आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडांचाही परस्पर संवाद, अन्न-संकेतांची देवाणघेवाण!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीचे दिवस येऊ घातलेत. मान्सूनही चांगला झालाय. पण दुर्दैवाने काही भागात पूरस्थितीमुळे गंभीर चित्र आहे. देशातील या बदलत्या वातावरणासह अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करायला आपण शिकले पाहिजे. यात झाडे आणि जंगलाच्या संरक्षणाची भूमिका खूप मोठी आहे. दुष्काळाच्या दृष्टीने आपण पाणी साठवून मातीचीही धूप थांबवू शकतो. हल्ली झाडे आणि पर्यावरणासंबंधी मुद्दे नेहमीच बातम्यांमध्ये असतात. शहरी भारतातील नव्या पिढीलाही आरोग्यासाठी झाडे किती आवश्यक आहेत, याची जाणीव होत आहे. कदाचित यामुळेच आता एक नवी ‘चिपको पिढी’ तयार होतेय. मुंबईतील आरे मिल्क कॉलनीत वृक्षतोडीविरोधात तरुण रस्त्यावर उतरले. या शहरात शुद्ध हवा देणारी एकमेव आशेचा किरण म्हणजे ही झाडे असावीत.  या शहरात मागील २० वर्षांमध्ये सर्वात अशुद्ध हवा २०१८ मध्ये आढळून आली. मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या लोकांना वृक्षतोडीचे महत्त्व नक्कीच कळते, याची मला खात्री आहे. जगभरातील तरुणांप्रमाणे हे तरुणदेखील पर्यावरण आणि विकास यादरम्यान ताळमेळ बसवण्याची विनंती करत आहेत. रिअल इस्टेट आणि मेट्रोसाठी शेड बनवण्याची किंमत काय असू शकते, याची माहिती त्यांना आहे. मात्र एका जंगलाची किंमत काय असू शकते, याचे मूल्यमापन करणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. जंगल किंवा झाडे काही मिनिटांमध्ये कापली अथवा जाळता येतात. पण ती या स्थितीत येण्यासाठी अनेक दशके लागतात. मग वायुप्रदूषण, तापमानवाढ अशा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. मुंबईसारख्या किनारी भागात झाडे, ओलिताखालील क्षेत्र आणि खारफुटीमुळे पुराचा धोका टाळता येतो. त्यामुळे जास्तीत जास्त झाडांचे रक्षण करावे, हा ‘कॉमन सेन्स’ आहे.  वास्तवात झाडे उपचारही करू शकतात. जपानी लोक ‘जंगल स्नान’ करतात. तेथे त्याला शिनरिन-योकू म्हणतात. संशोधनानुसार, अशा प्रकारच्या स्नानामुळे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. ताण कमी होतो. त्यांच्या मते, पंचेंद्रियांचा अनुभव घेत जंगलात फिरले-बसले पाहिजे. काँक्रीटच्या जंगलात राहणारे लोक ही पद्धत अवलंबत आहेत. आपल्या परिसरातील उद्यानातही हा उद्देश पूर्ण होऊ शकतो.  वैज्ञानिकदेखील झाडांवर अनेक प्रयोग करत आहेत. नव्या संशोधनातून नवी माहिती हाती येत असून त्याला आता वूडवाइड वेब म्हटले जाते. वर्ल्डवाइड वेब ज्याप्रमाणे जगाची माहिती देवाणघेवाणीचे नेटवर्क आहे, तशीच झाडांचीही एक जटिल संवाद प्रणाली आहे. तीदेखील ४.५ कोटी वर्षांपूर्वीची. माणसांच्या चेतासंस्थेसारखी झाडांचीही एक प्रणाली असते, ज्याद्वारे ते परस्परांशी संवाद साधू शकतात. लक्षातही ठेवू शकतात. जीवाणू आणि बुरशीचे जाळे वापरून परस्परांना अन्न आणि ज्ञान पुरवतात. झाडांच्या मुळावर असलेली बुरशी तेथून शर्करा घेते आणि त्याबदल्यात नायट्रोजन व फॉस्फरस देत झाडांना पोषण देते. झाडे व बुरशीदरम्यानचे मायकोरिजल नेटवर्क इतर गरजू झाडांना अन्न देण्यासाठी कामी येते. रासायनिक संकेतांद्वारे ते शिकारी किंवा आक्रमक प्रजातींच्या धोक्यांचा इशाराही देतात, जेणेकरून झाडे धोकादायक हार्मोन्स किंवा रसायन निर्मिती करून स्वत:ला  वाचवू शकतील. जंगलात अचानक आलेल्या संकटावेळी उदा. वृक्षतोडीच्या वेळी झाडे परस्परांना तणावाचे संकेतही देऊ शकतात. बुरशीद्वारे तयार केलेले कम्युनिकेशन नेटवर्क जंगलातील व्यवस्थापन मजबूत ठेवते. काही बुरशी आणि झाडांमध्ये विशेष नाते असते. बहुतांश झाडे आपल्या प्रजातीतील झाडांशी संवाद साधतात.  झाडांमधील या संवादामुळे ते निरोगी राहतात, असेही संशोधन सांगते. शहरांमधील बहुतांश झाडे एकटीच असतात. काँक्रीटच्या इमारतींमध्ये ते संवाद साधू शकत नााहीत, त्यामुळे त्यांचे बुरशीचे नेटवर्कही संपुष्टात आलेले असते. त्यामुळे त्यांचे वय आणि जीवन जगण्याची शक्ती कमी होते. झाडे लावण्याची मोहीम हाती घेणाऱ्या शहरी लोकांनी हे समजून घेतले पाहिजे. तसेच वृक्ष लागवड करताना हे  लक्षातही ठेवले पाहिजे. आपण एकाच प्रजातीची झाडे समूहात लावली पाहिजेत, तसेच त्यांच्यामधील जमीन अतिक्रमणमुक्त ठेवली पाहिजे.  आपले नशीब झाडांवर अवलंबून आहे. झाडे जगण्यासाठी निरोगी पर्यावरण आवश्यक आहे. आपल्या जीवनासाठी निरोगी झाडांची गरज आहे. झाडांना बुरशीच्या नेटवर्कची गरज असते त्यामुळे आपणास झाडांच्या मुळाशी वास्तव्यास असणाऱ्या विविध जैवसंपदेचेही  जतन करावे लागेल. काही दिवसांवर विजयादशमी आहे. त्यानिमित्त झेंडुच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते. परस्परांची भेट घेऊन आपट्याची पाने दिली-घेतली जातात. आपल्या आनंदाच्या क्षणी झाडांना एवढे महत्त्व प्राप्त झालेले असताना झाडांबद्दल नवीन माहिती जाणून घेणे आपले कर्तव्य आहे.  देवी-देवतांना नमन करताना आपण सहकुटुंब एकत्र येऊन काही वेळ या मायकोरिजल नेटवर्कविषयी विचार करावा. झाडांच्या मुळांवर वाढणाऱ्या, त्यांना पोषण देणाऱ्या जैवसंपदेचाही विचार व्हावा. अखेर, सण-उत्सव हे आपली पवित्र भावना जिवंत ठेवण्यासाठीच साजरे केले जातात. पृथ्वीवरील आयुष्यांच्या या जटिल जाळ्यात एका नव्या जालाची ओळख आपण करून घेऊयात.


रोहिणी निलेकणी
संस्थापक, अध्यक्ष, अर्घ
्यम