आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये शेतीमाल फुकट नेताना अडवले, आडते - तरुणांत वाद, दगडफेक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- शेतकऱ्यांनी आडतीसाठी आणलेला शेतमाल फुकट का घेऊ देत नाहीत या कारणावरून खासबाग परिसरातील आडत संकुलात आडत विक्रेते आणि एका टोळक्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत आणि त्यानंतर तुफान दगडफेकीत झाले. परिणामी खासबाग परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेऊन जमावावर नियंत्रण मिळवले. पाेलिसांनी दाेन्ही गटातील लाेकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यामध्ये परस्पर विराेधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 8) सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान घडली. 

 

बीड शहरातील खासबाग परिसरामध्ये नगर पालिकेने सुरू केलेल्या आडत व्यापारी संकुलात भाजी-पाल्यासह फळाची आडत हाेते. मंगळवारी (दि.8) सकाळी आडत बाजारपेठ सुरू झाली. शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल आडतीसाठी ठेवला. आडत्यांकडून पुकाऱ्याचे काम सुरू असताना परिसरातील एक टोळके तेथे आले. शेतकऱ्यांचा शेतमाल आडत हाेण्याआधी घेऊन जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे आडत व्यापाऱ्यांनी त्यांना अडवले असता त्यांच्यात वाद झाला. संबंधित टोळक्याकडून त्यांना धक्काबुकी केल्यामुळे वाद विकोपाला जाऊन हाणामारी सुरू झाली. त्यानंतर परिसरातील जमावाकडून अचानक दगडफेक सुरू झाली. यामुळे आडते, खरेदीदार, शेतकरी यांची पळापळ सुरू झाली. आडत परिसरात दाेन्ही बाजूने जमावाकडून जाेरदार दगडफेक हाेऊ लागल्याने जो तो सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धाव घेत होता. 

 

परस्पर विराेधी गुन्हे दाखल 
हजी हशम बागवान (रा. माेमीनपुरा बीड) यांनी तक्रारीत म्हटले की , सलमान खान गफार खान पठाण, गफार खान अब्बास खान, जफार खान, इम्रान खान (रा. खासबाग परिसर) यांनी आडतीसाठी आलेले शेतकऱ्यांचा माल पुकारा न हाेऊ देताच नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचारणा केली असता आपणास मारहाण केली. या प्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जमादार संताेष काळे हे करीत आहेत. 

 

सलमान खान पठाण (रा. बागवान गल्ली बीड) यांनी तक्रारीत म्हटले की, शरीफ जाफर बागवान, जुनेद शाबुद्दीन, शेख नाजाेद्दीन बागवान यांनी मार्केटमध्ये जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या तसेच यातील एकाने तलवार घेऊन मार्केटमधून जाण्याचे धमकावले यावरून भांडण घडले. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अर्ध्या तासात पोलिस हजर 
ही घटना शहर पाेलिसांना समजताच अर्ध्या तासात पोलिसांचा ताफा दंगल नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल झाला. पाेलिसांनी दगडफेकीच्या घटनेवर नियंत्रण मिळवले. दरम्यान पाेलिस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी दाखल हाेऊन लोकांशी संवाद साधून ध्वनिक्षेपकावर सूचना केल्या. शहर पाेलिसांनी परिस्थिती नियंत्रणासाठी स्थानिक लोक आणि अडत विक्रेते या दाेन्ही गटातील लाेकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर दुपारी शहर पाेलिस ठाण्यामध्ये दाेन्ही गटाच्या लाेकांनी परस्पर विराेधी तक्रारी दाखल केल्या. 

 

यापूर्वीही असाच प्रकार घडला हाेता 
आडत परिसरातील लाेकांकडून त्रास हाेण्याचे प्रकार अनेक वेळा घडलेले आहेत. सात महिन्यांपूर्वी काही जणांचा शेतकऱ्यांसमवेत वाद झाला हाेता. मात्र आडत विक्रेते, दलाल, परिसरातील नागरिकांनी तो आपसात मिटवला होता. मात्र अजूनही असे प्रकार हाेत असल्याने पाेलिसांकडे दाद मागावी लागली.' - हारुण बागवान, जिल्हाध्यक्ष बागवान सामाज युवा मंच 


दाेन तास आडत बंद 
बीड येथे भाजीपाल्याची आडत पहाटे सहापासून सुरू होऊन अकरा वाजेपर्यंत चालते. मंगळवारी सकाळी आठ ते साडेआठच्या सुमारास दगडफेकीचा प्रकार घडल्याने शेतकरी आणि खरेदीदार निघून गेल्याने दोन तास आधीच अडत बंद झाली. 

 

आडत बंदचा इशारा 
आडत विक्रेत्यांनी आडत बंद केली. संबंधित आराेपींना अटक करा अन्यथा बेमुदत आडत बंद करण्याचा इशारा महात्मा फुले आडत मार्केट दल संघटनेने दिला. मात्र शहर पाेलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतल्याने बंदचा इशारा मागे घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले. 
 

बातम्या आणखी आहेत...