आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फक्त बच्चन...’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन हे माझ्यासाठी ‘कम्प्लिट अॅक्टर’ आहेत. नवरसाच्या भाषेत बोलायचे झाल्यास हीरो हा वीररसाने युक्त असतो. तर मला त्यांच्यापेक्षा वीररसयुक्त नट हिंदी चित्रपटसृष्टीत झालेला दिसत नाही. हा नट पाण्यासारखा आहे, त्यात कोणताही रंग मिसळा तो रंग हा माणूस तुम्हाला देतो. व्यक्तिमत्त्व परिपूर्ण अंगानं घडवणारी माणसं मोजकीच असतात. त्यात ५० वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात एकाच पोझिशनवर असणं हे सोपं नाही.

 

आज भारतातल्या तरुणाईचं जितकं सरासरी वय आहे, त्याच्या दुप्पट वर्षे अमिताभ बच्चन नावाच्या चमत्काराने हिंदी सिनेमा गाजवला आहे. नोव्हेंबर १९६९ मध्ये सात हिंदुस्थानी रिलीज झाला, तो अमिताभचा पहिला सिनेमा, त्या हिशेबाने २०१९ हे अमिताभच्या कारकीर्दीचं सुवर्णमहोत्सवी वर्ष. एक नट तब्बल पन्नास वर्ष शिळा, टाकाऊ आणि अडगळ न ठरता येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीत अभिनय सामर्थ्यांच्या बळावर आपलं नाव कोरतो, हासुद्धा एक चमत्कारच. त्याच्या अभिनयक्षमतेचे किती वेळा आणि कसेकसे विश्लेषण करणार? त्याच्या अस्तित्वाचे किती आणि कसेकसे अर्थ लावणार, तरीही अमिताभ बच्चन या नावाभोवतीचे वलय संपत नाही. त्याच्या कृतीतले नावीन्य लोपत नाही. तब्बल पन्नास वर्ष एक नट देशातल्याच नव्हे परदेशांतल्या कोट्यवधी प्रेक्षकांना आनंद देतो, जगण्याचे निमित्त पुरवतो. त्याच्या केवळ शब्दाने, स्पर्शाने, अस्तित्वाने लाखो लोकांची आयुष्यं उजळून निघतात. पडद्याबाहेरच्या त्याच्या वागण्या-बोलण्यात कितीही सुसंगती-विसंगती असली तरीही त्याचा परिणाम त्याच्या अभिनयावर होत नाही की वा त्याला दाद देणाऱ्या प्रेक्षकांवर होत नाही. तो पुढे जातच राहतो. एका अविचल निष्ठेने, पुढे जाताना पोतडीतला खजिना रिता करतच राहतो. 
 

