आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर न्यायाधीशांना महत्त्वाच्या खटल्यात लक्ष देता यावे यासाठी एस्टोनिया देशात जगातील पहिला रोबोट न्यायाधीश विकसित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 टालिन  - उत्तर युरोपातील एस्टोनिया या छोटेखानी देशाने जगातील पहिला न्यायाधीश रोबोट विकसित केला आहे. छोट्या न्यायालयांत प्रलंबित प्रकरणात हा रोबोट न्यायाधीश न्यायदान करेल. इतर न्यायाधीशांवरील कामाचा बोजा कमी होऊन त्यांना महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी करता यावी यासाठी हा रोबोट जज विकसित करण्यात आला आहे. यासाठी रोबोट न्यायाधीशाची कायदेशीर दस्तऐवजांसाठी प्रोग्रामिंग करण्यात येत आहे. एलगोरिदम आणि प्रशिक्षणाच्या आधारे त्याचे विश्लेषणही करण्यात येत आहे.  

 
छोट्या न्यायालयातील पाच लाख रुपयांपेक्षा कमी मूल्यांच्या प्रकरणात हे रोबोट न्यायाधीश सुनावणी करतील. रोबोट न्यायाधीशांनी दिलेला निर्णय कायदेशीरदृष्ट्या मान्य राहील. मात्र या न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयाला मानवी न्यायाधीशांच्या उपस्थितीत आव्हान देता येईल. मेअखेरपर्यंत हे रोबोट न्यायाधीश निर्णय देणे सुरू करतील. एस्टोनिया देश युरोपची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखला जातो. येथे डिजिटल क्रांतीचा वेग इतका प्रचंड आहे की, येथे ६०० ऑनलाइन सेवा पूर्वीपासूनच उपलब्ध आहेत. येथील मुख्य डेटा अधिकारी ओट वेल्सबर्ग यांच्या मते, रोबोट न्यायाधीशाचे विकासक त्याचे अंतिम परीक्षण करताहेत. विधी व्यावसायिकांकडून सल्ला आणि त्यांच्या अंतिम मंजुरीनंतर त्यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल.  वेल्सबर्ग सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) उपयोगांवर स्वीडनच्या उमेय विद्यापीठात पीएचडी. करताहेत. त्यांच्या मते, एआयच्या मदतीने सरकार जनतेशी संबंधित कामातील सरकारचा सहभाग कमी करू इच्छिते.


नवा व्यवसाय नोंदणीसाठी लागतात १८ मिनिटे   
एस्टोनियाची लोकसंख्या १४ लाख आहे. सार्वत्रिक निवडणुकांत ऑनलाइन मतदान सुरू करणारा हा जगातील पहिला देश आहे. येथे नवा व्यवसाय सुरू करण्याच्या नोंदणीसाठी फक्त १८ मिनिटे लागतात आणि पाच मिनिटांत टॅक्स रिटर्न भरता येतो. येथे शिक्षणही ऑनलाइन असून लोकांच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहितीचे ऑनलाइन नेटवर्क आहे. संपूर्ण देशात वायफाय आहे. जगातील सर्वात वेगवान बँडविद्थ येथे असून पार्किंगचे शुल्कही इंटरनेटद्वारे चुकते केले जाते.