संदर्भ... / बॉलीवूडने ‘पॅरासाइट’चा आदर्श का गिरवू नये?

50 पेक्षा जास्त प्रवेशिका तरीही आपले हात रिकामेच, इराण आणि चिलीही भारतापेक्षा सरस

दिव्य मराठी

Feb 19,2020 08:40:00 AM IST

‘पॅरासाइट’ या दक्षिण कोरियाच्या चित्रपटाने कशाप्रकारे सबटायटलचा एक इंचाचा अडथळा पार केला आणि आॅस्करमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवणारा पहिला विदेशी चित्रपट ठरला यावर हाॅलीवूडमध्ये आजही चर्चा थांबलेली नाही. जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा भारत अकॅडमी पुरस्कारासाठी लायक असलेला चांगला चित्रपट का तयार करू शकत नाही, असा जुनाच प्रश्न माझ्यासारख्या भारतीय चित्रपट रसिकांसमोर आहे. भारताने कधीही सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला नाही. प्रयत्न कमी पडले, असे नाही. १९५७ मध्ये या पुरस्काराच्या स्थापनेनंतर भारताने किमान ५० वेळा प्रवेशिका दाखल केल्या आहेत. फक्त फ्रान्स आणि इटलीनेच भारतापेक्षा जास्त वेळा प्रवेशिका दाखल केल्या आहेत, पण त्यांनी अनेकदा पुरस्कारही पटकावलेला आहे. फक्त युरोपियन चित्रपट पॉवरहाऊसच ऑस्करमध्ये चमकले आहेत असे नाही. २७ देशांच्या चित्रपटांना सर्वोत्तम विदेशी चित्रपटांचा पुरस्कार मिळाला आहे. त्यात इराण, चिली आणि आयव्हरी कोस्टचाही समावेश आहे.


भारतीय समर्थक त्यासाठी असे युक्तिवाद करतात की, भारतीय प्रवेशिका निवडणाऱ्या समितीने कमजोर निवड केली. जो कंटेंट भारतीय प्रेक्षकांना आवडतो तो जागतिक प्रेक्षकांना आवडत नाही. आपली देशांतर्गत बाजारपेठच खूप मोठी आणि आपण आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना खुश करण्याची गरज नाही. त्यापेक्षा सर्वात मोठा युक्तिवाद म्हणजे भारतीय चित्रपट जागतिक दर्जाचा आहे, पण अकॅडमी पक्षपाती आहे; तिला गुणवत्तेची पारख नाही. पण, यापैकी कुठलाही युक्तिवाद टिकू शकत नाही. भारतीय चित्रपट ऑस्करच नव्हे, तर प्रत्येक प्रमुख चित्रपट महोत्सवात कमी पडत आहेत. त्यापैकी खूपच कमी चित्रपट कान, व्हेनिस किंवा बर्लिनमध्ये मेन स्लॉटमध्ये स्थान मिळवू शकतात. आजपर्यंत कुठलाही भारतीय चित्रपट कानमध्ये पाम डी’ऑर किंवा बर्लिनमध्ये गोल्डन बिअर जिंकू शकलेला नाही. त्यामुळे जगात चित्रपटांचे समीक्षण करणाऱ्या सर्व परीक्षकांची भारतीय चित्रपटांबाबतची भूमिका चुकीची आहे, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.