अमिताभ बच्चन यांना मी अजून प्रत्यक्ष भेटलेलो नाही पण आता एक अॅक्टर म्हणून आम्ही लवकरच भेटणार आहोत. ‘ब्रिथ’ या वेबसीरिजच्या निमित्ताने मी अभिषेक बच्चनसोबत काम करतोय. अमिताभ आमचे काम पाहायला येतील तेव्हा प्रत्यक्ष भेट होईलच. पण ‘ब्रिथ’च्या निमित्ताने अभिषेकशी जेव्हा अमिताभ यांच्याविषयी बोलणं झालं तेव्हा अमिताभ हे प्रचंड शिस्तीचे, मैत्रीपूर्ण नातं ठेवणारा बाप असं चित्र समोर आलं. अभिषेक हा ‘अमिताभ’ या व्यक्तिमत्वाने पूर्ण भारावलेला आहे. तो बालपणीच्या काही गोष्टी सांगत असतो. अमिताभ यांची शशी कपूर, ऋषी कपूर, दिलीप कुमार यांच्याशी असलेली मैत्री सांगत असतो. त्याच्या तोंडातून जुन्या ‘सिलसिला’, ‘खुदा गवाह’चे सिनेमाचे किस्से ऐकून चाट पडायला होतं. ‘खुदा गवाह’चा एक किस्सा त्यानं मला ऐकवला होता – अफगाणिस्तानात तालिबानचे युद्ध सुरू होते आणि नेमके त्याच सुमारास ‘खुदा गवाह’चे तेथे शुटींग होते. एके दिवशी तालिबानचे काही दहशतवादी शुटींगच्या तंबूपाशी आले आणि त्यांना कळलं की हे शुटींग अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे आहे. हे सर्व तालिबानी अमिताभचे फॅन होते. मग काय तालिबान्यांनी दोन दिवस युद्ध थांबवलं होतं. ‘बॉम्ब वगैरे नंतर टाकू पहिले यांचे शूट होऊ दे’, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे अफगाणिस्तानात अमिताभचे शूटींग सुरू अाहे म्हणून तालिबान्यांनी काही काळ युद्ध थांबवणं हा किस्सा माझ्यासाठी केवळ धक्कादायक नव्हे तर डोक्याला हात लावणारा होता. दुसरा किस्सा असाच भन्नाट - होस्नी मुबारक इजिप्तचा सत्ताधीश असताना अमिताभ, श्वेता, अभिषेकला घेऊन इजिप्तमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. कैरोच्या रस्त्यावर कार्यक्रम सुरू असताना नेमका त्याचवेळी मुबारक यांचा भलामोठा ताफा आला. मुबारक यांच्या काही सुरक्षा रक्षकांना अमिताभचा कार्यक्रम असल्याची माहिती मिळाली आणि हे रक्षक मुबारक यांना सोडून, म्हणजे त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला सोडून अमिताभच्या सह्या घ्यायला धावले. हा प्रसंग दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात पहिल्या पानावर प्रसिद्ध आला. सोबत फोटो होता हुस्नी मुबारक-श्वेता-अभिषेक यांचा. थोडक्यात आजच्या अहोरात्र चालणाऱ्या टीव्ही व इंटरनेटच्या युगात शाहरुख, रजनीकांत यांच्या स्टारडमबद्दल आपण एेकत असतो पण असं काही नसताना दोन दशकांपूर्वी अमिताभ बच्चन नावाचा करिष्मा –स्टारडम- जगभर कसा पसरला होता हे या प्रसंगातून दिसून येते. 


असे किस्से अभिषेककडून ऐकताना मी पण माझी अमिताभविषयीची भक्ती त्याला सांगण्यास सुरवात केली. ‘ब्रिथ’च्या शुटींगदरम्यान एके दिवशी मी त्याला माझी डायरी दाखवली, ती डायरी पाहून तो चाट पडला. माझ्या डायरीत अमिताभच्या पाहिलेल्या साधारण ७२ सिनेमांची नोंद होती. त्यात मी अमिताभचे सिनेमे कितीवेळा पाहिले, ते कोणत्या थेएटरात पाहिले कितीवेळा पाहिले हे सगळं लिहिलेलं होतं. 


