आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rs 10 Crore Ransom Demanded By Sancheti Family; Vaijapur Police Arrested The Two

संचेती कुटुंबीयांना मागितली दहा कोटींची खंडणी; वैजापूर पोलिसांनी दोघांना पकडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर : माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती आणि त्यांचे पुतणे मर्चट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती यांना मफिया दाऊद इब्राहिम टोळीच्या नावाखाली १० कोटींच्या खंडणीसाठी भ्रमणध्वनीद्वारे धमकावणाऱ्यांचा छडा लावण्यात वैजापूर पोलिस व ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणातला मुख्य आरोपी अजयसिंह राजपूत (रा.परदेशी गल्ली, वैजापूर) व त्याचा साथीदार राजू बागूल (रा. रोटेगाव) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. रविवारी वैजापूरचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.आर.शिंदे यांच्या समोर हजर केले असता त्यांनी आरोपींना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आर्थिक अडचण दूर सारण्यासाठी आरोपींना अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम टोळीतील गुंड असल्याचे सांगून संचेती कुटुंबाला गंडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी लक्ष्मी सिनेमा थिएटर समोरील मोबाइल दुकान चालक अजय राजपूत व त्याचा साथीदार राजू बागुल या दोघांनी दोन महिन्यांपासून हा खंडणी वसूल करण्याचा कट आखला होता. पहिल्यांदा त्यांनी मोबाइलवरून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांना खंडणीसाठी व्हाईस मेसेज पाठवला. मात्र त्यांनी कामाच्या व्यापामुळे मेसेज बघितला नाही. त्यामुळे त्यांचे पुतणे मर्चट बँकेचे अध्यक्ष विशाल संचेती यांना खंडणीचा मेसेज पाठवला होता. त्यांनी मेसेज ऐकल्यानंतर काका रवींद्र ऊर्फ बाळासाहेब संचेती यांना कळवून वैजापूर पोलिसांना कळवले होते. ४ दिवसांपासून पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यान्वित करुन मुख्य सूत्रधार अजय राजपूत व त्याचा साथीदार राजू बागुल यांच्यावर खंडणी मागणे व अन्य कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली. आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सराईत गुन्हेगार बोलतात त्याप्रमाणे मर्चट बँकेचे चेअरमन विशाल संचेती व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांना आरोपींनी मोबाइलवर ध्वनिफीतद्वारे १० कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकाराची माहिती त्यांनी स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करुन संचेती यांना ज्या क्रमांकावरुन फोन काॅल आले.

त्यांचा छडा लावण्यासाठी विविध पथके नेमले होती. तपासात विविध कंपन्यांच्या सिम कार्ड विक्रेत्यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून सिमकार्ड ग्राहकांचा शोध लावून तपासाला वेग दिला होता.चार दिवसांच्या तपासात हा काॅल वैजापूर शहरातून अजय राजपूत याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.

झटपट श्रीमंत होण्यासाठी पत्करला खंडणीचा मार्ग

शहरात मोबाइल दुरुस्ती व विक्री करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाने झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगारी वर्तुळातील गुंड खंडणी वसूल करण्यासाठी कशा पद्धतीने बोलतात या शैलीचा अभ्यास करुन या प्रकरणात वापरातून बाद झालेल्या जुनाट मोबाइल संचाचा वापर केला. तसेच मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावरील मोबाइल सिम कार्डावरून त्यांनी संचेती कुटुंबाला तीन वेळा फोन करुन १० कोटींची खंडणी न दिल्यास घातपात करू, असे धमकावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...