉमिक्स तयार करण्यासाठी सखोल संशोधन आणि अभ्यासाची गरज असते. संबंधित कथेतील स्थान आणि व्यक्तिमत्त्वाशी संबंधित लोकांची भेट घेऊन त्यातील तथ्य तपासले जातात. कॉमिक्समधून एक शब्दही चुकीचा जाऊ नये, वाक्यांचा विपर्यास हाेऊ नये याची काळजी घेतली जाते. असे असतानाही कॉमिक्संना असहिष्णुतेचा फटका बसतो. एखादा गट, समूह एखादा शब्द, वाक्यावर आक्षेप घेत कॉमिक्सवर बंदी आणण्यास भाग पाडतो. हे दुर्दैवी असल्याची खंत अमर चित्रकथेच्या कार्यकारी संपादक रीना पुरी यांनी व्यक्त केली. 'दी अमर चित्रकथा स्टोरी' कार्यक्रमात अमर चित्रकथाच्या कार्यकारी संपादक रिना पुरी आणि ग्रुप आर्ट डायरेक्टर सॅव्हिओ मॅस्कारहन्स यांनी मते मांडली. दैनिक भास्करचे नॅशनल ब्रँड हेड विकास सिंग यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जीवनपट मांडणाऱ्या कॉमिक्सचे प्रकाशन करण्यात आले. रिना पुरी म्हणाल्या, एखाद्या कथेवरील कॉमिक्स तयार करण्यासाठी ६-७ महिने लागतात, तर एखाद्या चरित्रावरील कॉमिक्ससाठी किमान वर्ष जाते. ३-४ महिने अभ्यास आणि संशोधनात जातात. त्यानंतर स्क्रिप्ट लिहिली जाते. मग आर्टिस्ट ब्लॅक अँड व्हाइट स्केचेच काढतो. त्यात संपादकीय आणि आर्टिस्ट टीम मिळून रंग भरतात.

 

डोळे उघडे ठेवा, चित्रे साठवा 
कॉमिक्स तयार करण्याच्या पायऱ्या सांगताना रीना पुरी म्हणाल्या, डोळे उघडे ठेवा. सभोवतालची दृश्ये मनात साठवा. निवांत वेळी या चित्रांचा कॅलिडोस्कोप तयार करा. यातून आयडियाज मिळतात. काही वर्षांपूर्वी अमर चित्रकथेच्या मुंबई कार्यालयाला आग लागली होती. यात सर्व जुने कॉमिक्स जळून खाक झाले. रेकॉर्डसाठीही कॉमिक्स उरले नाही. टिंकलच्या नवीन अंकाची हस्तलिखिते, आर्टवर्क जळाले. पण अवघ्या १५ दिवसांत जळालेले काम पूर्ण करून टिंकलचा अंक बाजारात आणला. जुने अंक मिळवण्यासाठी वाचकांना आवाहन केले. काही महिन्यांत अंक जमा केले. 

बातम्या आणखी आहेत...