त्यावेळी म्हणजे ८०च्या दशकात कोल्हापुरसारख्या शहरात थेएटरला आलेला सिनेमाच पाहण्याची सोय होती. बहुतेक सिनेमे रि-रन म्हणून यायचे. अमिताभचे फ्लॉप झालेले ‘आलाप’, ‘सात हिंदुस्तानी’, ‘परवाना’, ‘परवरीश’सारखे सिनेमे रि-रनमध्ये पाहिले होते. ‘शोले’ही रि-रनमध्ये पाहिलेला आठवतोय. अमिताभचा एकही सिनेमा सोडलेला नव्हता. पुढे पुढे कोणता सिनेमा कोणत्या थेएटरात जाऊन पाहिला की चांगला वाटतो असं मनात ठेवून सिनेमे पाहिले. त्यावेळी कोल्हापुरात रात्री रस्त्यावर पांढऱ्या पडद्यावर सिनेमे दाखवले जात असतं. अमिताभचे सिनेमे लावणार आहेत, असं कळल्यानंतर तर प्रचंड गर्दी होत असे. लोकं पडद्याच्या दोन्ही बाजूने िसनेमे पाहायला धडपडत असतं. अशा काळात मी अमिताभचे अनेक पिक्चर कधी पडद्याच्या या बाजूने तर कधी दुसऱ्या बाजूने पाहिलेत. काही वेळा मुद्दामून अमिताभ उजव्या हातानं-पायानं कशी फायटिंग करतोय हे पाहण्यासाठीही मी त्याचे सिनेमे पडद्याच्या दुसऱ्या बाजूने पाहिलेत. ८०च्या दशकात थेएटरमधले अमिताभचे रि-रनचे सिनेमे सहजपणे २५ आठवडे चालत असतं. अगदी ‘मॅड’पणे या सिनेमांची मी पारायणं केलेली आठवतात. त्यावेळी खात्री पटली होती की, सिनेमा म्हणजे, अभिनय म्हणजे ‘अमिताभ बच्चन’.  कित्येकवेळा अमिताभचे सिनेमे पाहून घरी आलं की अंगात स्फुरण चढायचं. या स्फुरणात मी दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर अनेक हाफ सेंच्युऱ्या ठोकलेल्या आहेत. ‘बच्चन’पाहून (कोल्हापुरात अमिताभ म्हणतं नाहीत तर बच्चन असंच म्हणतात तेही एकेरीत) अंगात येणाऱ्या अशा स्फुरणानं दैनंदिन आयुष्यातल्या अनेक गोष्टी सहजरित्या होत होत्या. एकूणात मला अजितपासून अमजाद खान-प्राण, सुधीर, बॉब ख्रिस्टो, रणजीत, जीवन, प्रेम चोप्रा ही तमाम व्हिलन मंडळी, त्याच्यासोबत काम करणाऱ्या अनेक नट्या या अमिताभ बरोबर काम केल्यामुळे कळाल्या. अमूक-तमूक नटाने अमिताभबरोबर काम केलंय हा त्या नटाचा लँडमार्क मी समजू लागलो. हे मनावर खोलवर बिंबलं होतं. त्याला एक कारण असंही आहे की, माझा जन्म अमिताभच्या स्टारडम काळातला. त्यामुळे माझ्यावर धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना, विनोद खन्ना, दिलीप कुमार अशा जुन्या नटांचं गारुडं असण्याचं कारणच नव्हतं. पण नंतर नंतर अमिताभचे बलराज सहानी, दिलीप कुमार हे आदर्श आहेत असं कळल्यानंतर मी त्यांचे सिनेमे पाहण्यास सुरवात केली. ‘शक्ती’मधील अमिताभ-दिलीप कुमार यांच्यातील जुगलबंदी मी कमीतकमी ४० वेळा पाहिलेली असेल. पुढेपुढे अमिताभचे डबल रोल व ‘महान’मधील ट्रिपल रोल असलेले सिनेमे हा माणूस कसं काम करतो यासाठी पाहिलेत. एकंदरीत बालवयात उन्हाळी किंवा दिवाळीत मिळणाऱ्या सुट्या आनंदात जायचे एकमेव कारण म्हणजे अमिताभचे सिनेमे पाहणं एवढंच होतं.


