आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरा पोलिस गस्तीवर असतानाही सिल्लोडमध्ये तीन ठिकाणी दरोडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - सिल्लोड शहरालगत असलेल्या तीन जिनिंग प्रेसिंगवर मंगळवारी(दि.२) मध्यरात्रीनंतर दरोडा टाकून दराेडेखाेरांनी एकवीस हजार रुपये किमतीच्या डाॅलरसह १५ लाख ९२ हजार रुपये दरोडेखोरांनी लुटले.  दराेडेखाेरांनी नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील कपाटेही तोडली. अकरा पोलिसांची गस्त सुरू असतानाच घडलेल्या या दराेड्यांच्या प्रकारामुळे सिल्लोड शहरात दहशत निर्माण झाली आहे. 


चार चाकी वाहनातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी सिल्लोड -अजिंठा महामार्गावरील हरीओम जिनिंग प्रेसिंगच्या दक्षिण बाजूच्या संरक्षण भिंतीवरून मंगळवारी (दि.२) रात्री एक वाजून सोळा मिनिटांनी आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी तिजोरी फोडून सत्तर हजार रुपये रोख व एकवीस हजार रुपये किमतीचे डाॅलर लंपास केले. दराेडेखाेर जवळपास पाऊण तास याच परिसरात फिरले. 


एक वाजून पंचावन्न मिनिटांनी ते येथून बाहेर पडले. यानंतर दरोडेखोरांनी सिल्लोड डोंगरगाव रस्त्यावरील पुनित एंटरप्रायझेस फाेडून १० लाख  ६४ हजार तर याच जिनिंगच्या शेजारील शिवम जिनिंगमधून ४ लाख ६७ हजार अशी  एकूण १५ लाख ९२ हजार रुपयांची लूट केली.  सिल्लोड डोंगरगाव रस्त्यावर नॅशनल एज्युकेशन सोसायटीची शाळा असून या शाळेची  कपाटेही दराेडेखाेरांनी फाेडली. मात्र त्यात काहीच सापडले नाही. यानंतर दरोडेखोर सिल्लोड शहरालगत असलेल्या भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावाकडे निघून गेले. तेथेही त्यांनी देशी दारूचे दुकान फोडल्याची माहिती हाती आली आहे. 


रखवालदारही बेखबर
हरीओम जिनिंगचा रखवालदार समाधान राऊत सकाळी कार्यालयासमोरील दिवे बंद करण्यासाठी आला असता त्याला दरवाजाचे कुलुप तुटले असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने हरीओमचे  मालक बंटीसेठ अग्रवाल यांना झाला प्रकार कळवला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिल्लोड ग्रामीण  ठाण्याचे पो. नि. विश्वास पाटील यांनी घटनास्थळास भेट दिली. 


नाकेबंदीदरम्यान दरोडे
मंगळवारी अमावास्या असल्याने नेहमीप्रमाणे पोलिसांची नाकेबंदी सुरू होती. याच दरम्यान पोलिसांच्या नाकावर टिच्चून दरोडेखोरांनी तीन दरोडे टाकल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त हाेत आहे. पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी सांगितले की, रात्री अकरा पोलिसांसह ते गस्तीवर होते. एका रखवालदाराने जरी सजगता दाखवली असती तर दरोडेखोरांनी पकडण्यासाठी प्रयत्न करता आले असते. 


गुन्हेगार पोलिसांवर भारी
मागच्या वर्षभरातील पोलिसांची कार्यशैली पाहता गुन्हेगारांना पकडणे हे पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे काम दिसत आहे. मागच्या वर्षभरात झालेल्या चोऱ्या, रोख रक्कम लुटीसाठी करण्यात आलेला खून, अशा विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...