आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही जबाबदार ग्राहक आहात काय?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्यावर सध्या सोशल मीडियाचा प्रभाव फार आहे. परंतु ज्याने आपल्याला सोशल मीडियाचं वेड लावलं तो फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग रोजचा वेळ वाचावा म्हणून एकाच रंगाचे कपडे घालतो. केवढी ही विसंगती! लिओनार्डो दा विंचीने म्हटलंय की, simplicity is the ultimate sophistication. हे केवळ तत्त्वज्ञान नसून आर्थिकदृष्ट्या आणि त्यामुळेच शाश्वत विकासासाठीसुद्धा जास्त व्यावहारिक आहे. आपण यातून काही शिकणार आहोत का?

 

र्वसाधारणपणे विकास अर्थव्यवस्थेनुसार ठरवला जातो. सकल उत्पादन (GDP) हा त्यातला एक घटक. तो जितका जास्त तितका विकास जास्त असं समजलं जात होतं. १९९२नंतर विकासाच्या संकल्पना बदलू लागल्या. विकास फक्त विकास न राहता तो शाश्वत विकास कसा होईल, यासाठी सगळ्या स्तरांतून प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली.शाश्वत विकास म्हणजे आपल्या आत्ताच्या गरजा पूर्ण करताना भावी पिढीच्या गरजांबद्दल तडजोड न करणे.

अर्थविश्वात कार्बन क्रेडिट्स किंवा कार्बन ट्रेडिंग या संकल्पनाही लागू व्हायला लागल्या आहेत.
या सगळ्यात आपण काय करू शकतो? कुठल्याही अर्थव्यवस्थेचा अंतिम वापरकर्ता हा सामान्य ग्राहक म्हणजेच आपण असतो. तसंच ग्राहकवाद किंवा उपभोक्तावाद (consumerism) हे निसर्ग आणि आपल्यातलं अगदी जवळचं नातं आहे. ग्राहक या दोन्हींमधला फक्त दुवाच नाही तर अत्यंत प्रभावी घटक आहे. ग्राहकाच्या सवयी, जीवनशैली, आवडी-निवडी, इतकंच नाही तर विचारसरणीसुद्धा अर्थव्यवस्था व पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाशी निगडित आहे. 

 

आपण काय आणि किती खरेदी करतो ही जरी प्रत्येकाची वैयक्तिक निवड असली तरी याचे एकत्रित परिणाम मात्र जागतिक आहेत. आपण विकत घेत असलेली छोटी-मोठी प्रत्येक गोष्ट ही कुठल्या ना कुठल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून तयार केलेली असते. नैसर्गिक संसाधनं वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल पुरवून महत्त्वाची भूमिका बजावतात. यात जमिनी, जंगलं, पाणी, विविध खनिजं, प्राणी इत्यादींचा समावेश होतो. त्यामुळे ग्राहकवर्ग हा आर्थिक उलाढाली व नैसर्गिक संसाधनांचा वापर नियंत्रित करणारा घटक ठरतो. ग्राहकाचा वाटा फार मोठा आहे. उपभोक्तावाद/ग्राहकवाद एकूण ६०% हरितवायू उत्सर्जनास कारणीभूत आहे.

 

आपण आपल्या गरजांसाठी निसर्गाला किती ओरबडतो याचं मापक म्हणजे इकॉलॉजिकल फूटप्रिंट (पर्यावरणीय पदचिन्ह). मागे आपण कार्बन फूटप्रिंट (कार्बन पदचिन्ह) पाहिलं ते यात अंतर्भूत होतं. इकॉलॉजिकल फूटप्रिंट हा ग्लोबल हेक्टर्स (gha) किंवा आपल्या गरजा (मागण्या) पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकूण किती जमीन/पृथ्वीचं समतुल्य प्रमाण लागेल या संख्येत मोजला जातो. आपण आत्ता जसं जीवन जगतोय त्या मागण्यांचं प्रमाण आणि ते पुरवण्यासाठी नवनिर्माण होणाऱ्या पृथ्वीवरील संसाधनांचं प्रमाण यात खूप तफावत आहे. २०१४च्या अहवालानुसार आपला इकॉलॉजिकल फूटप्रिंट १.७ पृथ्वी समतुल्य इतका आहे. 

