डेटाफुटीप्रकरणी फेसबुकला होऊ शकतो ३५ हजार कोटी रुपयांचा दंड, ही रक्कम कंपनीच्या मासिक उत्पन्नाइतकी

दिव्य मराठी

Apr 26,2019 10:03:00 AM IST

सॅन फ्रान्सिस्को - वापरकर्त्यांच्या खासगी माहितीची छेडछाड केल्याचे आरोप पुन्हा एकदा फेसबुकवर झाले आहेत. आरोग्यविषयक डेटाफुटीप्रकरणी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनमध्ये (एफटीसी) फेसबुकच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरून एफटीसी कंपनीला ५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३५,१२५ कोटी रुपयांचा दंड ठोठावेल असा फेसबुकचा अंदाज होता. हे लक्षात घेऊन फेसबुकने २१,०७५ कोटी रुपये वेगळे काढून ठेवले होते. मात्र, या माहितीचा गुंतवणूकदारांवर विशेष परिणाम झाला नाही. बुधवारी फेसबुकचे समभाग १० टक्क्यांनी वधारले. फेसबुककडून या दंडाची वसुली झाली तर ही रक्कम कंपनीच्या एका महिन्याच्या उत्पन्नाइतकी आहे. तसेच आजवरची सर्वात मोठी रक्कम. एफटीसीने यापूर्वी अशाच स्वरूपाच्या प्रकरणात २०१२ मध्ये गुगलला १५५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.


दरम्यान, फेसबुकने बुधवारी सांगितले की, कंपनीने एफटीसीबरोबर सेटलमेंटसाठी २१,०७५ कोटी रुपये वेगळे काढून ठेवले होते. ही चौकशी केंब्रिज डेटा घोटाळ्यानंतर सुरू झाली होती. २०११ मध्ये एफटीसीबरोबर फेसबुकने एक करार केला होता. त्यानुसार डेटा शेअर करण्यासाठी फेसबुकने वापरकर्त्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र या कराराचा भंग केल्याचा फेसबुकवर आरोप आहे.

फेसबुकचे सीएफओ डेव्ह वेनर यांच्या मते, आजवर या समस्येवर तोडगा दिसत नाही. आम्हाला किती रक्कम द्यावी लागेल हे अद्याप स्पष्ट नाही. फेसबुकने बुधवारी जानेवारी ते मार्च तिमाहीचा अहवाल जारी केला. त्यानुसार जगभरात फेसबुकचे १५६ कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत, तर महिन्यात सक्रिय वापरकर्त्यांचा विचार केल्यास हा आकडा २३८ कोटींहून जास्त आहे.

जुलैमध्ये उघडकीस आले होते आरोग्य डेटाफुटीचे प्रकरण
आरोग्यविषयक डेटाफुटीचे प्रकरण सर्वप्रथम जुलैमध्ये उघडकीस आले होते. एका विशिष्ट आजाराने ग्रस्त महिलांची नावे आणि ईमेल अॅड्रेस सुलभतेने डाऊनलोड केले जात असल्याची शंका एका महिला गटाला आली. डाऊनलोडिंगचे काम मानवी तसेच क्रोम एक्स्टेन्शनद्वारे होत होते. तेव्हा फेसबुकने या गटात बदल करून अशा प्रकारची माहिती गुप्त ठेवणे आणि महिलांची ओळख उघड न झाल्याचा दावा केला होता. मात्र, अनेक जण खासगी आरोग्यविषयक डेटा पोस्ट करत सार्वत्रिक करत होते, त्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली होती.

X