आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींच्या रस्त्यांचे दोन प्रस्ताव थांबवले, मंजुरी मिळूनही कार्यारंभ आदेश गुलदस्त्यात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या १८ महिन्यांपासून रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी असूनही मनपाला एक इंचभरही काम करता आले नाही. स्थायी समितीने दोन नोव्हेंबर रोजी एजन्सी नियुक्तीस मंजुरी दिली. १६ दिवसांत दोन ठेकेदारांचे प्रस्ताव स्थायी समितीने पाठवले, उर्वरित दोन ठेकेदाराचे प्रस्ताव अडकवून ठेवल्याने यात अर्थकारण असल्याची चर्चा मनपात होत आहे. दुसरीकडे या हिश्श्यांमुळे रस्ते कामांना विलंब होत आहे. राज्य शासनाने दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांची गेल्या दीड वर्षापासून चर्चाच होत आहे. स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर कामे सुरू होणार होती. मात्र स्थायी समितीने एजन्सी नियुक्त करण्यास मंजुरी देऊन पंधरवडा उलटून गेला तरीही ठेकेदारांना कार्यारंभ आदेश दिले नाही. तसेच ठेकेदाराकडून २ टक्के रक्कम अागाऊ भरून घेण्यात येते. त्यासंबंधीचे पत्रही मनपाने ठेकेदारांना दिले नाही. त्यामुळे अजून किमान एक आठवडा या कामांना विलंब होणार आहे. 

 

दोनच एजन्सीचे प्रस्ताव प्रशासनाला : दोन नोव्हेंबर रोजी स्थायी समितीने चारही एजन्सी नियुक्त करण्यासाठी स्थायी समितीत पी-वन म्हणजे पहिल्या टप्प्यातील सात कामे ते पी -४ मधील १२ कामांसाठी चार एजन्सी नियुक्तीसाठी मान्यता दिली. मात्र दोनच ठेकेदारांसोबत वाटाघाटी यशस्वी झाल्या असून इतर दोन ठेकेदारांच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे मस्कट कन्स्ट्रक्शन आणि जे. पी. इन्फ्राचेच प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवले असून पहिल्या टप्प्यातील जीएनआय व अखेरच्या टप्प्यातील राजेश कन्स्ट्रक्शनचे प्रस्ताव अद्यापही बाकी आहेत. 


स्थायीच्या मंजुरीनंतर काम सुरू होणे अपेक्षित : स्थायी समितीच्या मंजुरीनंतर मनपाने कंत्राटदारांकडून करार व बँक गॅरंटीची प्रक्रिया किमान दहा दिवसांत पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, पंधरा दिवसांनंतरही घोडे अडलेलेच आहे. 

 

३० रस्त्यांचे चार ठेकेदार 
एकूण ३० रस्त्यांची व्हाइट टॉपिंगची कामे होणार आहेत. 
टप्पा १ चा ठेका - ७ रस्ते - जीएनआय कन्स्ट्रक्शन १९ कोटी ४० लाख रुपये 
टप्पा २ ची कामे - ६ रस्ते - जे.पी. कन्स्ट्रक्शन २० कोटी २६ लाख रुपये 
टप्पा ३ मधील - ५ रस्ते - मस्कट कन्स्ट्रक्शन २० कोटी ३० लाख रुपये 
टप्पा ४ मधील - १२ रस्ते - राजेश कन्स्ट्रक्शन १८ कोटी ८७ लाख रुपये 

 

सोमवारी दोन्ही एजन्सींचे प्रस्ताव पाठवणार 
स्थायी समितीसह नगर सचिव विभागात मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे दोनच एजन्सींचे प्रस्ताव शासनाकडे गेले आहेत. त्यात दिवाळीच्या सुट्या आल्याने प्रस्ताव पाठवण्यास विलंब झाला. मात्र सोमवारी उर्वरित प्रस्ताव प्रशासनाला पाठवण्यात येेतील. - राजू वैद्य, स्थायी समिती सभापती 

बातम्या आणखी आहेत...