मला आठवतंय त्या काळात अमिताभच्या ड्रेसिंगचा तरुणांवर एवढा प्रचंड पगडा होता की, अमिताभच्या बेलबॉटमच्या पँट, त्याचा बीटल्स कट, त्याची शर्टची वरची तीन बटने उघडी ठेवण्याची फॅशन, त्याचे उंची ब्लेझर्स, करेराचा गॉगल, त्याची जाकीट याची सर्रास नक्कल केली जात असायची. त्यावेळी अशी नक्कल केली, अनुकरण केलं म्हणून कोणी कुणाला वेड्यात काढत नसतं. उलट अशा माणसाबद्दल प्रेम वाटायचं. हा तरुण योग्य माणसाचं अनुकरण करतोय असं वाटायचं. ते मवालीपणाचे लक्षणही मानलं जात नसायचं. अमिताभची मोटार सायकलवर तिरके बसून चालवण्याची स्टाइल तरुणांमध्ये भलतीच लोकप्रिय होती. त्यामुळे कोल्हापुरात सीटवर तिरके बसून सहज रिक्षा चालवणारे अनेक रिक्षावाले बघायला मिळतं. रिक्षात बच्चनचे फोटो ठेवणं, पोस्टरर्स लावणं हा एक वेगळा अतर्क्य प्रकार. अशा सगळ्या वातावरणात नटाकडे तब्येत असायला हवी हा पसरलेला समज अमिताभकडे पाहून माझ्या मनातून केव्हाच नाहीसा झाला होता. अमिताभची पडद्यावरची फाइट नेहमीच कन्व्हिसिंग वाटायची. त्यांचे नाचणं हे भारीच वाटायचं. 


नंतर नंतर काळानुसार अमिताभच्या व्यक्तिमत्वात एक अभिनेता म्हणून असणारे कलागुण समजत गेले. त्यांची इंग्रजी-हिंदी-भोजपुरी-अवघी भाषेवरची पकड लक्षात आली. विजय मांजरेकर-विजय हजारे ही इंग्रजीतली कॉमेंट्री, ‘सिलसिला’तले कवितांचे वाचन एेकून असं वाटायचं की या माणसाला प्रत्येक गोष्ट येते. उंची सहा फुट, रंग गोरा, चेहरा अप्रतिम, मधून भांग पाडणारी हेअरस्टाइल, त्याचं डौलदार चालणं आणि त्या उप्पर कॉन्फिडन्स पाहता हा माणूस आदर्शवत वाटायचा. पडद्यावरची त्याची एंट्री पाहणं हे मेस्मरायझिंग.. हा माणूस सुप्रीमच वाटायचा. १९८४मध्ये अलाहाबादची लोकसभा निवडणूक प्रचंड मताने जिंकल्यानंतर मला असं वाटलं की कोल्हापुरच्या लोकांनीच त्यांना मतदान केल्यानं त्यांना एवढी लाखो मत पडली असावीत.. त्यावेळी घरातले हसले होते.  आणि आज ३० वर्षे पाहतोय, या व्यक्तिमत्वाचा तोच बाज आहे, तीच सुप्रीमसी कायम आहे. आज त्यांचे सिनेमे येतात त्यात त्यांच पोझिंग पाहतो तेव्हा लक्षात येतं की, आजच्या एकाही सुपरस्टारला ते पोझिंग जमत नाही. त्यांचे ‘जादुगर’, ‘अजूबा’, ‘मै आझाद हूँ’ हे चित्रपट २५ आठवडे चालले नाहीत म्हणून पडले असले तरी त्यांचा अभिनय उच्च दर्जाचं होता. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर आजच्यासारखे १०० कोटी आकड्याचं स्टँडर्ड नसायचं. सिनेमाने किती पैसा कमावला यापेक्षा तो किती आठवडा चाललाय यावर सगळं गणित असायचं. अशा काळात ‘अजूबा’ १५ व्या आठवड्यात पाहिल्याचं मला आठवतंय. त्याचं मनावरचं गारुड हटलेलं नव्हतं. मधल्या काळात त्यांनी प्रोड्युसर म्हणून केलेले ‘तेरे मेरे सपने’ सारखे चित्रपट फक्त आणि फक्त अमिताभने बनवले आहेत म्हणून पाहिले. असं सगळं असताना हा माणूस कर्जबाजारी होऊ शकतो हे मनाला पटत नव्हतं. अमिताभच्या पडत्या काळातला एक किस्सा अभिषेकने मला सांगितला होता, हा किस्सा ऐकून अमिताभ हा माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहेत याची प्रचिती आली. हातात सिनेमे नसताना अमिताभ एकेदिवशी यश चोप्रांकडे गेले. ते स्वत:च्या घरातून गाडी न घेता चालत चोप्रांकडे गेले. चोप्रांना म्हणाले, ‘माझी परिस्थिती अत्यंत वाईट आहे, मला काम द्या.’ तेव्हा चोप्रांनी आर्थिक मदत देऊ केली होती पण अमिताभ म्हणाले, मला काम द्या. (मी असा विचार केला, अमिताभने नुसते पैसे मागितले असते तरी फिल्मीजगतातून, त्यांच्या जगभर पसरलेल्या चाहत्यांकडून, मित्रांकडून, अंबानीकडून त्यांच्या पायाशी पैशाची रास लागली असती.) असल्या गुणांमुळे व काम, कष्ट यांची जाण व तसे संस्कार असल्याने हा माणूस संकटातून नेहमीच उसळून उभा राहिला. पुढे केबीसीने काय इतिहास गाजवला तो सर्वांना माहितीच आहे.

