आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमाच्या अनोख्या रंगाचा स्वर्ग ः सिनेमा पॅराडिसो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोशनी शिंपी  

अनेक भारतीयांचा असा समज आहे की, युरोपियन कुटुंबव्यवस्थेत नातेसंबंधांना फारसे स्थान नाही. त्यात गहिरेपण नाही. त्यांच्याकडील प्रेमाची संकल्पना बुडबुड्यासारखी. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही. पण प्रत्येक युरोपियन कुटुंब प्रेमापासून तुटलेले नाही. याचा उलगडा या चित्रपटातून होतो.
 
अनेक भारतीयांचा असा समज आहे की, युरोपियन कुटुंबव्यवस्थेत नातेसंबंधांना फारसे स्थान नाही. त्यात गहिरेपण नाही. त्यांच्याकडील प्रेमाची संकल्पना बुडबुड्यासारखी. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही. पण प्रत्येक युरोपियन कुटुंब प्रेमापासून तुटलेले नाही. विशेषतः पहिल्या, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर प्रेमाचे बंध अनोखे होते. त्याचे दर्शन ग्युसेपे टोरनॅटोरे दिग्दर्शित  सिनेमा पॅरोडिसो या इटालियन सिनेमात घडते. खरे तर त्याला दर्शन म्हणणे योग्य ठरणार नाही. कारण हा सिनेमा पहिल्या सेकंदापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत रसिकांना प्रेमातील अनोख्या रंगाच्या स्वर्गात घेऊन जातो. तेथे दीर्घकाळ मुक्काम करण्यास भाग पाडत हृदयाला व्याकूळ करतो. असंही प्रेम असतं, यालाही प्रेम म्हणतात, अशी ठोस धारणा तयार होते, एवढी प्रचंड ताकद सिनेमा पॅराडिसोमध्ये आहे. त्यामुळेच २९ वर्षांपूर्वी बेस्ट फॉरेन फिल्म गटात अाॅस्कर पुरस्कार मिळवणारा हा सिनेमा अाजच्या पिढीचेही डोळे ओलावतो.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या इटालीतील ग्युआनकाल्डो गावातील ही कहाणी. ती एका विशिष्ट लयीने उलगडत जाते. काही प्रसंगांमध्ये प्रदीर्घ काळ एकही संवाद नाही. कलावंतांच्या चेहऱ्यावर तसे सो कॉल्ड भावही नाही. तरीही त्यांना जे काही म्हणायचे आहे. त्यापलीकडील अर्थही रसिकांना कळतो. यावरून प्रत्येक फ्रेमवर किती जीव ओतला गेला, हे लक्षात येते.

फ्लॅशबॅकने ही कहाणी पडद्यावर येते. ग्युआनकाल्डो गावात राहणारी, इटलीतील प्रख्यात दिग्दर्शक सिल्वाटोरची वृद्ध आई थरथरत्या आवाजात त्याला फोन करते. त्याच्या एका जिवलगाचे निधन झालेय. उद्या अंत्यसंस्कार आहेत, असा निरोप ती त्याच्यासाठी ठेवते. कामावरून परत आल्यावर सिल्वाटोरला आईचा निरोप मिळतो की, अल्फ्रेडोने हे जग सोडलंय. त्याला उद्या अखेरचा निरोप दिला जाणार आहे. तीन दशकांपूर्वी गावातून बाहेर पडलेला सिल्वाटोर अल्फ्रेडोच्या, गावाच्या आठवणीनं कातर होत अंथरुणात कोसळतो अन् बालपणीच्या काळात पोहाेचतो. रसिकही त्याच्यासोबत त्या काळात पोहोचतात आणि एक अद्भुत प्रवास सुरू होतो.

‘सिनेमा पॅराडिसो’ हे ग्युआनकाल्डो गावातील एकमेव सिनेमागृहाचे नाव. अल्फ्रेडो तेथील प्रोजक्शन रूमचा ऑपरेटर. सिल्वाटोर म्हणजे बालपणीच्या टोटोला सिनेमाचं प्रचंड वेड. त्याचं आणि अल्फ्रेडोचं नातं म्हणजे जणूकाही नावाडी आणि प्रवाशाचं. गावामधील चर्चच्या फादरची सिनेमावर सेन्साॅरशिप. लोकांना दाखवण्याआधी अल्फ्रांडो फादरला सिनेमा दाखवणार. त्याने सांगितलेल्या सीनची काटछाट करणार. काटछाटीविनाचा प्रत्येक सिनेमा टोटो प्रोजेक्शन रूममध्ये बसून पाहतो. असं सगळं काही छान सुरू असताना एक दिवस प्रोजेक्शन रूमला आग लागते. अल्फ्रेडो त्यात भाजतो. डोळे गमावतो. मग सिनेमा दाखवण्याची जबाबदारी छोटा टोटो घेतो. आई, बहिणीसोबत राहणाऱ्या टोटोसाठी ही नोकरी महत्त्वाची असते. कारण त्याचे वडील युद्धातून परतलेलेच नसतात. आई त्याच्या वडिलांची अनेक वर्षांपासून वाट पाहत असते. पण छोट्या टोटोला ते कधीही परत येणार नाहीत, याची कल्पना आलेली असते. पुढे तारुण्यात पाऊल ठेवल्यावर तो निळ्याशार डोळ्यांच्या इलिनाच्या प्रेमात वेडा होतो. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. पण, तिच्या घरून विरोध होतो. मग एक निखळ प्रेम करणारा तरुण जे करतो तेच टोटोही करतो. गावात कधीच परतणार नाही, असे अल्फ्रेडोला वचन देऊन तो गाव सोडतो. इटलीतील सर्वात यशस्वी सिनेमा दिग्दर्शक होतो. अल्फ्रेडोला अंतिम निरोप देण्यासाठी गावात आल्यावर त्याला इलिना भेटते का? अल्फ्रेडोला त्याने खरेच काय वचन दिलेले असते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळत जातात.

अप्रतिम कहाणी, कसदार पटकथा, दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात रंग भरला आहे तो कलावंतांनी. पडद्यावर त्यांना पाहताना असे वाटते हे खऱ्या आयुष्यातील सिल्वाटोर, टोटो, अल्फ्रडो असणार.  टोटोवर जिवापाड प्रेम असलेला, त्याचे जीवन घडवण्यासाठी धडपडणारा अल्फ्रेडो फिलिपी नोईरेट यांनी अशा असोशीने चितारलाय की, असा एखादा माणूस आपल्याही सोबत असावा, असे वाटत राहते. यापुढील काळात मानवी जीवनाच्या पिढ्या येतील आणि जातील. पण प्रेमाची खऱ्या, निस्सीम प्रेमाची महती कधीच कणभरही कमी होणार नाही. ती या पिढ्याकडून दुसऱ्या पिढीकडे जातच राहील, एखाद्या महाकाय, संथ गतीने, निश्चलपणे वाहणाऱ्या नदीच्या पात्रासारखी, असे सांगत सिनेमा पॅराडिसो थांबतो. तेव्हा तो हृदयामध्ये आणखी वेगाने वाटचाल करू लागतो, हीच या सिनेमाची कमाल आहे. त्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहूनच घेतला पाहिजे.