आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाच्या दसरा मेळाव्यात समान नागरी कायदा, ‘एनआरसी’वर संदेश?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी साेहळा मंगळवारी नागपुरात पारंपरिक पद्धतीने साजरा हाेत आहे. यानिमित्ताने हाेणाऱ्या उत्सवाच्या भाषणातून संघाचे प्रमुख परिवाराची पुढील दिशा मांडतात. त्यामुळे यंदा सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणातून समान नागरी कायदा, एनआरसी, काश्मीर धोरणांवर माेदी सरकारला नेमके काय दिशानिर्देश मिळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर हे यंदा संघाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. 

संघाचा स्थापना दिवस असलेला िवजयादशमी उत्सवाच्या भाषणातून संघाचे सरसंघचालक दरवर्षी महत्त्वाच्या विषयांवर भाष्य करतात. त्यात संघ परिवारासाठीचे दिशानिर्देशही असतात. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणात गेल्या वर्षी (२०१८) लोकसभा निवडणूक, अयोध्या वाद, काश्मीरमधील कलम ३७०, ट्रिपल तलाक यासारखे मुद्दे अधोरेखित झाले होते. त्याचे प्रत्यक्ष परिणाम केंद्रातील मोदी सरकारने गेल्या वर्षभरात  राबवलेल्या अजेंड्यातून दिसले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संघाच्या स्वयंसेवकांचा सहभाग राहिला.
 
संघाच्या ‘आदेशा’नुसार काश्मिरात ३७० कलम हटवण्याचा निर्णय माेदी सरकारकडून घेतला गेला. अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टातील सुनावणी अंतिम टप्प्यात असून या वर्षातच त्यावर निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरसंघचालक भागवत यांच्या या वर्षीच्या भाषणातही या मुद्द्यांचा ओझरता उल्लेख राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत अाहे. असे असले तरी देशात समान नागरी कायदा आणि एनआरसीसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर यंदा संघाकडून भूमिका मांडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 

एचसीएल कंपनीचे संस्थापक शिव नाडर यंदाचे प्रमुख पाहूणे
विजयदशमी साेहळा सकाळी रेशीम बाग मैदानात हाेईल. तत्पूर्वी सरसंघचालक डाॅ. मेाहन भागवत आणि प्रमुख पाहूणे शिव नाडर यांच्या हस्ते पारंपारिक शस्त्रांचे पूजन केले जाईल. त्याचप्रमाणे नागपूर शहरातून संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन हाेईल. केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते जनरल व्ही.के. सिंग यांच्यासह १४ विशेष अतिथी या साेहळ्यास उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी असलेले शिव नाडर हे एचसीएल कंपनीचे संस्थापक आहेत. गेल्या वर्षी नाेबेल पुरस्काराचे मानकरी कैलास सत्यार्थी यांनी या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली हाेती. 
 

फडणवीस सरकारला काय संदेश?
या कार्यक्रमाला दरवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावत असतात. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक तोंडावर अाहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक भागवत व संघ परिवार हे काेणता ‘कानमंत्र’ देतात, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले असेल.