आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्थर तबियत से उछालो...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणू मंडल. तुमच्या-आमच्यासारखी सामान्य स्त्री. मात्र समाज माध्यमांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यात आवाज पोहोचून ती रातोरात स्टार झाली. गाण्याची उपजत जाण असणाऱ्या राणूला दुर्दैवानं त्यासाठी कधीच व्यासपीठ मिळालं नाही. मात्र, आपल्यातल्या कलेला व्यासपीठ मिळाले नाही तर निराश न होता, त्याचा आनंद घेत राहिले पाहिजे हा धडा राणूच्या आयुष्याने घालून दिला. 
 
कौन कहेता है आसमाँ मे सुराग नही होता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो’ ही ओळ शब्दश: जगलेली राणू मंडल हे एक उत्तम उदाहरण आहे. कोलकात्याच्या राणाघाट रेल्वेस्टेशनवर आतेंद्र चर्कोबर्ती या युवकाने   ५९ वर्षांच्या राणूचा २ मिनिटे १३ सेकंदांचा व्हिडिओ  २१ जुलैला सोशल मीडीयावर व्हायरल केला. अन् एका रात्रीत रोणूचे आयुष्य बदलले.  एका रिअॅलिटी शोमध्ये गाणे गायल्यानंतर लगेचच संगीतकार हिमेश रेशमियाने चित्रपटासाठी गाण्याची ऑफर दिली. एवढेच नाही, तर  ‘हॅपी हार्डी अँड हीर’ चित्रपटासाठी  ‘तेरी मेरी कहानी’ गाणे स्टुडिओत गातानाचा तिचा व्हिडिओदेखील आता इन्स्टाग्रामवर आहे. 

पश्चिम बंगालच्या कृष्णानगरची रहिवासी असलेल्या राणूला आवाजाची नैसर्गिक देणगी होती. कोलकात्यापासून ८० किलोमीटर दूर असलेल्या राणाघाटमधील बेगोपुरात राहणारी राणू १ जुलैला सायंकाळी घराबाहेर पडली. घराजवळच्या रेल्वेस्टेशनवर जाऊन बसली. बाकावर बसून गाणे म्हणू लागली. तिचे गाणे एेकून आतेंद्र यांनी याचे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोवर राणूने गाणे संपवले होते. त्यांनी काही बिस्किटे, ब्रेडचे आमिष दाखवल्यावर तिने पुन्हा गाण्यास होकार दिला. २१ जुलैला व्हिडिओ व्हायरल झाला अन् लगेचच बंगाली बँडने त्यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर रेडिओ वाहिन्या, मुंबईच्या रिअॅलिटी शोमधून फोन येऊ लागले. रिअॅलिटी शोमध्ये गायल्यावर चित्रपटात पार्श्वगायनाची संधीही चालून आली. राणू यांचे आयुष्य या वेगवान घटनांनी विलक्षण बदलले. पण, विशेष भर तेव्हा पडली जेव्हा त्यांची मुलगी १० वर्षांनी त्यांच्याकडे परत आली.  मेंदूच्या आजाराने ग्रस्त असलेल्या राणूंसाठी हा संपूर्ण अनुभव एका स्वप्नासारखा होता. 

बालपणी  गावातल्या ऑर्केस्ट्रात राणूने गाणी गायली होती. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधामुळे राणूला गाणे सोडावे लागले. पुढे लग्नानंतर राणू पतीसोबत मुंबईत राहीली. अभिनेता फिरोज खानकडे पती-पत्नी काम करत होते. मात्र, पतीचा मृत्यू झाला अन् राणू गावाकडे परतली. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने रेल्वेस्टेशनवर गाणी गाऊन भीक मागण्याला सुरुवात केली. त्याच दरम्यान आतेंद्र यांनी ‘इक प्यार का नगमा है, मौजो की रवानी है’ हे राणूनं गायलेलं ऐकलं. लता मंगेशकरांइतका हुबेहूब आवाज ऐकून ते थक्क झाले. त्यांनी राणूचा व्हिडिओ व्हायरल केला. संगीत कंपन्या, रेडिओ वाहिन्या आणि संपूर्ण मीडियाचे लक्ष या बाईने वेधले होते. एका सलूनने हात पुढे करत तिचा मेकओव्हर करून दिला. सोशल मीडियाचीही ताकद वारंवार सिद्ध होत आहे. आपल्यातील कलांना व्यासपीठ मिळाले नाही तर निराश न होता, त्याचा आनंद घेत राहिले पाहिजे हेच राणूच्या आयुष्याने सांगितले आहे. गाण्याची उपजत आवड त्यांच्यात होती. पण, व्यासपीठ कधीच मिळणार नाही अशी स्थिती होती. त्यांनी गाण्याचा आनंद घेत गात राहण्यावर भर दिला अन् एका क्षणी त्यांचा आवाज संपूर्ण जगाला क्लिक झाला. जगात कलेची कमरताच नाही. पूर्वीच्या तुलनेत आता रिअॅलिटी शो आणि सोशल मीडियामुळे अनेकांना व्यासपीठ मिळत आहे. सोशल मीडिया ते करून दाखवून शकतो जे सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर आहे- मग निवडणुका असोत की राणूसारख्या एखाद्या उमद्या कलावंताची कला जगापुढे येण्याचे आव्हान असो.
 

विचारांची चौकट मोडली पाहीजे 
राणूचे आयुष्य प्रेरणा आहे. नोकरी, कुटुंबाच्या व्यापात महिला आपल्यातील कलागुणांना सोडून देतात. शिवाय वय हा घटकही असतोच. मात्र, कलेला वयाची चौकट नसते. राणूकडे ना सौंदर्य होते, ना पैसा, ना वय, कुठल्याही बड्या असामीशीही तिची ओळख नव्हती. रेल्वेस्टेशनवर मनापासून गाताना तिच्या चेहऱ्यावरील भाव समाधानाचे होते. फक्त भीक मिळावी म्हणून ते गाणे नव्हते. अन् ज्याने तिचा व्हिडिओ व्हायरल केला तो आतेंद्रही काही संगीत विश्वातील व्यक्ती नव्हता. पण, त्याने चांगले ऐकले अन् ते जगापुढे मांडले. म्हणूनच आपल्यातील कलेला शेवटपर्यंत जिवंत ठेवायला हवे. कला तुम्हाला प्रसिद्धी देईल न देईल, पण भरभरुन जगण्याचा आनंद तर नक्कीच देईल.

बातम्या आणखी आहेत...