आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा/ चड्डी-बनियनधारी दरोडेखोरांनी चौघांना मारहाण करत ६ लाखांचा ऐवज लुटला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी-वसमत रस्त्यावरील दत्तधाम परिसरात गुरुवारी(दि.३०) पहाटे तीनच्या सुमारास चार ते पाच जणांच्या चड्डी-बनियन परिधान केलेल्या चोरट्यांच्या एका टोळक्याने दरोडा टाकून घरातील चार जणांना जबर मारहाण करत सुमारे सहा लाख रुपयांचा एेवज लंपास केला. दरोडेखोरांनी महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेले. याप्रकरणी नवा मोंढा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला आहे. 


दत्तधाम परिसरातील शांतीवन कॉलनी येथे ऋषिकेश वासुदेव चक्रवार (वय ३२) हे पत्नी अंकिता, वडिल वासुदेव (वय ६५), आई सविता (वय ६०) लहान भाऊ हरिकृष्ण(वय ३०) यांच्यासह गेल्या पाच वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांचे शहरातील मध्यवर्ती भागातील कडबी मंडई येथे किराणा मालाचे दुकान आहे. १५ दिवसांपूर्वी त्यांच्याकडे मावशी, आजी व मावशीचा नातू असे नातेवाइक सुट्टयानिमित्त आले होते. ही सर्व मंडळी बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झोपी गेली. परंतु पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ऋषिकेश यांना बाहेरच्या खोलीतून आरडाओरड ऐकू आली. त्यामुळे ते खोलीच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांना मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी हाफचड्डी-बनियन व तोंडाला रुमाल बांधलेल्या तिघा दरोडेखोरांकडून ऋषिकेश यांचे अाईवडील व लहान भावाला जबर मारहाण सुरू होती. ऋषिकेश यांनीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही या तिघा जणांनी जबर मारहाण केली. घरातील कपाट उघडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले. जाताना त्यांनी महिलांच्या अंगावरील दागिने  ओरबाडून नेले. यामुळे महिलांच्या कान न नाकाला दुखापत झाली.  


चक्रवार यांनी शेजारी असलेल्या कैलास पामे यांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षास या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी धावले.  या दरोड्याच्या प्रकारात जखमी झालेल्या चक्रवार यांची आई सविता, वडिल वासुदेव व भाऊ हरिकृष्ण यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. भाऊ हरिकृष्ण यांच्या डोक्यास गंभीर दुखापत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  


नियोजनबद्धरीत्या टाकला दरोडा
दरोडेखोरांनी हा दरोडा अतिशय नियोजनबद्ध  पद्धतीने टाकला असल्याचे दिसून आले. चारही चोरटे चड्डी-बनियन परिधान केलेले व तोंडाला रुमाल बांधलेले होते. विशेषतः ज्या भागात त्यांनी हा दरोडा टाकला. तो भाग कारेगाव गावालगत विस्तीर्ण व मोकळ्या परिसरात आहे. त्याप्रमाणे एकाने घराबाहेर उभे राहून तिघांनी घरात प्रवेश केला. त्यातील दोघांनी मारहाण करीत एकाने ऐवज लुटला असल्याचे दिसून आले. विशेषतः त्यांच्यातील संभाषण  मराठीतील होते. ऋषिकेश यांना धमकी देतानाही आम्हाला तुमच्या घरातील जे काही आहे, ते नेऊ दे. मध्ये पडला तर मारून टाकू, अशी धमकी देखील दिली.

 

१५ तोळे सोन्यासह चांदी लांबवली
ऋषीकेश चक्रवार यांनी या प्रकारा संदर्भात नवा मोंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत चार चोरट्यांनी घरावर दरोडा टाकत १५ तोळे सोन्याचे दागिने, ५० हजार रुपयांचे चांदीचे दागिने तर पाच हजार रुपयांची रोख रक्कम लांबवल्याचे म्हटले आहे. जवळपास ६ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.