आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात टंचाई निवारणास लागणार 7.30 कोटी रुपये; प्रति परवानगीची गरज नसल्याने उपाययोजनांची कामेही सुरू  

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आगामी उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाने ७ कोटी ३० लाख रुपयांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. हा आराखडा शासनाला सादर करण्यात आला असून त्याला प्रति परवानगीची गरज नसल्यामुळे ठरल्यानुसार उपाययोजनांची कामेही सुरु झाली आहेत. 

 

प्रशासनाने घेतलेल्या अंदाजानुसार या वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील ४१५ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होणार असून त्यासाठी ३६८ उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अकोला, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, अकोट व तेल्हारा या सातही तालुक्यांच्या ग्रामीण भागांत पाणी टंचाई असेल, असे जिल्हा प्रशासनाचे भाकीत आहे. त्यासाठी आधीच उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठीची कामेही दुर्गम भागात सुरु झाली आहेत. 

 

प्राप्त माहितीनुसार जून २०१९ पर्यंतची स्थिती डोळ्यासमोर ठेऊन प्रशासनाने टंचाई निवारणाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला जिल्हा प्रशासनाने अलीकडेच तांत्रिक व आर्थिक मंजुरी प्रदान केली. गाळ काढून विहिरींची खोली वाढवणे, विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, विंधन विहिरी आणि कूपनलिका बांधणे, नादुरुस्त विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती आदी उपाययोजना पाणी टंचाई दूर करण्यासाठी केल्या जातात. यासाठी आॅक्टोबर ते जून या कालावधीसाठी दर तीन महिन्याचा आराखडा तयार केला जातो. त्यानुसार या वर्षीचे तीनही टप्पे पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे (जीएसडीए) वरिष्ठ भूवैज्ञानिक, जिल्हा परिषदेचे सीईओ आणि जिल्हाधिकारी अशा चार यंत्रणांच्या प्रमुखांनी या आराखड्याला संयुक्त मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे पाठवला असून त्यांच्यामार्फतच शासनाकडे पाठवला आहे. 

 

२३ गावांना लागणार टँकर : 
भूपृष्ठावर पाणी नाही अन् भूजलही उपलब्ध नाही, अशा २३ गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी १ कोटी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून काही गावांमध्ये बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा केला जाईल. पातूर तालुक्यातील सर्वाधिक ९, बार्शीटाकळी तालुक्यातील ६, मूर्तिजापूर तालुक्यातील ४ आणि बाळापूर व अकोला तालुक्यातील प्रत्येकी दोन गावांचा समावेश आहे. 

 

चार उपाययोजनांना मूठमाती : 
जिल्ह्याचा निम्म्यापेक्षा अधिक भाग खारपाणपट्ट्यात मोडतो. त्यामुळे त्या-त्या भागातील पाणी पिण्यायोग्य नाही. नेमक्या याच कारणामुळे विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नदीपात्रात बुडक्या घेणे, विहिरीतील गाळ काढणे आणि प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे या चार बाबींना मूठमाती देण्यात आली आहे. एरवी या बाबी नेहमीच्या प्रारूप आराखड्यात असतात आणि त्यावर लाखो रुपयांची तरतूदही केलेली असते. 

 

बातम्या आणखी आहेत...