 
२० वर्षांपूर्वी टीव्हीवर एखाद्या बड्या फिल्मस्टारने काम करणे हे कमी दर्जाचे मानले जात असे पण अमिताभनी ती परिस्थिती स्वीकारली होती. केबीसीचे यश तर प्रचंडच होते पण केवळ अमिताभमुळे सोनी कंपनी घराघरात पोहोचली. टेलिव्हिजन माध्यमाला त्यांनी दर्जा मिळवून दिला. त्यांनी हात लावला आणि त्या माध्यमाचं सोनं झालं. काळानुसार बदलणं हा त्यांचा स्वभाव आहे. नव्या दमाचे सुजय घोष, अयान मुखर्जी, राकेश मेहरा, अनुराग बासू, बाल्की यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. आताचा हिंदी सिनेमा तरुण लोकांच्या हाती आहे हे त्यांनी ओळखलं. विषय बदलतायत, आपले कॅरेक्टर पूर्वीसारखे हिरोसारखे नाही हे त्यांनी ओळखलं. त्यामुळे सपोर्टिंग कॅरेक्टरचे अनेक रोल त्यांनी स्वीकारले पण या माणसाचा महिमा कायमच राहिला. सपोर्टिंग कॅरेक्टर असलं तरी टायटलमध्ये पहिलं नाव त्यांचचं दिसायचं. 


अमिताभ बच्चन यांचा शिस्तपाठ हा गुण मला भावतो. ‘खुदा गवाह’च्या शुटींगवेळी अफगाणिस्तानातल्या मरणाच्या उन्हात दिलेल्या वेळेत हा माणूस मेकअप करून हजर असायचा. त्यांच्या शिस्तीबद्दल फिल्म इंडस्ट्रीत अनेकदा बोललं जातं. एकदा अनुपम खेरनी त्यांच्याबाबतीत घडलेला किस्सा सांगितला. ते म्हणायचे, या इंडस्ट्रीत अडीचची वेळ सांगितलेली असते पण बडे स्टार चारशिवाय सेटवर येत नसताना तुम्ही कसं काय वेळेत येऊ शकता? यावर श्रीयुत अमिताभ बच्चन म्हणाले, ‘थिस इज माय ब्रेड अँड बटर’. माणसं उगाचचं मोठं होतं नाहीत. त्यांच्या अशा शिस्तीने इंडस्ट्रीमधील समीकरणेच बदलली. त्यांचा रोजचा दिनक्रम आम्हा नटांसाठी एक शिस्तपाठच आहे. सर्व व्यसनांना त्यांनी केव्हाच दूर ठेवले आहे, रोज सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करणे, नियमित लेखन करणे, वाचन करणे, जगभरातल्या घटनांशी कनेक्ट ठेवणे हा त्यांच्या ‌व्यक्तिमत्वातील एक मोठा विशेष आहे. एकेदिवशी अभिषेक सांगत होता, ‘आमच्या घरात जवळपास सर्व वर्तमानपत्रे येतात. कोणी कोणतं वर्तमानपत्रे वाचलयं हे समजण्यासाठी आम्ही कार्ड ठेवली आहेत त्या कार्डवर आपण कोणते वर्तमानपत्र वाचलंय त्यावर टीक केलं की दुसऱ्याला कुणी काय वाचलयं हे कळतं.’ 


