आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर ट्रकचालकाचा खून करून दरोडेखोर झाले फरार..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राष्ट्रीय महामार्गावर व्याळा जवळील जम्मू ढाब्यावर दरोडेखोरांनी बुधवारी रात्री उच्छाद मांडला. त्यात त्यांनी एका ट्रकचालकाचा धारदार शस्त्रांनी खून केला व ट्रकमधील रक्कम लुटून नेली. तसेच ट्रकचालकाला मारहाण होत असताना त्या दिशेने धावून गेलेल्या वेटरच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. त्यानंतर बराचवेळ या ५ ते ६ दरोडेखोरांनी हायवेवर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. 


विजय राय जगन्नाथ राय (अंदाजे वय ४०) रा. (लुधियाना, पंजाब) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. हा चालक एच.आर.६३बी ६६५७ या क्रमांकाचा कंटेनर घेऊन खामगावकडे जात असताना पारस फाट्यावर असलेल्या जम्मू ढाब्यावर तो बुधवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान जेवणासाठी थांबला होता. ढाब्यावर जेवण करून तो कंटेनरकडे वळला असता अंदाजे पाच ते सहा दरोडेखोरांनी चालकावर हल्ला चढवला.

 

त्यानंतर त्याने आरडाओरडा केली असता ढाब्यावर असलेल्या कामगारांनी त्याच्याकडे धाव घेताच दरोडेखोरांनी कामगारांच्या दिशेने दगडफेक केली. त्यानंतर ट्रकमध्ये घुसले. ट्रकमधील सामान आणि रक्कम घेऊन ते महामार्गावरील एका शेतात गेले. तर दरोडेखोरांपैकी एकाने चालक विजय रायच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. 


यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी कंटेनरच्या कॅबिनमधील काही रोकड लुटली. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथूनच काही अंतरावर असलेल्या शिवनेरी ढाब्याकडे आपला मोर्चा वळवला. तेथे झोपलेल्या एकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून काही पैसे व मोबाइल घेऊन दरोडेखोर पसार झाले. रात्री साडेबारा वाजता घटनेची माहिती बाळापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिस दाखल झाले होते. 


गुरुवारी सकाळी पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, एसडीपीओ सोहेल खान यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेचा तपास ठाणेदार गजानन शेळके, सहायक पोलिस निरीक्षक वैभव पाटील करीत आहेत. श्वानपथकाने केली घटनास्थळाची पाहणी 
श्वानपथक व ठसेतज्ज्ञ गुरुवारी सकाळी घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी श्वानाने शेजारी शेतातून माग काढला होता. पोलिसांनीही ट्रकमधील काही ठिकाणचे ठसे घेतले. 


हायवेवर लुटमार नित्याचीच 
हायवेवर अनेकदा लुटमारीच्या घटना घडतात. मात्र लुटमार थोपवण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे लुटमार करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची परिणती आज हत्याकांडात घडली. अशा घटना का होतात? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...