आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस अडवून युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न; घनसावंगी ते अंबड मार्गावर भरदुपारी घडलेली घटना 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी- राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा पाठलाग करत रस्त्यावर दगड आणि दुचाकी आडवी लावून अल्पवयीन युवतीस बसमधून खेचून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बसमधील प्रवासी आक्रमक झाल्याने तिघे रोडरोमिओ घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना घनसावंगी ते अंबड मार्गावरील बोधलापुरीजवळ सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बसचालक भगवान आव्हाड यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अंबड, कुंभार पिंपळगावमार्गे बस घनसावंगीकडे जात असताना बसला पाठलाग करीत पुढे निघून गेलेल्या सत्यभान भगवान सोनवणेसह त्याच्या दोन मित्रांनी बोधलापुरी येथे रस्त्यावर दगड टाकून तसेच मोटारसायकल आडवी लावून बस अडवली. सत्यभान आणि त्याच्या मित्रांनी दगड हातात घेऊन शिवीगाळ केली. बसमधील एका अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीला शिवीगाळ करत बसचा दरवाजा उघडून दमदाटी करत तिला ओढून नेण्यास सुरुवात केली. मात्र, प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. प्रवाशी आक्रमक झाल्यामुळे आरोपींनी पळ काढला. यानंतर चालकाने बस थेट घनसावंगी पोलिस ठाण्यात नेली. या घटनेमुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये ये-जा करणाऱ्या मुलींमध्ये दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी चालक भगवान आव्हाड यांच्या फिर्यादीवरून वडीरामसगाव येथील सत्यभान भगवान सोनवणे याच्यासह इतर दोन जणांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे करीत आहेत. 

 

पालकांना बदनामीची भीती 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदरील तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न केला असावा. गावात बदनामी होण्याच्या भीतीने पळवून नेण्याचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दिली नाही. तथापि, बसचालक भगवान आव्हाड यांनी तक्रार दाखल केली आहे. 

 

पथक रवाना 
घडलेली घटना गंभीर आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. या घटनेतील आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल. शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक, घनसावंगी. 

 

बातम्या आणखी आहेत...