दरोडेखोरांचा आष्टीत धुडगूस; / दरोडेखोरांचा आष्टीत धुडगूस; 6 लाखांचा ऐवज पळवला,व्यापाऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

प्रतिनिधी

Nov 11,2018 12:08:00 PM IST

अाष्टी - दरोडेखोरांनी अगोदर पाठीमागील बाजुने व्यापाऱ्याच्या घरावर दगडफेक केली,त्यानंतर लोखंडी दरवाजा व आणखी दोन दरवाजे तोडून बेडरुममध्ये प्रवेश केला. धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील दागिने तसेच कपाटात ठेवलेले जवळपास २५ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. आष्टी गावातील या दरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असुन संतप्त व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या देत घटनेचा निषेध नोंदवला.


आष्टी (ता.परतूर) येथील व्यापारी असलेल्या देवीदास ढोके यांच्या घरावर मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. यात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातील तसेच कपाटात ठेवलेले सोने व रोख रक्कम असा ऐवज घेऊन पळ काढला. देवीदास ढोके यांचे माजलगाव रस्त्यावर भांडी असुन दुकानाच्या वर असलेल्या पहिल्या मजल्यावर त्यांचे घर आहे. रात्री घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यानंतर दरोडेखोरांनी पाठीमागील बाजुने घरावर दगडफेक केला. त्यानंतर गॅलरीतून घरात प्रवेश केला व समोरच्या किचन रुमचे लोखंडी गेट व आणखी दोन दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. देविदास ढोके यांची माहेरी आलेली मुलगी व ढोके यांच्या पत्नी आणि मुलगा ज्या खोलीत झोपले होते तेथे चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यावेळी इतर दोन रुमचे दरवाजे चोरट्यांनी बाहेरुन बंद केले होते. दरम्यान महिलांचा आरडा-ओरड ऐकून देवीदास ढोके यांना जाग आली मात्र त्यांच्या रुमचा दरवाजा बाहेरुन बंद होता.

व्यवसाय बंद ठेवून व्यापाऱ्यांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या

दोन महिन्यांपूर्वी अाष्टीचे माजी सरपंच केशवराव थोरात यांच्या घरावर दरोडा पडला होता. शिवाय लोणी येथेही दरोडा पडला होता. त्या दोन्ही गुन्ह्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच ही तिसरी घटना घडल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत बाजारपेठ बंद ठेऊन ठिय्या आंदोलन केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार यांनी दरोड्याचा तपास लावला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर,माजी सदस्य बळिराम कडपे, पंचायत समिती सदस्य रामप्रसाद थोरात,माजी सरपंच बाबाराव थोरात,राजेंद्र बाहेती,कृष्णा टेकाळे,नारायण पळसे,गोविंद दहिभाते, कांतीलाल सोनी,गौतम सिंगी,अशोक शेळके,सुमंता पाटील आदींची उपस्थिती होती.

पोटाला चाकू लावून दिली धमकी

दुसऱ्या खोलीतील आवाजाने मी जागा झालो तेव्हा माझ्या खोलीचे दार बाहेरुन बंद होते. मी जोरजोरात दरवाजा वाजवला तेव्हा एका दरोडेखोराने दरवाजा उघडला. त्यावेळी घरात तीन दरोडेखोर होते त्यापैकी एक बाहेर लक्ष ठेवायला उभा होता. तर घराच्या खालीही काही लोक उभे होते. त्यातील २० वर्षाच्या एका दरोडेखोराने मला चाकुचा धाक दाखला. ‘गडबड किया तो काट डालुंगा’ असे म्हणत त्याने माझ्या पोटाला चाकु लावला. त्यानंतर कपाटातील पैसे व इतर मुद्देमाल काढून घेल्याचे शाम ढोके म्हणाले.

तत्परता |एसपींची घटनास्थळी भेट

दुपारी पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सि.डी. शेवगन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजेंद्रसींह गौर,सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,पीएसआय राजधर पठाडे, सोपान चव्हाण, अमोल तिबुले आदींची उपस्थिती होती. यावेळी श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्वान ढोकमाळ रस्त्यावरील चौफुलीपर्यंतच घुटमळले.

X
COMMENT