आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवेदनशीलता कशात आहे…

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशीलता असण्यासाठी आपण बाई आहोत की बाप्या हे महत्त्वाचे नाही, फक्त संवेदनशीलता हवी….प्रत्येक व्यक्ती संवेदनशील झाली तर महिलांवरील अमानवी अत्याचार संपू शकतील.
 
परवा घराच्या मागच्या आंगणात मांजर आणि कुत्र्यांचा आवाज येऊ लागला. हळूहळू आवाज वाढत गेला. म्हणून घरातील सगळेच त्या दिशेला धावले. दार उघडून पाहिल्यावर समोरचे चित्र सर्वांनाच स्तब्ध करून गेले. एका मांजरीला चार कुत्रे चारही बाजूने धरून ओढत होते. ती जिवाच्या आकांताने ओरडत होती. आणखी एक सेकंद उशीर झाला असता तर त्या चौघांनी तिला अक्षरश: फाडले असते. हे  बघून लगेच कुत्र्यांना पळवून लावले. पाऊस सुरूच होता. 

ती मात्र जरा वेळाने कशीबशी सरकतच पुढच्या अंगणात येऊन एका झाडाखाली बसली. अन् दुसऱ्या दिवशीच्या दुपारी तिने जीव सोडला. ही मांजर म्हणजे परिसरातील सर्वच घरांसाठी वैताग होती. प्रत्येक जण तिला हटकत होते. जरा नजर चुकली की लगेच घरात घुसायची अन् वस्तूंची, खाद्यपदार्थांची नासाडी करायची. मात्र, ती अशा पद्धतीने गेली हा चटका प्रत्येकाला वेदना देणारा होता. वृत्तपत्र, टीव्हीतून बलात्कार आणि खुनाच्या अनेक बातम्या आपण वाचतो. पण, माणूस इतका असंवेदनशील झाला आहे की, त्या घटनांनी मन विचलीत होणे आता बंद झाले आहे. कोपर्डीची कन्या असो किंवा देश ढवळून निघालेली निर्भया असो. या घटनेत आणि त्या दोघींच्या घटनेत साम्य आहे. असे मला वाटले. महिलांचे शोषण आजही प्रत्येक पातळीवर सुरू आहे. प्रत्येकाला तिच्यावर हुकूमत हवी आहे. 

आपल्या आजबाजूला अनेक घटना घडताना दिसतात पण विशेष म्हणजे अनेक महिलांना अशा घटनांचे सोयरसुतकही नाही, हे अधिक विचलीत करणारे आहे. बाईच बाईची वैरी असते, हे वाक्य कुणी पसरवलं असेल?  पुरुषही एकमेकांचे वैरी असतात याच्या अनेक घटना आपण उघड्या डोळ्यांनी रोज पाहतो अन् अनुभवतोदेखील. तरीही पुरुष पुरुषाचा वैरी असे कुणीही म्हणत नाही. बाई बाईची वैरी हे एक मिथक जाणीवपूर्वक पुरुषसत्ताक संस्कृतीत पसरवले जाते. संवेदनशीलता असण्यासाठी आपण बाई आहोत की बाप्या हे महत्त्वाचे नाही, फक्त संवेदनशीलता हवी….प्रत्येक व्यक्ती संवेदनशील झाली तर महिलांवरील अत्याचार संपू शकतील.माणसे जेव्हा आपापली जबाबदारी स्वीकारतात तेव्हाच गुणवत्ता, कामाचा दर्जा,  नातेसंबंध आणि सांघिक प्रयत्न या सर्वांमध्येच एकदम सुधारणा होत असते आणि आयुष्य अधिक अर्थपूर्ण आणि परिपूर्ण होतं.

लेखिकेचा संपर्क-९५६१७४८७७८

बातम्या आणखी आहेत...