आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीचा उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाला! डीएमआयसीचे महाव्यवस्थापक पाटील यांची कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर आणि वाळूज एमआयडीसी येथे गेल्या काही महिन्यांत झालेल्या दंगलींचा उद्योग जगतावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या घटनांचा थेट स्वरूपात परिणाम सांगता येणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा त्याची होते. असे प्रकार होऊ नयेत यासाठी स्थानिक पातळीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सेल तयार करण्यात येणार आहे. त्यात पोलिस, स्थानिक स्वराज संस्था, लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांचा समावेश असेल. हा सेल सर्व व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेत राहील, अशी माहिती डीएमआयसीचे महाव्यवस्थापक गजानन पाटील यांनी दिली. 


डीएमआयसीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी ते शहरात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कुठलीही कंपनी येण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करते. त्यात प्रामुख्याने सरकार स्थिर आहे का? उद्योगासाठीची धोरणे दरवर्षी बदलत तर नाहीत ना? स्थानिक पातळीवर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती योग्य आहे ना? या बाबींचा कायम आढावा घेतला जातो. त्यामुळे अशा स्थानिक दंगली विशेषत: ती औद्योगिक परिसरात झाली असेल तर डिजिटल मीडियामुळे तिची आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होते. औरंगाबाद एक विकासोन्मुख औद्योगिक शहर आहे. डीएमआयसीसारखा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतो आहे. त्यामुळे ही प्रतिमा बदलण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. यापुढे जगभरात आयोजित होणारी प्रदर्शने आणि परिसंवादात या ठिकाणच्या औद्योगिक बाबींची सकारात्मक बाजू मांडली जाईल, असेही पाटील म्हणाले. 


सबकाँट्रॅक्टरची माहिती घेणार 
डीएमआयसीचे काम गतीने सुरू आहे. मोठ्या कंपन्यांसाठी काही सबकाँट्रॅक्टर काम करतात. काही दिवसांपूर्वी एल अँड टी या कंपनीकडून एसएन कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीने लेबर वर्क घेतले होते. या कंपनीचा संचालक लहू जाधव याने त्याच्याच पार्टनरची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला असून त्यात आरटीओ कार्यालयातील लिपिक विक्रम राजपूत याचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत विचारले असता या प्रकरणाची मला माहिती नाही, असे पाटील म्हणाले. स्थानिक अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती मागवली असून कंपनीचे नावही लिहून घेतले. यापुढे अशा कंत्राटदारांचीही माहिती ठेवली जाईल, असे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...