Robbery / चौघांनी कुत्री हाकलली, २० मिनिटे कुलूप न तुटल्याने दरोडा टळला!

२० दिवसांपासून गावात अंधार, सीसीटीव्ही फुटेज हस्तगत

प्रतिनिधी

Jul 30,2019 08:35:00 AM IST

तळणी - रोहित्र खराब असल्यामुळे गावात अंधार असल्याचा फायदा घेऊन सहा चोरटे चारचाकी वाहनाने आले. ते किराणा दुकान व बॅँक फोडण्यासाठी दुकानाचे चॅनल गेट तोडण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, याप्रसंगी कुत्रे भुंकू लागल्याने चार जण त्यांना हाकलत होते. तर दोन जण चॅनल गेटचे कुलूप तोडत होते. परंतु, कुलूप आतल्या बाजूने असल्यामुळे २० मिनिटे ते तुटले नाही. तसेच आवाज येतोय म्हणून घरातून एक जण उठल्याचे पाहून चोरट्यांनी पळ काढल्यामुळे किराणा दुकान व लागून असलेल्या बँकेवरील दरोडा टळला. ही घटना मंठा तालुक्यातील तळणी येथे सोमवारी मध्यरात्री घडली.


तळणी येथील व्यापारी कैलास राऊत यांचे किराणा दुकान आहे. या दुकानाला लागूनच महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. मध्यरात्री चोरट्यांनी येऊन ही दोन्ही प्रतिष्ठाने लुटण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. सर्व चोरटे एका चारचाकी वाहनातून तोंडाला रुमाल बांधून आले होते. दरम्यान, तळणी येथील गावातील वीजपुरवठा खंडीत असल्यामुळे अगोदरच गावात लाईट नाही. रोहित्र जळूनही २० दिवसांचा कालावधी उलटला. तरीही महावितरण कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे. या अंधाराचाच फायदा घेत चोरट्यांनी बॅँक व किराणा दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु कुत्रे भुंकणे, चॅनेल गेटचे कुलूप न तुटल्यामुळे हा दरोडा वाचला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तळणी परिसरातील २१ गावांसाठी केवळ दोनच पोलिस कार्यरत आहेत. त्यातही एकाकडे कार्यालयीन समन्स ने-आण करण्याचे काम आहे. अतिरिक्त पोलिस देण्यासाठी वारंवार मागणी केली आहे. यामुळे या परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

पाेलिसांनी गस्त वाढवावी
तळणी येथे झालेल्या या दरोड्याच्या प्रयत्नामुळे पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली आहे. परंतु पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
कैलास राऊत, व्यापारी तळणी

फुटेजच्या आधारे तपास
तळणी येथे घडलेला प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. त्या आधारे चोरट्यांना शोधण्यासाठी पथक काम करणार आहे. रिक्त जागांचाही अहवाल देणार आहे.
व्ही. डी. निकम, पोलिस निरीक्षक, मंठा.

X
COMMENT