RSS / बीएच्या अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवण्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला

विशेष प्रतिनिधी

Jul 14,2019 09:14:00 AM IST

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास शिकवण्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे.


देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही योगदान नसल्याने त्यावर आधारित धडा नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्ते जनार्दन मून यांनी याचिकेत केली आहे. विशेष म्हणजे मून यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नोंदणीकृत संघटना नसल्याचे सांगत याच नावाने समांतर संस्था स्थापन केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत संस्था नाही. त्यामुळे या संघटनेचा इतिहास अभ्यासक्रमात शिकवणे कायद्याला धरून नाही. दरम्यान, या याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. संघाच्या रेशीमबागेतील परिसराच्या विकासकामांमध्ये महापालिकेचा निधी वापरण्याच्या निर्णयालादेखील मून यांनी आक्षेप घेतला असून त्यावरही याचिका दाखल आहे.

X
COMMENT