आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोधेगावात दोन सराफांची दुकाने फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोधेगाव- येथील मुख्य बाजारपेठेतील व शेवगाव-गेवराई मार्गालगत शेजारी-शेजारी असलेली दोन सराफांची दुकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडण्यात आली. शटर अर्ध्यापर्यंत वाकवून फोडून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने असा ८० हजारांचा लंपास करण्यात आले. या घटनेमुळे गावातील दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली. 


मोठी रहदारी असलेल्या रस्त्यावरील ही दुकाने कुठलाही आवाज न होऊ देता कशी फोडली, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. येथील सर्व सराफा दुकानदार बँकेची लॉकर सुविधा वापरत आहेत. त्यामुळे दुकानात शिल्लक असलेली किरकोळ रक्कम व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचीच चोरी झाली असल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. एकाच वेळी दोन दुकाने फोडल्याने दुकानदार धास्तावले असून त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


बोधेगाव येथील मुख्य बाजारपेठेत शेवगाव-गेवराई राज्यमार्गालगतच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही दोन सराफी दुकाने आहेत. नित्यनियमाप्रमाणे संध्याकाळी बंद केलेली दुकाने पहाटे पाचच्या सुमारास फिरण्यास गेलेल्या युवकांना फुटल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ दुकानमालकांना कळवले. कृष्णकांत वसंतराव अधापुरे यांच्या मालकीचे जय गणेश ज्वेलर्स व देवीदास नानासाहेब शहाणे यांच्या मालकीचे शहाणे सराफ नावाचे दुकान नागेबाबा पतसंस्थेसमोर शेजारी-शेजारी आहेत. या दोन्ही दुकानांचे मध्यभागातील लॉक चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडून शटर अर्ध्यावर वाकवून दुकानात प्रवेश केला. या दोन्ही दुकानांतून चोरट्यांनी चांदीचे दागिने, मोड म्हणून आलेले सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लांबवली. किती रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला, याबाबत दुपारी उशिरा तक्रार देण्यात आली. शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत ८० हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे म्हटले आहे. 

 

शटर वर उचलताना कुठलाही आवाज वा चोरीबाबतचा संशय आसपासच्या रहिवाशांना, रस्त्यावरुन मार्गक्रमण करणाऱ्या वाटसरुंना किंवा शेजारील नागेबाबा पतसंस्थेच्या सुरक्षा रक्षकांना न आल्याने बहुदा हे शटर हायड्रोलिक जॅकच्या साहाय्याने उघडले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना सकाळी मिळताच बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल बबन राठोड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. 


कुठल्या साधनांचा वापर केला? 
चोरी झालेल्या घटनास्थळापासुन जिल्हा सहकारी बँक, सेंट्रल बँक, नागेबाबा पतसंस्था अगदी हाकेच्या अंतरावर आहे. यापूर्वी जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. रात्रंदिवस रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यालगतची ही दुकाने चोरट्यांनी फोडली कशी? त्यांनी कुठल्या साधनांचा वापर केला असेल, जेणेकरून शटर तोडताना कुठलाही आवाज वा चोरीचा संशय कुणालाही कसा आला नाही? याबाबत उलटसुलट चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...