आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या वसाहतीत एकाच रात्रीत फोडली चार घरे; किमान ३ लाखांचा ऐवज लांबवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पोलिसांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारा वैभव, जटवाडा येथे मंगळवारी (११ सप्टेंबर) रात्री चोरट्यांनी दोन तासांत चार घरे फोडली आणि सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज पळवला. पोळा, गणपती आणि महालक्ष्मीच्या सणासाठी गावाला गेलेल्या कुटुंबीयांचे घर हेरून चोरट्यांनी घर फोडून सामान लंपास केले. चारही घरे फोडण्याची पद्धत सारखीच आहे. समोरच्या दरवाजाच्या कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. 


शिवानंद रामचंद्र शेळके हे सेवानिवृत्त असून मुलांसोबत सारा वैभव येथे वास्तव्यास आहेत. मुलगादेखील खासगी कंपनीत कामाला आहे. पूर्ण कुटुंब कामानिमित्त गावाला गेले असताना चोरट्यांनी आत प्रवेश करत घरात ठेवलेले सुमारे पाच तोळे सोने आणि २५ हजार रुपये रोख चोरले. पोळ्याच्या सणासाठी तीन दिवसांपासून गावाला गेलेले कैलास पालोदकर यांच्या कंपाउंड वॉलवरून आत प्रवेश करत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कोंडा तोडला व आत प्रवेश करून सोन्याचे कानातले दागिने चोरले. मुकेश इधाटे हे बुलडाणा सहकारी बँकेत लिपिक पदावर कामाला आहेत. मंगळवारी रात्री ते सावंगीजवळील सारा परिवर्तन येथे सासुरवाडीत गेले असताना त्यांचे घर फोडले. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. या वेळी नातेवाइकांनी सोन्याचे दागिने भेट दिले होते. 


शिवाय पैशाच्या स्वरूपातदेखील आहेर केला होता. ती पैशाची पाकिटे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळवले. मेडिसिन कंपनीत काम करणारे अभिषेक सुभाष देशपांडे हे मंगळवारी दुपारीच गावाला गेले होते. त्यांचे घरदेखील चोरट्यांनी साफ करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळवली. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजश्री आढे, उपनिरीक्षक सरवर शेख, हवालदार थोरात, शिपाई गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक विजय जाधव योगेश गुप्ता, रितेश जाधव आणि त्यांच्या पथकानेदेखील घटनास्थळाची पाहणी केली. 


सीसीटीव्हीत दोन संशयित 
चोरी झाली त्या गल्लीत आणि सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. या दोन्ही सीसीटीव्हीत दोन तरुण संशयित दिसत आहेत. पहाटे तीन ते चारच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर ही चारही घरे फोडण्यात आली. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. 


श्वानपथकाने काढला माग

ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला बोलावण्यात आले होते. श्वान हिराला एका घरातील तुटलेल्या कुलपाचा वास देण्यात आला तेव्हा तिने माग काढत सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ नेऊन सोडले. त्यामुळे चोरट्यांनी अख्खी सोसायटी पालथी घातली आणि कुलूप असलेले घर फोडल्याचा संशय आहे. एम. एन. तनपुरे, पी. जी. दळवी, सी. एन. बागूल यांचा श्वानपथकात समावेश होता. 


बेगमपुऱ्यात वृद्धाच्या घरात मध्यरात्री घुसून लुटले १० हजार रुपये 
बेगमपुऱ्यातील पोस्ट ऑफिससमोर राहणाऱ्या ८३ वर्षीय वृद्धाच्या घरात घुसून अंदाजे २५ ते ३० वयोगटातील चोरांनी मारहाण करून घरातील १० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास घडली. प्रभाकर विष्णू पोंक्षे यांचे पोस्ट ऑफिससमोर दुमजली घर असून ते एकटेच राहतात. परिसरातच काही अंतरावर त्यांच्या मुली राहतात. दुसऱ्या मजल्यावरील एक दरवाजा उघडाच असतो. याचा गैरफायदा घेत चोरांनी दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्या दरवाजातून घरात प्रवेश करत चोरीसाठी शोधाशोध सुरू केली. याची चाहूल लागल्याने पोंक्षे झोपेतून जागे झाले. पोंक्षे उठल्याचे लक्षात येताच एकाने त्यांच्या तोंडावर बुक्का मारला. यात त्यांच्या नाकातोंडातून रक्तस्राव सुरू झाला व पोंक्षे घाबरले. यात दुसऱ्या चोराने समोर ठेवलेल्या पिशवीतील दहा रुपये रोख रक्कम घेतली व दोघांनी पोबारा केला. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डी. व्ही. सुुंदर्डे तपास करत आहेत. 


एकापाठोपाठ एक घटना 
सारा वैभव सुमारे ४०० घराची सोसायटी आहे. बुधवारी पहाटे एकापाठोपाठ एक घरफोडी उघडकीस येत होती. शेजारी गावाला गेलेले असतानादेखील घर उघडे कसे हे पाहताच घरफोडी झाल्याचे समोर आले. एका घरासमोर फुले तोडण्यासाठी महिला जमा झाल्या. त्यानंतर घर उघडे दिसले. आवाज दिला तरी कोणीही घराच्या बाहेर आले नाही. म्हणून आत डोकावून पाहिले असता घरात चोरी झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी चोरी करून पुन्हा बाहेरून कडी लावून घेतली व पडदा टाकला. त्यामुळे घरफोडी झाल्याचे लवकर लक्षात आले नाही.

 
पोलिसांची गस्त नावालाच 
या भागात पोलिसांची गस्त कमी झाल्यामुळे चोरट्यांची हिंमत वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. शहरात गेल्या काही दिवसांपासून ११ वाजता दुकाने बंद करणारे पोलिस घरफोड्यांना पकडण्यात मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत. सारा वैभव येथील बहुतांश पथदिवेदेखील बंद पडले आहेत. सोसायटीने याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवाय सुरक्षा रक्षक किंवा मुख्य चौकात सीसीटीव्हीदेखील लावलेले नाहीत. चार वर्षांपूर्वी या भागात असाच प्रकार घडला होता. तीन घरांत एकाच रात्री चोरी झाली होती. त्यानंतरही येथील रहिवाशांनी सुरक्षेकडे लक्ष दिले नाही. त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. 

बातम्या आणखी आहेत...