 

उच्चभ्रू समाज पर्यावरणाच्या ऱ्हासाला सगळ्यात जास्त कारणीभूत आहे. इतक्यातच ग्रेटा थुंबर्ग या स्वीडिश टीनेजर मुलीने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये हे वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. यातील बरेचसे सहभागी सभासद प्रायव्हेट जेट्सने आले होते. हा एक समाज नसून ती मनोवृत्ती जास्त मारक आहे. आणि ती समाजाच्या प्रत्येक स्तरात आहे. आपलं समाजातलं स्थान ठसवायला, अबाधित ठेवायला आपण वेळोवेळी निसर्गाला वेठीस धरत असतो. आपल्याकडचे उंची पोषाख/दागिने/गाड्या वगैरे मिरवायला कुणाला आवडत नाही? आपल्याकडे इतके-इतके कपडे/वस्तू आहेत हे आपण किती अभिमानाने सांगत असतो. मात्र त्याच वेळी जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक वॉरेन बफे म्हणतो की, मी एक कोटीची गाडी घेण्यापेक्षा २५ लाखांची गाडी घेऊन उरलेल्या पैशांची गुंतवणूक करीन. शेवटी उपयुक्तता सारखीच आहे. 

 

आपल्यावर सध्या सोशल मीडियाचा प्रभाव फार आहे. कुठलाही वयोगट यातून सुटला नाही. वेगवेगळे कपडे, नवीन गाड्या, अॅक्सेसरीज, मेकअप याचा दिखावा जो-तो करत असतो. त्याचा आपल्या एकंदर मानसिकतेवर आणि नकळत आपल्या खरेदीवरही परिणाम होतो. परंतु ज्याने आपल्याला सोशल मीडियाचं वेड लावलं तो फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग रोजचा वेळ वाचावा म्हणून एकाच रंगाचे कपडे घालतो. केवढी ही विसंगती! लिओनार्डो दा विंचीनेसुद्धा म्हटलंय की simplicity is the ultimate sophistication. हे केवळ तत्त्वज्ञान नसून आर्थिकदृष्ट्या आणि त्यामुळेच शाश्वत विकासासाठीसुद्धा जास्त व्यावहारिक आहे. 

एखादी नवी फॅशन आली की, ती इतकी लोकप्रिय होते की समाजातला प्रत्येक वर्ग ती मिळवायला धडपडतो. प्रसंगी त्याच्या गुणवत्तेबद्दल तडजोड झाली तरी चालते. झपाट्याने बदलणाऱ्या जगात थोड्याच दिवसात ती गोष्ट लगेच कालबाह्य होते आणि आपण दुसरीच्या मागे पळायला मोकळे होतो. सध्या काही ठिकाणी मिनिमलिस्ट (किमानप्रतिबंधक) जीवनशैली चळवळ जोर धरू लागली आहे. मिनीमलिस्ट जीवनशैली म्हणजे अत्यावश्यक तेच ठेवून बाकी सगळं वर्ज्य करणे. ‘कमी तेच जास्त’ हा या जीवनशैलीचा मंत्र. या जीवनशैलीला अनेक पैलू असले तरी पर्यावरणपूरकता हा त्यातला महत्त्वाचा घटक. यातल्या काही कल्पनांची अतिशयोक्ती वाटली, प्रत्यक्ष आचरणात आणणं सगळ्यांना कठीण असलं तरी शाश्वत विकासाकडे पाऊल टाकण्यासाठी यातल्या काही गोष्टी मार्गदर्शक ठरू शकतात. 

