आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम मायदेशी परतण्यास अनुत्सुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेकनाफ (बांगलादेश) - रोहिंग्या मुस्लिमांचे बांगलादेशातून म्यानमारला प्रत्यार्पण करण्याचा दुसरा प्रयत्नही गुरुवारी अपयशी ठरला. या रोहिंग्यांना घेऊन जाण्यासाठी ५ बस आणि १० ट्रक सज्ज ठेवण्यात आले होते. पण एकही जण समोर न आल्याने या वाहनांना परत पाठवावे लागले.

तेकनाफ येथील निर्वासित छावणीचे प्रमुख असलेले बांगलादेशचे अधिकारी खालेद हुसेन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही तासाभरापासून येथे वाट पाहत आहोत, पण म्यानमारला जाण्यासाठी एकही रोहिंग्या मुस्लिम येथे आला नाही. 

म्यानमारच्या रखाईन प्रांतात लष्कराने २०१७ मध्ये केलेल्या कारवाईनंतर जवळपास ७ लाख ४० हजार रोहिंग्या मुस्लिमांनी देश सोडून बांगलादेशात आश्रय घेतला आहे. म्यानमारने आमच्या सुरक्षेची आणि नागरिकत्वाची हमी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. अगदी मोजकेच रोहिंग्या मुस्लिम म्यानमारला परतले आहेत. म्यानमारचे परराष्ट्र सचिन मिंट थू यांनी गेल्या महिन्यात निर्वासितांच्या छावणीला भेट दिली होती. त्यानंतर त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने पडताळणी करण्यासाठी म्यानमारला २२ हजार निर्वासितांची यादी पाठवली होती. म्यानमारने त्यापैकी ३, ४५० लोकांच्या नावाला मंजुरी दिली होती. 
 

अंतर्गत छावण्यांत पाठवले जाण्याची भीती
रोहिंग्या समुदायाचे नेते जफर आलम यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मायदेशी परत पाठवण्याचा दुसरा टप्पा जाहीर झाल्यानंतर निर्वासितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. म्यानमारमध्ये परत गेल्यानंतर आपल्याला अंतर्गत विस्थापित नागरिकांसाठीच्या छावण्यांत पाठवले जाईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी न्यूयाॅर्कमध्ये सांगितले की, ज्या रोहिंग्यांची इच्छा असेल त्यांनाच म्यानमारला परत पाठवले जाईल. ही एेच्छिक बाब आहे.
 

बातम्या आणखी आहेत...