Home | Magazine | Madhurima | Rucha Abhyankar writes about history of environment conservation

हवामान बदलाचा इतिहास

ऋचा अभ्यंकर, अकोला | Update - Aug 28, 2018, 12:43 AM IST

पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासूनच वर्षानुवर्षं हवामान बदल होत आले आहेत. हे बदल ही जरी पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया असली

 • Rucha Abhyankar writes about history of environment conservation

  पृथ्वी निर्माण झाली तेव्हापासूनच वर्षानुवर्षं हवामान बदल होत आले आहेत. हे बदल ही जरी पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेला या बदलाचा दर ही खरी चिंतेची बाब आहे. जागतिक तापमानवाढसुद्धा (ग्लोबल वॉर्मिंग) पृथ्वीने याआधी अनेक वेळा अनुभवली आहे. सध्या होणारी जागतिक तापमानवाढ ही प्रामुख्याने मानवनिर्मित आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांतीमुळे हे प्रमाण झपाट्याने वाढू लागलं.


  एकोणिसावं शतक उजाडेपर्यंत मानव प्रजाती हवामान बदलाबद्दल अनभिज्ञ होती. हरितवायूंमुळे होणार हरितगृह परिणाम साधारण १८२४मध्ये सर्वप्रथम लक्षात आला. हरितगृहात झाडांच्या योग्य वाढीसाठी सूर्यप्रकाश काचेतून आत येऊन आतील वातावरण उबदार बनवले जाते परंतु तो परत बाहेर जाण्यास मज्जाव असतो. त्याचप्रमाणे पृथ्वी हे जर हरितगृह मानले तर पृथ्वीभोवतालच्या वातावरणात जे हरितवायू असतात त्यामुळे सूर्यापासून मिळालेली ऊर्जा परत बाहेर जात नाही. हरितवायूंमुळे परावर्तित होऊन उष्णता पृथ्वीच्या वातावरणात तशीच राहते. आणि यामुळे संपूर्ण पृथ्वीचं तापमान वाढू लागतं. हाच हरितगृह परिणाम म्हणून ओळखला जातो. ओझोन, कार्बन डायऑक्साइड, मिथेन वायू, पाण्याची वाफ इ. हे मुख्य हरितवायू आहेत. इंधनं, ऊर्जा-तंत्रज्ञानाचा अतिवापर हरितवायूंच्या उत्सर्जनास कारणीभूत ठरतातच पण लोकसंख्यावाढ आणि काही विशिष्ट प्राण्यांच्या संख्येत वाढ हीसुद्धा महत्त्वाची कारणं आहेत. साधारण १९६०च्या दशकात जागतिक सरासरी तापमानवाढ आणि कार्बन उत्सर्जन यांचा थेट संबंध आहे याचा शोध लागला. हिमनद्यांचं वितळणं, जैव प्रजाती नष्ट होणं, वेळी-अवेळी येणारा पाऊस, पूर, दुष्काळ, बदलते ऋतू या सगळ्याला अप्रत्यक्षपणे हरितवायू परिणाम कारणीभूत आहे हे लक्षात येऊ लागलं.


  परंतु या सगळ्याचं गांभीर्य लक्षात येऊन त्यावर १९९०च्या दशकात जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. त्याआधी १९८८ मध्ये इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजची (IPCC) स्थापना झाली. १९९० मध्ये IPCCने हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या देशांचं सहकार्य आवश्यक आहे हे निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज समितीची स्थापना केली. या समितीचा मुख्य हेतू वातावरणावर हरितवायू उत्सर्जनाच्या रूपात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे हा आहे. १९९५ मध्ये जर्मनीत बर्लिनमध्ये पहिली जागतिक हवामान बदल परिषद पार पडली.

  त्यानंतर दर वर्षी ही समिती संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल परिषद भरवते. त्यातला १९९७चा क्योटो करार प्रसिद्ध आहे. यात २०१२पर्यंत युरोपियन युनियन आणि इतर ४१ विकसित देशांनी त्यांच्या १९९०च्या हरितवायू उत्सर्जनाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी करावं हे उद्दिष्ट ठरवण्यात आलं. ते साध्य करणं मात्र कुठल्याही देशाला जमलं नाही. परंतु यामुळे अपारंपरिक ऊर्जावापरास चालना मिळाली. त्यानंतर २०१५ मध्ये पॅरिस करार झाला. त्यात जागतिक सरासरी तापमानवाढ रोखण्यात यावी अशी घोषणा केली गेली. त्यावर १९५ सहभागी देशांनी सह्या केल्या होत्या.


  हे करार आणि त्यांची अंमलबजावणी मात्र अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण आहे. कारण विकसित आणि विकसनशील देश यांच्यावरील वेगवेगळ्या ऊर्जावापराच्या निर्बंधांमुळे विकासाची आणि आर्थिक समीकरणं बदलतात. यात हवामान बदलात मोठा वाटा असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाची भूमिकाही या परिषदांमध्ये फार महत्त्वाची ठरते. करार मान्य न करणं, किंवा एका सरकारने तो मान्य केला तर बदललेल्या सरकारने माघार घेणं असेही प्रकार चालतात. अजूनही काही गट हवामान बदलावरच प्रश्न उपस्थित करतात. किंवा स्वार्थासाठी दूरगामी परिणामांचा विचार न करता ते अमान्य करतात. युवल हरारी हे इतिहासकार तर आपल्या सेपियन्स या पुस्तकात मानव प्रजातीला (होमो सेपियन) पृथ्वीवरील सगळ्यात प्राणघातक प्रजाती असं म्हणतात, ते अगदी पटायला लागतं. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न तर होत राहतील आपण मात्र वैयक्तिक पातळीवर आपला सहभाग कसा वाढवता येईल यासाठी काय प्रयत्न करू शकतो, ते पुढच्या भागात पाहू.

  - ऋचा अभ्यंकर, अकोला
  rucha.abhyankar15@gmail.com

Trending