 

कमीत कमी व आवश्यक त्याच वस्तू घ्यायच्या असं आपण ठरवलं तर आपोआपच वस्तू घेताना त्या टिकाऊ आणि चांगल्या प्रतीच्या घेतल्या जातात. याउलट भरपूर खरेदी करताना वस्तूचा दीर्घकालीन उपयोग आणि गुणवत्ता याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपण प्रलोभनं आणि जाहिरातबाजीला सहज बळी पडतो. आपण बाजारपेठांना नियंत्रित न करता बाजारपेठा आपल्याला केेेव्हा नियंत्रित करायला लागतात हे आपल्या कळतही नाही आणि आपण त्यांच्या हातचं बाहुलं बनतो. मॉल्स किंवा सुपरमार्केट या नियंत्रणाचीच उदाहरणं आहेत. आपल्याला सतत काही न काही खरेदी करण्याची कायम ‘गरज’च असते. एका वस्तूच्या खरेदीसाठी गेलो तर सहज जास्तीच्या चार वस्तू घेऊन आपण बाहेर पडतो. आपण किती खरेदी करतोय यावर बहुतांश कंपन्यांचा नफा थेट अवलंबून असतो. एखाद्या कंपनीचा मालक एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारी जमीन, इतर साधनं, नैसर्गिक संसाधनं, वाहतूक इत्यादींचा विचार फक्त आर्थिक बाजूने विचार करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून जाहिरातबाजी होऊन आपलं ब्रेनवॉशिंग केलं जातं. ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यात तर सगळं अगदी सोपं झालंय. पण त्याला बळी न पडता समजा मी आज ठरवलं की, मला जास्तीत जास्त पर्यावरणपूरक आणि टिकाऊ वस्तू घ्यायच्या आहेत. त्यासुद्धा आवश्यक त्याच आणि आवश्यक तितक्याच. आणि असं जर माझ्यासारख्या अनेकांनी ठरवलं तर मागणी आणि पुरवठ्याच्या नियमांप्रमाणे उत्तम दर्जाच्या आणि पर्यावरणपूरक वस्तूंचंच जास्त उत्पादन होईल. हे सगळ्या प्रकारच्या वस्तूंना लागू होतं. मी जर हानिकारक आणि अनावश्यक वस्तू नाकारल्या आणि असं सगळ्यांनी केलं तर त्याचा थेट एकत्रित परिणाम उत्पादनावर होईल. आपल्याला उत्पादन कमी करायचं नसून योग्य त्या वस्तूंचं, योग्य त्या प्रकारे आणि योग्य तितकंच उत्पादन व्हावं यासाठी आपल्या बाजूने प्रयत्न करायचे आहेत.  मागणी तसं उत्पादन असतं. उत्पादनाचं प्रमाण, प्रकार, त्यासाठी आवश्यक संशोधन ही सगळी एकात एक गुंतलेली साखळी आहे. स्मार्टफोनचंच उदाहरण पाहा. वाढती मागणी आणि स्पर्धा यामुळे या क्षेत्रात संशोधनसुद्धा किती झपाट्याने झालं. तसंच पर्यावरणपूरक उत्पादनांच्या बाबतीतही होऊ शकेल. वरवर यातली आपली भूमिका नगण्य वाटत असली तरी जागतिक बाजारपेठेचं स्वरूप बदलण्याची ताकद आपल्यात आहे. आणि एक जागरूक ग्राहक म्हणून जबाबदारीसुद्धा!

 

आपण वेळीच बदल केले नाहीत तर आत्ता आहेत तितकी नैसर्गिक संसाधनं फार काळ पुरणं शक्य नाही. गांधीजींनी म्हटलंय ते अगदी खरंच आहे. The earth has enough for everyone’s needs, but not enough for everyone’s greed. एकच पृथ्वी आपल्या गरजा भागावण्याचा ताण सहन करतेय. गरजेपेक्षा जास्त असलेली प्रत्येक वस्तू हे पृथ्वीचं एक प्रकारे शोषणच आहे. याची जाणीव जेव्हा प्रत्येकाला होईल तेव्हाच बदल शक्य आहे. एक जागरूक ग्राहक बनून आपल्याला विकास आणि शाश्वत विकास यातला फरक ओळखायचाय आणि त्या दिशेने पावलं उचलायची आहेत. 

बातम्या आणखी आहेत...