आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग वॉक करताना शिक्षकाला कारने ठोकरले; जागेवरच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दौलताबाद किल्ल्यासमोर मॉर्निंग वॉक करणारे भानुदास जनार्दन जाधव (४५) यांना सोमवारी (२२ ऑक्टोबर) पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारने उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कारचालक उमेश दर्डा याला अटक करण्यात आली आहे. पहाटेची वेळ असल्याने काही क्षणांसाठी चालकाच्या डोळ्यावर झोपेची झापड आली आणि आणि त्याचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटले असावे, असा दौलताबाद पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कारण जाधव यांना उडवल्यावर कार रस्त्याच्या कडेला उलटी झाली. चालकासोबतचा एक जणही जखमी झाला. मॉर्निंग वॉक करणाऱ्यास वाहनाने उडवल्याची ही गेल्या दोन आठवड्यांतील दुसरी घटना आहे. 


घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत इतर जखमींना उपचारासाठी दाखल केले व कार जप्त केली. जाधव यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी एक वाजता अब्दीमंडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. ज्या कारने जाधव यांना धडक दिली ती कार राजकोटहून आली होती आणि औरंगाबादकडे जात होती. कारमालकाचा किराणाचा व्यवसाय असल्याचे चालक उमेशने सांगितले. 


हायवेवर मॉर्निंग वॉक टाळा 
गेल्या ४० वर्षांपासून नियमितपणे मॉर्निंग वॉक करणारे डॉ. अरविंद गुजराथी म्हणाले की, हायवेवर मॉर्निंग वॉक टाळावा. शक्यतो भल्या पहाटे घराबाहेर पडू नये. रस्ता रिकामा असला तरी फुटपाथवरून चालावे. पहाटेची वेळ आणि रस्ता मोकळा असल्यास वाहनचालक भरधाव गाडी हाकत असतात. 


तो सरळ अंगावरच आला 
प्रत्यक्षदर्शी आणि जाधव यांचे मित्र एकनाथ दत्तू जाधव यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले ते असे : मी, भानुदास आणि दादासाहेब असे तिघे होतो. कार आमच्या दिशेने ८० ते ९० च्या वेगाने आली. काही सेकंदांंतच काय घडले कोणास ठाऊक, कार थेट आमच्या अंगावरच आली. दादासाहेब आणि मी रोडच्या दिशेने पळालो तर भानुदास आमच्या विरुद्ध दिशेने गेला. त्या बाजूला तारेचे कंपाउंड असल्यामुळे त्यांना पुढे जाता आले नाही आणि कारने त्यांना उडवले. 


दोन्ही घटनांतील चालक मोकाटच 
१६ सप्टेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चिकलठाणा येथील चार मित्रांना केंब्रिज शाळेजवळ स्कॉर्पिओने उडवले. या स्कॉर्पिओचा चालक अजूनही पोलिसांना सापडला नाही. ९ ऑक्टोबर रोजी रोपळेकर चौकात भास्कर केदारे यांना जीपने धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हा जीपचालकही अटकेत नाही. 

बातम्या आणखी आहेत...