आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रस्ते चांगले होतील, फक्त आमदार- खासदारांचा ठेकेदारांना त्रास नकाे' - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावले खडे बाेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : 'मराठवाड्यात चांगले रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण हाेतील. मी १५ लाख कोटी कामे केली, मात्र एकाही कंत्राटदाराला घरी बोलावले नाही. मात्र मराठवाड्यातील आमदार, खासदार, लाेकप्रतिनिधी काम सुरू केले की आधी कंत्राटदाराला त्रस्त करतात, बाेलावून घेतात. लोकप्रतिनिधींच्या या वागणुकीमुळे मी त्रस्त झालाे आहे. म्हणूनच मध्यंतरी मी सीबीआयलाही सांगितले, जो त्रास देईल त्याच्यावर छापे टाका. आम्ही रस्त्याची कामे करतो म्हणजे पाप करत नाही,' अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी सर्वपक्षीय लाेकप्रतिनिधींना खडे बाेल सुनावले. औरंगाबाद येथे महाएक्स्पाेच्या समाराेप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दाेन्ही भाजपच्या नेत्यांनी रस्ते कामावरून एकमेकांवर आराेप केले हाेते. गडकरी म्हणाले की, 'काम करणाऱ्या कंत्राटदारांना नेत्यांनी त्रास दिला की ते पळून जातात. मी ही विदर्भाची गोष्ट सांगत नाही, तर मराठवाड्याची सांगताेय. हे होऊ देऊ नका. विकासात राजकारण आणू नका. मराठवाडा-विदर्भ या दाेन्ही विभागांचा इतका विकास करू. उलट इतर भागांना वाटेल की त्यांचा अनुशेष शिल्लक राहिला आहे.

औरंगाबाद-शिर्डी रस्ता चाैपदरी

खा. इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद-शिर्डी हा रस्ता चारपदरी करावा, अशी मागणी केली. हा रस्ता चांगला झाल्यास दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांना फायदा होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर गडकरी यांनी सकारात्मक उत्तर देत दिल्लीत जाऊन या कामाचे लवकरच नियाेजन करू,' असे आश्वासन दिले.

चिकलठाणा नगर नाका उड्डाणपूल करा

'गडकरी मनकी बात नाही, दिल की बात करते है..' अशा शब्दात काैतुक करत खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्याकडे काही मागण्या मांडल्या. नाशिक, हैदराबाद शहरात १९ किमीचे उड्डाणपूल आहेत, त्याच धर्तीवर औरंगाबादेत नगरनाका ते चिकलठाणा उड्डाणपूल बांधा, अशी मागणी त्यांनी केली. डीएमआयसीत कन्व्हेन्शन सेंटरसाठी जागा मिळाली असून त्यासाठी निधी द्यावा, अशी मागणीही खासदारांनी केली. त्यावर गडकरींनी औरंगाबादसाठी स्कायबसचा प्रस्ताव दिला होता. त्यातून कसा फायदा आणि वाहतूक सुरळीत होऊ शकते याची माहिती सांगितली. तसेच, सध्या जी कामे सुरू आहेत ती करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी पुलाबाबत काेणतेही आश्वासन दिले नाही.

अजिंठा रस्त्याबाबत मला लाज वाटतेय...

अजिंठा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत खंत व्यक्त करताना गडकरी म्हणाले, 'हा रस्ता खूपच खराब झाला आहे. कंत्राटदार पळून गेल्यामुळे काम थांबले होते. त्यामुळे पर्यटक येणे बंद झाले आहे. याबाबत मला खरच लाज वाटतेय. आता रस्त्याचे काम पुन्हा सुरू होईल आणि काम झाल्यानंतर पुन्हा पर्यटक येण्यास सुरुवात होईल. वेरूळ-अजिंठ्यामुळे जगभरातले पर्यटक इथे येतात. त्यामुळे पर्यटन क्षेत्र वाढेल.'