आरटीई : राज्यात / आरटीई : राज्यात 200 समतादूतांनी केले 30,603 विद्यार्थ्यांचे आॅफलाइन सर्वेक्षण

राज्यात झोपडपट्टी अन् दलित वस्त्यांमध्ये जाऊन बार्टीचे 200 समतादूत “आरटीई’अंतर्गत मुलांना इंग्रजी शाळांत प्रवेश मिळण्यासाठी ऑफलाइन सर्वेक्षण करत आहेत...

भरत हिवराळे

Mar 04,2019 12:27:00 PM IST

औरंगाबाद - राज्यात झोपडपट्टी अन् दलित वस्त्यांमध्ये जाऊन बार्टीचे 200 समतादूत “आरटीई’अंतर्गत मुलांना इंग्रजी शाळांत प्रवेश मिळण्यासाठी ऑफलाइन सर्वेक्षण करत आहेत. तसेच पालकांकडून अर्ज भरून घेत आहेत. या समतादूतांनी डिसेंबर २०१८ ते २५ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ‘आरटीई’ प्रवेशासाठी पात्र ३०,६०३ विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली असून ५ मार्चपासून आरटीई प्रवेशासाठी त्यांचे ऑनलाइन अर्जही भरले जाणार आहेत.


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये अनुसूचित जाती-जमाती, वंचित व दुर्बल घटकांतील गोरगरीब व अशिक्षित पालकांच्या मुलांना ‘आरटीई’तून इंग्रजी शाळांत प्रवेश मिळावा, यासाठी तीन वर्षापासून बार्टीच्या “समतादूत’ प्रकल्पाचे प्रयत्न सुरू आहेत. २०१६-१७ मध्ये पुणे व औरंगाबाद शहरात प्रायोगिक तत्त्वावर ‘आरटीई’च्या समतादूतांनी ऑफलाइन सर्वेक्षण करून १ हजार ७४० विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले होते. त्यातील १ हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला होता. तर २०१७-१८ मध्येही २७ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले होते. त्यातील १७ हजार ५०० अर्ज ऑनलाइन भरले होते. पैकी २३४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता.


पहिली प्रवेश फेरी लवकर लागली. मात्र दुसरी आणि तिसरी प्रवेश फेरी सप्टेंबरदरम्यान लागल्याने अनेक विद्यार्थ्यांचे त्याअगोदरच इतर शाळांत प्रवेश झाल्याने त्यांनी इंग्रजी शाळांत प्रवेश घेतला नाही. २०१९-२० या वर्षासाठी २०० समतादूत झोपडपट्टी अन्् दलित वस्तीतील घराघरांमध्ये जाऊन आरटीईचे महत्त्व पटवून देत आहेत. त्यातच ऑगस्ट २०१३ मध्ये जन्मलेल्या व आरटीई प्रवेशासाठी पात्र ३० हजार ६०३ विद्यार्थ्यांचे २५ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण करून अर्ज भरून घेतल्याचे बार्टीच्या ‘समतादूत’ प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांनी सांगितले.


औरंगाबादच्या समतादूतांनी सर्वाधिक भरले अर्ज
औरंगाबाद शहर व जिल्ह्यात ‘आरटीई’ साठी समतादूत मीनाक्षी जाधव, श्याम गरुड, पुनम कुमावत, स्नेहलता मगरे, विद्याश्री दाभाडे, सुषमा उके, रुबिना सय्यद, सविता मुळे, प्रियंका स्वामी, सुभाष राठोड हे ऑफलाइन सर्वेक्षण करत आहेत. या समतादूतांनी आतापर्यंत २ हजार ९९८ घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे ऑफलाइन सर्वेक्षण करुन अर्ज भरुन घेतले आहे.त्यामुळे राज्यात होत असलेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद आघाडीवर आहे. औरंगाबाद शहरात दहा समतादूतांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. आतापर्यंत २०९८ अर्ज विद्यार्थ्यांचे भरून घेतले आहे.
-गीता म्हस्के, जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी, औरंगाबाद


गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देणे हाच उद्देश
तळागाळातील गोरगरीब मुलांना ‘आरटीई’च्या माध्यमाताून इंग्रजी शाळांत प्रवेश मिळावा, या हेतूने राज्यभरात २०१६-१७ पासून समतादूतांच्या माध्यमातून आरटीईसाठी पात्र विद्यार्थ्यांचे ऑफलाइन सर्वेक्षण करण्यात येते. त्यांच्या पालकांना आरटीईचे महत्त्व पटवून देत त्यांच्याकडून अर्ज भरून घेत आरटीईचे संकेतस्थळ सुरू समतादूतच ऑनलाइन अर्ज करतात. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी डिसेंबरपासून ऑफलाइन सर्वेक्षण करण्यात आले. आतापर्यंत ३०, ६०३ विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.
-प्रज्ञा वाघमारे, मुख्य प्रकल्प संचालिका, समतादूत विभाग, बार्टी, पुणे.

X
COMMENT