आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सोलापूर सज्ज; रंगसफेदी, रस्ते करण्यात आले चकाचक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा येण्या-जाण्याचे रस्ते महापालिकेने रंगसफेदी करत साफ केले आहेत. दुभाजक रंगवले असून त्यात रोपेही लावली आहेत. येता-जाता पंतप्रधानांना परिसर प्रसन्न आणि स्वच्छ दिसेल, अशी व्यवस्था करण्यात यंत्रणा कामाला लागली आहे. 

 

पार्क स्टेडियम येथे श्री. मोदी यांची सभा होणार असून त्यासाठीही तयारी सुरू आहे. तिथे ४५ हजार श्रोते बसतील, अशी आसन आहे. पण भाजपचे नियोजन एक लाख नागरिकांना आणण्याचे आहे. 


पंतप्रधानांच्या हस्ते सोलापूर ते येडशी व नगरोत्थान योजनेतून करण्यात आलेली ड्रेनेज योजना लोकार्पण करण्यात येणार आहे तर उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, रे नगर, हद्दवाढ भागातील १७४ कोटींची ड्रेनेज योजना आणि स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी एरियातील २२५ कोटींच्या ड्रेनेज व पाइपलाइन कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. १५ एलईडीची सोय स्टेडियमच्या बाहेर फडकुले सभागृह, संमती कट्टा, होम मैदान, नाॅर्थ कोट मैदानसह स्टेडियमच्या बाह्य बाजूस सुमारे १५ एलईडीची सोय करण्यात येणार आहे. मैदानाबाहेर नागरिकांसाठी ही सोय करण्यात येणार आहे. 

 

महापालिकेने दुभाजक रंगवले, रोपे लावली, चार पुतळा परिसरातील दुभाजकाचा भाग फोडून केली ताफ्यासाठी वाट 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पार्क मैदानावर तयारी सुरू आहे. दुसरीकडे त्यांच्या वाहनांचा ताफा जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यात येत आहे. चार हुतात्मा पुतळा परिसरात ताफ्यासाठी दुभाजक फोडला आहे. 


मैदान सजले, मोदींसाठी नवीन कारपेट 
पार्क मैदानावर मंडप मारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान मोदी चार पुतळा बाजूने मैदानावर येतील. त्यांच्यासाठी नवीन कारपेट घालण्यात येणार आहे. स्टेडियम गॅलरी पांढऱ्या पंेटने रंगवण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षणचे फलक रंगवले. सुरक्षेच्या कारणास्तव डी झोन तयार करण्यात आले असून, तेथे कारपेट घालण्यात येणार आहे. तसेच झाडाचे कुंडे ठेवण्यात येतील. मैदानावर २० हजार खुर्च्या असणार आहे. गॅलरीत नागरिक बसतील. तसेच मैदानावर सुमारे ६५ हजार नागरिकांची सोय करण्यात येत असल्याचे संयोजनाच्या वतीने सांगण्यात आले. 


विमानतळ ते पार्क मैदान रस्ता दुरुस्त 
विमानतळ ते पार्कपर्यंत रस्ते दुरुस्ती करण्यात आली. तर मैदान स्थळी दोन मार्गावर नव्याने रस्ता करण्यात आला आहे. काही ठिकाणी नव्याने रस्ता करण्यात आला आहे. सोमवारी रात्री रस्ता करण्याचे काम सुरू होते. विमानतळ ते सात रस्त्यापर्यंत रस्ता दुभाजकात झाडे लावण्यात आले आहे. सोमवारी आसरा ते ईदगाह मैदानापर्यंत झाडे लावण्यात आली. याशिवाय रस्ता बाजूस झाडे लावण्यात आली आहेत. सात रस्ता ते गांधीनगर, संभाजी तलाव पूल, रेल्वे स्टेशन परिसरातील शासकीय भिंती स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ अंतर्गत रंगवण्यात येत आहेत. यासाठी महापालिका व खासगी शाळेतील कला शिक्षक, विद्यार्थी भिंती रंगवत आहेत. यामुळे तो रस्ता सुशोभीत दिसत आहेत. 


पाणी बाटली, पर्स आणण्यास मनाई 
सोलापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बुधवारी सकाळी १०.५० वाजता आगमन होणार असून १२.१५ वाजता परत जातील. पार्क मैदानावर सभा होणार असून पंतप्रधान मोदी ८५ मिनिटांच्या दौऱ्यात शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ करणार आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने नागरिकांनी पाण्याची बाटली तर महिलांनी पर्स व इतर जड वस्तू आणू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांचा प्रस्तावित दौरा आहे. अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम दौरा प्राप्त झाला नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. 

 

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरिदीपसिंग पुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह स्थानिक मंत्री व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. 


पार्क मैदानाच्या शेजारील दुकाने बंद ठेवणार का? या प्रश्नावर पोलिसांनी सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. पण जनजीवन सुरळीत राहील. दौऱ्याचा कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी पोलिस प्रशासन घेत आहे. दौरा कालावधीत शहरातील कोणतीही दुकाने बंद राहणार नाहीत, असे जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट केले. 


लोकार्पण आणि पायाभरणी 
सोलापूर-उस्मानाबाद महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३० घरांचा पायाभरणी सोहळा, सोलापूर शहरातील ड्रेनेजलाइन व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण, अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार योजना, शहरातील पाणीपुरवठा व ड्रेनेजलाइन कामाची पायाभरणी, उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेची पायाभरणी. 

 

बातम्या आणखी आहेत...