आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात बजरंग दलाच्या विस्तारासाठी किशोरवयीन मुलांना सहभागी करण्याचा संघ फॉर्म्युला राबवणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदर्भ प्रांतापासून सुरुवात, प्रतिसाद लक्षात घेऊन देशभर विस्तार केला जाणार
  • एप्रिल महिन्यात देशभर राम महोत्सव

रमाकांत दाणी

नागपूर - बजरंग दलाच्या विस्तारासाठी आता संघ फॉर्म्युला वापरला जाणार आहे. इयत्ता नववीपासूनच्या किशोरवयीन मुलांना बजरंग दलात सहभागी करून घेण्याचे धोरण राबवले जाणार आहे. संघटनेत दाखल होणारी मुले जास्तीत जास्त वर्ष संघटनेच्या कामांसाठी उपलब्ध राहावीत, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.संघ परिवारातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील कामांची जबाबदारी विश्व हिंदू परिषद सांभाळत असते. बजरंग दल ही विश्व हिंदू परिषदेची एक प्रकारे युवा शाखाच मानली जाते. महाविद्यालयीन तरुणांना बजरंग दलात प्रवेश दिला जातो. त्यासाठी सदस्यत्वाची कुठलीही औपचारिकता पाळली जात नाही. मात्र, बदलत्या वातावरणात वातावरणात संघटनेचा गाडा नीट चालविता यावा, यासाठी इयत्ता नववीपासूनच्या किशोरवयीन मुलांना संघटनेत सहभागी करून घेण्याचा धोरणात्मक निर्णय संघटनेला घ्यावा लागला आहे. बजरंग दलाच्या विदर्भ प्रांतापासून त्याची सुरुवात केली जाणार असून त्यानंतर येणारा अनुभव लक्षात घेऊन त्याचा देशभर विस्तार केला जाणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रदेश मंत्री गोविंद शेंडे यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे दोन दिवसीय विदर्भ प्रदेश अधिवेशन शनिवार आणि रविवारी नागपुरात पार पडले. या अधिवेशनात या नव्या धोरणावर सविस्तर चर्चा झाली.रोजगार, व्यवसायात तरुण व्यस्त झाले की तरुण संघटनेच्या कामात उपलब्ध होऊ शकत नाहीत. तो दोन-तीन वर्षेच वेळ देऊ शकतो. ही वस्तुस्थिती आम्ही सध्या अनुभवत आहोत. तरुण वर्ग जास्तीत जास्त वर्ष संघटनेच्या कामास उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.एप्रिल महिन्यात देशभर राम महोत्सव

विश्व हिंदू परिषदेच्या अजेंडावरील राम मंदिराचा प्रश्न निकाली निघाला असताना राम मंदिराच्या तीस वर्षांपूर्वीच्या आंदोलनाची माहिती नव्या पीढीपर्यंत पोहोचविण्यासाठी परिषदेच्या वतीने २५ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान देशभरात राम महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शेंडे यांनी सांिगतले. या निमित्ताने राज्यातील लाखो गावांपर्यंत पोहोचण्याचे परिषदेचे प्रयत्न राहणार असून धार्मिक कार्यक्रम आणि भाषण असे या महोत्सवांचे स्वरुप असेल, असेही त्यांनी सांगितले.