आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या आमिषाने कर्ज काढून देत पैसे लाटल्यामुळे तरुणाची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


औरंगाबाद : शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन लाखांचे कर्ज काढायला लावून ते पैसे लाटल्याने निराश झालेल्या कृष्णा ऊर्फ किशोर रतनराव चिलघर (३२, रा. सी-३, संजयनगर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली. संस्थाचालक, बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून वर्षभरापासून सुरू असलेल्या छळाची तक्रार पोलिस नोंदवून घेत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन पानाच्या चिठ्ठीत म्हटले आहे. 


पोलिसांनी एकाही अर्जाची घेतली नाही दखल
कृष्णाने जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार घेऊन गेल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक हाश्मी व इतर कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार देत तत्कालीन उपायुक्त राहुल श्रीरामे यांची कॉल रेकॉर्डिंग ऐकवली. ज्यात जे. के. जाधववर कारवाई करायची नाही, असे म्हटले होते. बँकेचे औटी व सूर्यवंशी यांनी मारून टाकायच्या धमक्या दिल्याचेही चिठ्ठीत नमूद केले आहे. २१ मार्च २०१८ रोजी जिन्सी ठाण्यात कृष्णा गेला असता तेथे जाधव त्याला भेटले. तेव्हा मी उपायुक्त राहुल श्रीरामे यांना भेटून आलाे आहे, आता माझे कोणीही काही करू शकत नाही, असे सांगून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कृष्णाने चिठ्ठीत केला आहे. पोलिस आयुक्तांकडेदेखील कृष्णाने अर्ज केला होता. परंतु त्याच्या एकाही अर्जाची दखल घेतली नाही. 


भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव यांच्याकडे कृष्णा मे २०१६ पासून चालक म्हणून काम करत होता. तेव्हा जाधव यांनी त्याला तू तीन लाख रुपये दिल्यास चिकलठाण्यातील राजर्षी शाहू इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट यासंस्थेत शिपाई पदावर नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. अवघ्या दहा हजार रुपये पगारात मी एवढी रक्कम देऊ शकत नाही, असे कृष्णाने जाधव यांना सांगितले. त्यावर मी लोकविकास नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष असून त्यातून ३ लाखांचे कर्ज काढून देतो, ते पैसे मला दे, असे सांगितले. २९ जून २०१६ रोजी कृष्णाने बँकेत कर्जासाठी अर्ज केला. त्याला एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. शिपाई पदावर रुजू झाल्यावर तीन हजार रुपये पगारातून कापण्याचे ठरले होते. ७ जून २०१७ रोजी कृष्णाने ठरल्याप्रमाणे जाधव यांना एक लाख ६० हजार रुपये दिले. पगारातून हप्त्यांची कपात सुरू झाली. मात्र, नोकरीवर रुजू करण्यात आले नाही. ३० डिसेंबर २०१७ रोजी कृष्णाने नोकरीसंदर्भात जाधव यांच्याकडे विचारणा केली असता उर्वरित रक्कम जमा केल्यानंतरच नोकरीवर कायम करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, कायम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते, असे कृष्णाने लक्षात आणून देताच त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर २०१७ रोजी कृष्णाला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यामुळे कृष्णाने दिलेले पैसे परत मागितले. मात्र, जाधव यांनी पैसे मिळणार नाहीत, काय करायचे ते करून घे, असा दम दिला. त्यानंतर वर्षभर पोलिस, बँकेकडे वारंवार तक्रार करूनही कृष्णाला कोणीच सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याने १७ जानेवारी रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचा खुलासा जे.के. जाधव यांनी माध्यमांना पाठवलेल्या प्रसिद्धिपत्रकात केला आहे. 


पाच जणांवर गुन्हा दाखल 
कृष्णाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा जिन्सी पोलिस ठाण्यात जे.के. जाधव, विक्रांत जाधव, उमेश दिवे, औटी, सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...