अशा अमिताभला समाजाकडून मिळालेले अपारप्रेम देशानं पाहिलंय. कुली’च्या वेळी झालेल्या अपघातात संपूर्ण देशानं त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या होत्या. आपल्या घरचंच कुणीतरी माणूस सीरियस आहे, तो वाचला पाहिजे, अशी माझीही प्रार्थना असायची. त्यांच्या आयुष्यातील हे सगळे चढउतार थक्क करणारे आहेत. 
अमिताभ बच्चन हे माझ्यासाठी ‘कम्प्लिट अॅक्टर’ आहेत. नवरसाच्या भाषेत बोलायचे झाल्यास हीरो हा वीररसाने युक्त असतो. तर मला त्यांच्यापेक्षा वीररसयुक्त नट हिंदी चित्रपटसृष्टीत झालेला दिसत नाही. जेव्हा व्हिलन करायचा आहे तेव्हा तो त्यांनी सर्वश्रेष्ठ केला. कॉमेडी कॅरेक्टर करताना त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर, टायमिंग अफलातून आहे. त्यांची कॉमेडी अत्युच्च लेवलची आहे. हा नट पाण्यासारखा आहे, त्यात कोणताही रंग मिसळा तो रंग हा माणूस तुम्हाला देतो. स्वत:चा रंग, रुप, उंची, आपल्या शरीराची जाण असलेला हा अभिनेता आहे, भाषेवर प्रभुत्व, आवाजाचा पोत त्यांच्याशिवाय कुणाकडे दिसत नाही. ‘शराबी’त अतिरंजित डायलॉग आहेत. पण त्यांनी ते इतक्या लीलया व कन्व्हिंसिंग केले आहेत की ते उच्च अभिरुचीचे वाटतात. त्यांचे गेल्या काही वर्षांतले ‘सरकार’, ‘पिकू’, ‘बदला’ सिनेमे पाहता हा अभिनेता अनभिषिक्त सम्राट का आहे हे लक्षात येतं. अशा अभिनयातून ते सहकलाकारांना जणू सांगतात, ‘मुलांनो तुम्हाला खूप शिकायचंय आणि तुमचं भाग्य आहे की, माझ्याबरोबर तुम्हाला काम करायला मिळालंय.’ एखादी भूमिका जगणं काय असतं हे अमिताभकडून शिकावं, भूमिकेचा पैस, विस्तार कसा असू शकतो किंवा तो कसा असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं. 
एकूणात मी अशा काळातला तरुण आहे की, ज्यानं झाकीर हुसेनचा तबला, हरिप्रसाद चौरसियांची बासरी, भीमसेन जोशींची गायकी एेकलीय. सुनील गावस्करांचे, सचिनचं अख्खं करिअर बघितलंय, याच काळात मी अमिताभची अत्युच्च काळातली कामगिरीही पाहिलीय. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतोय. त्यांच्या अभिनयातल्या खरेपणाचा संस्कार माझ्यात खोलवर रुजलाय जो मी माझ्या अभिनयात आणण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या इतकं एक टक्काही मला करता आलं तरी खूप झालं. व्यक्तिमत्व परिपूर्ण अंगानं घडवणारी माणसं मोजकीच असतात. त्यात ५० वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात एकाच पोझिशनवर असणं हे सोपं नाही.

 

हृषिकेश जोशी
rishijo@gmail.com

(लेखक प्रसिद्ध सिनेअभिनेते आहेत) 

 

बातम्या आणखी आहेत...