आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीचा ड्रामा : माढा- मावळवरून परिवारात तिढा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा मतदारसंघातून शरद पवार यांची माघार आणि मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील कलहाचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र, ‘आमचे कुटुंब सक्षम असून कोणताही अंतर्गत संघर्ष नाही,’ असे स्पष्टीकरण पवारांचे नातू राेहित राजेंद्र पवार यांनी दिले. पार्थची उमेदवारी ही मावळ मतदारसंघातील जनता, कार्यकर्ते आणि इतर पक्षांच्या मागणीतून आली आहे. आपण लोकसभेसाठी इच्छुक नाहीतच. पार्थसोबत आपली कोणताही संघर्ष किंवा स्पर्धा नाही. विराेधक केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी अशा चर्चा घडवत आहेत. साहेबांनी निवडणूक लढवावी, ही मागणीही मी पार्थला विराेध म्हणून केली नसून कार्यकर्त्यांची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडली, असे स्पष्टीकरण राेहित यांनी दिले.   


प्रश्न : पवार साहेबांनी माघार घेऊ नये, अशी पाेस्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकलीत, त्यावरून कुटुंबातील संघर्ष चव्हाट्यावर आलाय..?
राेहित
: खरे तर त्या पोस्टचा आणि पार्थच्या उमेदवारीचा संबंध नव्हता. ती पोस्ट फक्त माढा मतदारसंघाबद्दल होती. कोणत्याही मतदारसंघातून पवार साहेबांनी निवडणूक लढवावी, आम्ही कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी त्यांना विक्रमी बहुमताने जिंकून आणू, पण साहेबांनी माघार घेऊ नये हे माझेच नाही तर माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याचे मत आहे. मी ते फक्त जाहीरपणे व्यक्त केले. त्याचा अर्थ माझा भाऊ पार्थच्या उमेदवारीस माझा विरोध आहे असं नाही.   


प्रश्न : अनुभव नसताना पार्थला थेट लोकसभेची उमेदवारी मिळते, हे अनेक वर्षांपासून सक्रिय तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्यायकारक नाही का?  
राेहित :
एक तर मी लोकसभा लढवणार नाही. त्यामुळे पार्थ आणि माझी स्पर्धाच नाही. शिवाय, पार्थची उमेदवारी ही मावळमधील लोकांची मागणी आहे. तिथे  राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नव्हता. विद्यमान खासदारांच्या कारभारामुळे पोकळी निर्माण झाली आहे. अशा वेळी गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमातून पार्थचा चेहरा पुढे आला. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी कामगार पक्ष या सर्वांचे मत पार्थच्या उमेदवारीस अनुकूल होते. त्यामुळे पार्थची उमेदवारी ही माझ्यावर किंवा कोणावरही अन्याय नाही.  


प्रश्न : तुम्ही जि.प.तून राजकीय सुरुवात केली. आता पुढील पायरी काय आहे?  
राेहित :
मी कृषी आणि युवक या क्षेत्रात कार्यरत आहे. सध्याचा ज्वलंत प्रश्न म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातील ढासळलेली अर्थव्यवस्था हा आहे. एकीकडे शेतीचे प्रश्न बिकट होत आहेत आणि दुसरीकडे खूप क्षमता असलेला माझा ग्रामीण तरुण िनराश होत आहे. त्याच वेळी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत काही ग्रामीण तरुण शेतीच्या प्रश्नांवर उपाय शोधत आहेत. त्यामुळे ग्रामीण तरुण आणि शेती या दोन्हीविषयी चांगले काम झाले तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था आणि भविष्यातील दिशा दोन्ही बदलण्याची ताकद ग्रामीण तरुणांमध्ये आहे. त्या दिशेने काम सुरू आहे. ते राज्यव्यापी करणार आहे.


प्रश्न : आता काेणाचा प्रचार करणार?
राेहित :
पार्थच्या उमेदवारीस माझा विरोध नाही, पवार साहेब जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी आम्ही सर्व जण असतोच. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आणि भाऊ म्हणूनही मी पार्थच्या पाठीशी असेन. त्याचा प्रचार करीन. पण पक्षसंंघटना म्हणून दक्षिण नगरमध्ये लक्ष केंद्रित करणार आहे. प्रत्येक उमेदवार पक्षासाठी महत्त्वाचा आहे. अधिकाधिक खासदार निवडून आणणे ही जबाबदारी आहे.


प्रश्न : दुसऱ्या पिढीत ताई विरुद्ध दादा असा संघर्ष होता आणि तिसऱ्या पिढीत आता रोहित विरुद्ध पार्थ  असेल का?
राेहित : अजिबातच नाही. संघर्ष तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. त्या पिढीपेक्षा पवारांच्या या पिढीत अधिक संवाद आहे. या कुटुंबाची ताकद काय आहे याची विरोधकांना कल्पना नाही. त्यामुळेच आमच्यात संघर्ष किंवा स्पर्धा असल्याच्या कागाळ्या केल्या जात आहेत. प्रत्यक्ष तसा काहीच वाद नाही.  


प्रश्न : पार्थ लोकसभेत आणि रोहित राज्यात अशी विभागणी झाली का?  
रोहीत : तसं ठरवून काही नाही. पण पवार कुटुंबाला कायमच जनतेचे प्रेम मिळाले आणि विरोधकांचे लक्ष्य व्हावे लागले. आम्ही सर्व जणच साहेबांचे कार्यकर्ते आहोत. साहेब जो निर्णय घेतील तो सर्वांसाठी अंतिम असतो. त्यामुळे कौटुंबिक कलहामुळे साहेब एकटे पडले किंवा पवार कुटुंबातील कौटुंबिक कलह चव्हाट्यावर या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. प्रत्येकाने आपापल्या परीने काम करणे आणि पक्षाच्या, साहेबांच्या आदेशाचे पालन करणे एवढेच यातील वास्तव आहे.  

बातम्या आणखी आहेत...