आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ठेकेदारांसोबत आठ दिवसांपूर्वीच करार; जानेवारीअखेरीसच रस्ते कामाला प्रारंभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील बहुचर्चित १०० कोटींच्या रस्ते कामांचे भूमिपूजन गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारळ फोडून केले. त्यानंतर लगेच कामाला सुरुवात होईल असे नागरिकांना वाटले होते. परंतु २८ जानेवारीला प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू होणार आहे. तसे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. नारळ फुटण्यापूर्वी मनपाने ठेकेदारांसोबत करार केला आहे. मात्र, ठेकेदारांनी पूर्वतयारीचे कोणतेच काम केले नाही. कामे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण प्रत्यक्ष काम कुठे सुरू आहे याची कोणतीच माहिती अधिकाऱ्यांना नाही. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

 

साडेअठरा महिन्यांनंतर शंभर कोटींच्या निधीतून मनपा ३० रस्ते करणार आहे. कामांच्या निविदा प्रक्रियांना दीड वर्षाचा कालावधी लागला. त्यामुळे कामांच्या निविदांना दोन महिन्यांपूर्वी अंतिम मंजुरी दिली. २३ डिसेंबर रोजी कामांचा शुभारंभ होणार होता. मात्र, राजकीय आणि तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शुभारंभ लांबणीवर पडला. दुसरीकडे मनपाने ठेकेदारांसोबत २८ डिसेंबर रोजी करार करून घेतला. त्यानंतर प्राथमिक असलेले रस्ते हस्तांतर, रस्ता लेव्हल, माती परीक्षण अशी कामे सुरू करणे आवश्यक होते. परंतु मनपा अधिकाऱ्यांनी तसे काहीच केले नाही. उलट कामाच्या शुभारंभाची वाट पाहिली. कामाचे भूमिपूजन करण्याची घाई झालेल्या मनपाला आता प्रारंभीची कामे करण्याचे शहाणपण सुचले. त्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला. महिनाभरात प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरणही दिले. आतापर्यंत अधिकाऱ्यांनी जशी वेळ काढूपणाची भूमिका घेतली तशीच भूमिका अद्यापही कायम आहे. ठेकेदारांकडून कामास प्रारंभ होईल या आशेवर बसून असलेल्या अधिकाऱ्यांना घोडेले यांनी २८ जानेवारी रोजी कोणत्याही परिस्थितीत किमान एका रस्त्यावर नागरिकांना सिमेंट पडल्याचे चित्र दिसले पाहिजे असा दम दिला आहे. त्यानुसार हे काम जानेवारीच्या अखेरीस सुरू होईल अथवा फेब्रुवारीचा दुसरा आठवडा उजाडण्याचे संकेत मिळत होते. 

 

ही तांत्रिक कामे अगोदरच झाली असती 
माती परीक्षण करून रस्त्यांचे डिझाइन तयार करणे, रस्त्यांचे काम करण्यासाठी ठेकेदारांकडे हस्तांतर करणे, त्याचबरोबर लेव्हलिंग करून घेणे, रस्त्यांची मार्किंग व मोजणी करून घेणे, तृतीय संस्थेची तपासणी करून घेण्यासाठी नियुक्त करणे ही सर्व कामे मनपाने आता सुरू केली आहेत. 

 

साइटवरच राहणार लॅब 
रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत. त्यासाठी कंत्राटदाराला प्रत्येक साइटवर अत्याधुनिक लॅब सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर साइट ऑफिस सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत. 

 

सिटी बससारखीच गत होण्याची शक्यता 
मनपा प्रशासनाकडून सर्व कामे अपूर्ण ठेवण्यात येत असून वेळेवर काम करून घेण्याऐवजी वेळ मारून नेण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. त्यामुळे शहर बस आणून उद््घाटन करून जशी गोडाऊनमध्ये न्यावी लागली तशीच अवस्था रस्ते कामांची झाली आहे. कामांचा शुभारंभ होऊनही आता रस्ते काम सुरू होण्यासाठी किमान २४ दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. 

 

पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची तयारी 
रस्ते कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासोबत महापालिकेने पत्रव्यवहार केला होता. मात्र, महापालिकेला नकार कळवण्यात आला. त्यामुळे पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी तयारी दर्शवली असल्याचे उपअभियंता एस. डी. काकडे यांनी सांगितले.