Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Rshtrwadi does not have good mans

राष्ट्रवादीमध्ये आता चटके देणारे दिवे राहिले, प्रकाश देणारे नाहीत

प्रतिनिधी | Update - Mar 17, 2019, 12:30 PM IST

माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केलेली मदत पक्षाने विसरायला पाहिजे नव्हती

  • Rshtrwadi does not have good mans

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता चटके देणारे दिवे राहिले असून प्रकाश देणारे दिवे राहिले नाहीत. या पक्षातील काही दिवे हे प्रकाश देणारे नाहीत हे अगोदरच मला माहीत होते. ते काल आमच्या मित्राला माहीत झाले, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.


    बीड येथे शनिवारी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली नसल्याने आमदार धस यांनी राष्ट्रवादीचे मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या वेळी बोलताना धस म्हणाले की, कोणता दिवा विझत होता, त्याला कोणी हात आडवा लावला, कोणाला चटके बसले हे आम्हाला माहीत नाही; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रकाश देणारे दिवे राहिलेच नाहीत. माझा अमरसिंह पंडित यांना राजकीय विरोध आहे. २००९ मध्ये गेवराईत जाऊन लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी पंडितांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार पंडित यांना उमेदवारी न देता त्यांचा आज घात केला आहे.

    त्यांना बोलावून घेऊन तरी माहिती द्यायला पाहिजे होती. परंतु तसे पक्षाने केले नाही. मला पंडित यांच्याबद्दल सहानुभूती आहे. लोकसभा निवडणुकीत आता निश्चितच गेवराईची जनता मतातून याचा रोष व्यक्त करेल. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केलेली मदत पक्षाने विसरायला पाहिजे नव्हती, असेही आमदार सुरेश धस यांनी बोलताना सांगितले.


    पंडित यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असून ते सोशल मीडियावरील पोस्टवरून दिसत आहे, असेही धस यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस भाजपचे सलीम जहांगीर यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, रमेश पोकळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, सुभाष धस, राम कुलकर्णी, जगदीश गुरखदे आदी उपस्थित होते.Trending