Maharashtra Special / नाशकातील मुथूट फायनान्समध्ये दरोडा; गोळीबारात एकाचा मृत्यू तर तीन जखमी

सॅम्युअल यांनी सायरन वाजवताच दरोडेखोरांनी घातली गोळ

दिव्य मराठी वेब

Jun 15,2019 11:41:14 AM IST

नाशिक/सिडको - नाशकातील मध्यवस्तीत सिटी सेंटर माॅलनजीक उंटवाडी येथील मुथूट फायनान्समध्ये भरदिवसा मास्क घालून आलेल्या चाैघांनी दरोडा टाकत केलेल्या गोळीबारात ऑडिटर मुरियायिकारा साजू सॅम्युअल यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी अतिशय वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने शहर हादरून गेले. घटनेनंतर उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, दरोडेखोर तोवर पळून गेले. फायनान्सचे व्यवस्थापक चंद्रशेखर देशपांडे, कैलास जैन व अाणखी दोघे जखमी झाले आहेत.


नागरिकांचा संताप, पाेलिस निरुत्तर : भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी फायनान्स कार्यालयात घुसून दरोडेखोरांनी केलेल्या गाेळीबाराच्या घटनेनंतर दाखल झालेल्या वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांना बघून उपस्थित नागरिकांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. स्थानिक नागरिकांचा वाढता संताप लक्षात घेता पाेलिस अधिकारी निरुत्तर हाेऊन तपास कामाला लागले.

सकाळी ११ वाजता...मधुरा टॉवर्स
शुक्रवारी सकाळी बँका उघडण्याच्या वेळातच उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवर्स इमारतीतील पहिल्या मजल्यावर असलेल्या मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दराेडा पडला. येथे सोने तारण ठेवून कर्ज देण्याचा व्यवहार होतो. सकाळी ११ च्या दरम्यान व्यवहार सुरू हाेताच काही वेळात ताेंडाला मास्क लावून अालेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी बँकेच्या कार्यालयात प्रवेश केला. ग्राहकांसह कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हर व शस्त्रांचा धाक दाखवत त्यांच्याकडील माेबाइल काढून घेतले.

सायरन वाजला आणि...
दरोडेखोरांनी शुद्ध मराठीत कॅशियरसमाेर उभे राहून दागिने, राेकड काढून द्या, अशी सूचना दिली. ताेच बँकेचे मुंबईतील अाॅडिटर संजू सॅम्युअल यांनी धोक्याची सूचना देणारा भोंगा (सायरन) वाजवला. सायरन वाजताच दरोडेखोरांनी सॅम्युअल यांना बाजूला घेत त्यांच्यावर पिस्तुलाने गोळीबार केला. अारडाअाेरड झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांनाही दरोडेखोरांनी पिस्तूल डाेक्यावर मारत जखमी केले. सॅम्युअल यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घाेषित केले.

डोळ्यादेखत घातली गोळी... अनेकांनी गोळीबाराचा हा थरार पाहिला. घटना घडत असताना बोलता येईना, ना ओरडता येईना. जो बोलला त्याला गोळ्या घातल्या. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी सर्वांनी फक्त श्वास रोखून ही घटना पहिली. दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर काही उपस्थितांनी पोलिसांना फोन केले. इतरांकडे मदत मागितली.

पाेलिस आयुक्तांसह फाैजफाटा दाखल
पाेलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पाैर्णिमा चाैघुले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, शीघ्रकृती दलाचे जवान, कमांडाे पथक घटनास्थळी दाखल झाले. नांगरे पाटील यांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेण्याचे आदेश दिले. शहराची नाकेबंदी करण्यात आली. जागोजाग पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली असून शहरात दिवसभर दहशतीचे वातावरण होते.

X
COMMENT