आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मेन्स्ट्रअल कप: पर्यावरणपूरक पर्याय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांना दर महिन्याला येणाऱ्या पाळीमुळे होणारा कचरा हा न टाळता येणारा असतो. पूर्वी या दिवसांत कापडं वापरली जायची, परंतु आता काळाची गरज व जागरूकता वाढल्याने सॅनिटरी नॅपकिन्स किंवा टॅम्पॉनचा वापर करणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही साधनं ‘वापरा आणि फेका’ प्रकारात मोडत असल्याने यामुळे होणारी पर्यावरणाची हानीही तेवढ्याच प्रमाणात मोठी आहे. मेन्स्ट्रुअल कप हा सॅनिटरी नॅपकिनवरचा योग्य पर्यावरणपूरक पर्याय ठरू शकतो. 


स र्वेक्षणांनुसार एक स्त्री तिच्या संपूर्ण आयुष्यात (४० वर्षं) साधारण १०,००० सॅनिटरी पॅड्स/टॅम्पॉन वापरते व फेकून देते. त्याला पृथ्वीवरच्या पॅड्सचा वापर करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येनी गुणलं तर जी संख्या येईल तितका कचरा निर्माण होत असतो. या सतत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन आणि विघटन करणे खूप आव्हानात्मक आहे. एक सॅनिटरी पॅड/नॅपकिनचं विघटन व्हायला शेकडो वर्षे (जवळपास ८०० वर्षं) जावी लागतात. आताच्या अत्याधुनिक पॅड्समध्ये ९०% प्लास्टिक असतं. शिवाय सॅनिटरी पॅड्स व टॅम्पॉनमध्ये डायॉक्सिनसारखी कर्करोगाला कारणीभूत रासायनिक द्रव्ये वापरली जातात जी स्त्रीच्या आरोग्याला तर घातक असतात. शिवाय वापर करून फेकल्यानंतर तो कचरा लँडफिलमध्ये जातो. त्यातून जमिनीत ती द्रव्यं शोषली जातात. नंतर ती इतर मार्गांनी परत आपल्यापर्यंत पोहोचतात. विघटन करण्यासाठी जाळण्याचाही मार्ग आहे परंतु त्यातही मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च केली जाते आणि प्रदूषण होतं ते वेगळंच. शिवाय ही उत्पादनं निर्माण करण्यासाठी लागणारी ऊर्जा, कच्चा माल व वाहतूक यामुळेही प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडते.  याउलट मेन्स्ट्रुअल कप हा उत्तम वैद्यकीय दर्जाच्या सिलिकाॅनपासून बनलेला असतो. सिलिकाॅन सिलिकापासून बनवलं जातं. त्याचं विघटन होताना ते त्याच्या मूळ स्वरूपात रूपांतरित होतं. सॅनिटरी पॅडमध्ये रक्तस्त्राव शोषून घेतला जातो तर मेन्स्ट्रुअल कप हा योनीमार्गात जात असल्याने कपमध्ये तो जमा केला जातो. काही तासांत तो रिकामा करून परत वापरता येतो. एक पॅड काही तास वापर झाल्यावर फेकावं लागतं तर एक कप वापरानंतर योग्य पद्धतीने निर्जंतुक केल्यास ५ ते १० वर्षं वारंवार वापरता येऊ शकतो.


एक स्त्री साधारण एक महिन्यात २० पॅड्स वापरते. वर्षभरात २४०. म्हणजेच एक कप हा २४०० पॅड्सच्या समतुल्य आहे. हा केवळ पर्यावरणाच्या दृष्टीने फायद्याचा नसून आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीनेही तुलनेने अधिक योग्य आहे. एका कपाची किंमत साधारण ७००-१००० रु. इतकी असते. ही उत्पादनं ऑनलाइन सहज उपलब्ध आहेत. shecup सारखे भारतीय ब्रँड्ससुद्धा बऱ्याच महिला पसंत करतात. सुरुवातीला महाग वाटत असला तरी याची किंमत एक वर्षाच्या आत वसूल होते. कप योनीमार्गाच्या आत जात असल्याने त्याचा वापर केल्यास इन्फेक्शन तसेच टॉक्सिक शॉक सिंड्रोमचाही (TSS) धोका कमी होतो, असे डॉक्टर्स सांगतात. मेन्स्ट्रुअल कप कुठल्याही वयाची स्त्री वापरू शकते. लहान मुलींसाठी छोट्या मापाचे कपही उपलब्ध आहेत. बऱ्याच खेळाडू महिला या पर्यायाचा वापर करतात. सॅनिटरी पॅड/टॅम्पॉनच्या तुलनेत कप सहज हालचाली करण्यासाठी सोयीस्कर आहे. ज्यांना हे कठीण वाटतं त्यांच्यासाठी बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्सचाही पर्याय उपलब्ध आहे.


मेन्स्ट्रुअल कपचा सोपा पर्याय असूनही भारतासारख्या देशात अजून म्हणावा तसा याचा योग्य प्रचार झालेला नाही. बऱ्याच स्त्रियांना असं काही असतं हेसुद्धा माहीत नाही. अजूनही औषधांच्या दुकानांमध्ये कप सहज उपलब्ध नाहीत. काही सांस्कृतिक समजुतींमुळे या बाबतीत उदासीनता आहे. या विषयावर स्त्रिया उघडपणे बोलणं टाळतात. बऱ्याच स्त्रियांच्या मनात कपच्या वापराबद्दल भीती आहे. सुरुवातीला थोडं धाडस करून प्रयत्न करावे लागतात. सवय व्हायला २ ते ३ महिने लागू शकतात. मदतीसाठी इंटरनेटवर भरपूर व्हिडिओज, वेबसाइट्स आहेत. अनेक महिलांनी वर्षानुवर्षं वापर करून त्यांचे अनुभवही मांडले आहेत. ते वाचून अभ्यासपूर्ण निवड करता येते. कपबरोबर येणारे युजर गाइडही उपयुक्त ठरते. शंका असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. गेली काही वर्षं याबद्दल माहिती असूनही मीसुद्धा नुकतीच या पर्यायाकडे वळले आहे. एकदा जमलं की मेन्स्ट्रुअल कप हे खरोखर वरदान ठरतं. जगभरात स्त्रिया या पर्यायाला आपलंसं करू लागल्या आहेत. भविष्यातील मोठी हानी टाळण्यासाठी जास्तीत जास्त स्त्रियांनी लवकर पर्यायाकडे वळायला हवं आणि बाकीच्यांनाही प्रोत्साहित करायला हवं.
 

बातम्या आणखी आहेत...