मीरा नायर यांनी व्हेनिसमध्ये ‘मान्सून वेडिंग’साठी २००१ मध्ये सर्वोच्च पुरस्कार जिंकला आहे आणि त्यांनी आपल्या बहुतांश कारकिर्दीत भारतीय चित्रपट उद्योगाबाहेरच काम केले आहे हे ठीकच. भारत जागतिक स्तरावरील चित्रपट बनवत नाही, हीच वस्तुस्थिती आहे. जगातील प्रमुख चित्रपट समीक्षकांद्वारे न्यूयॉर्क टाइम्सपासून इंडिवायरपर्यंतच्या सर्व प्रकाशनांत येणाऱ्या याद्यांवर नजर टाकली तर गेले एक वर्ष, एक दशक किंवा एक शतक किंवा आतापर्यंतच्या अव्वल चित्रपटांच्या यादीत एकही भारतीय चित्रपट दिसणार नाही. एक वर्षापूर्वी बीबीसीने ४३ देशांच्या २०० चित्रपट समीक्षकांत केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर १०० विदेशी सार्वकालिक चित्रपटांची यादी बनवली होती. त्यात फक्त सत्यजीत रे यांच्या ‘पाथेर पांचाली’लाच स्थान मिळू शकले आणि हा चित्रपटही १९५५ मध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय दिग्दर्शकांनी विदेशी समीक्षक आणि जागतिक प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवावा, असा याचा अर्थ नाही. त्यांनी मानवी भावनांना स्पर्श करणारे महान चित्रपट बनवावे आणि किमान एका भारतीय चित्रपटाला कधीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी.


चीन, जपान आणि ब्राझीलचा चित्रपट उद्योगही फक्त आपले देशांतर्गत प्रेक्षक लक्षात घेऊन चित्रपट बनवतो; पण ऑस्कर, चित्रपट महोत्सवात त्यांचे प्रदर्शन भारतापेक्षा जास्त चांगले असते. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांच्या नजरेत येण्याआधीच ‘पॅरासाइट’ने दक्षिण कोरियाच्या चित्रपटगृहांत खळबळ उडवली होती. मग, भारतीय चित्रपटांच्या खराब स्तराचे कारण काय? चित्रपट लोकप्रिय संस्कृतीद्वारे प्रवाहित होतात, पण आपण सेलिब्रिटींबाबत एवढे वेडे आहोत की, ते गुणवत्ता खराब करत आहेत. पटकथा, संपादन आणि इतर कलांमुळेच चित्रपट महान ठरतात. इतर कुठल्याही प्रमुख चित्रपट उद्योगांत कलावंत चित्रपटाच्या बजेटचा एवढा मोठा भाग घेत नाहीत की, निर्मात्याला या कलांसाठी पैशाची कमतरता भासावी. अनेकदा पटकथा कथेऐवजी स्टार डोळ्यांसमोर ठेवून लिहिली जाते आणि त्यामुळेच आपल्या चित्रपटांबाबत आंतरराष्ट्रीय समीक्षक उदासीन राहतात. भारताने यापेक्षा चांगले करण्याची अपेक्षा ठेवावी.


आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत जे मोठे भारतीय पथक जाते, त्याचे लक्ष चित्रपटाच्या कंटेंटऐवजी आपले स्टार रेड कार्पेटवर काय परिधान करत आहेत याकडेच जास्त असते. तेथून परतल्यानंतर मीडियाही ज्या ब्रँडची भारतात साहित्य विकण्याची इच्छा आहे त्यांचीच क्लिप दाखवतो. पण, भारत वारंवार रिक्त हाताने का परतत आहे याबाबत काहीच म्हणत नाहीत. त्यांची अपेक्षा खूप कमी आहे आणि त्यांना तेवढेच मिळते. हे बदलण्यासाठी देशांतर्गत चित्रपट उद्योगांशी संबंधित जास्तीत जास्त लोकांमध्ये जागतिक स्तरावरील कंटेंट बनवण्याची तीव्र इच्छा तयार व्हायला हवी. तसा दबाव येण्याचे काही संकेतही आहेत. गेल्या काही वर्षांत मोठ्या स्टार्सचे चित्रपट कोसळले, तर दुसरीकडे कमी बजेटच्या आणि चांगली कथा असलेल्या चित्रपटांची कामगिरी खूप चांगली राहिली. बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांची संख्या स्थिर राहिल्याने आणि लाइव्ह स्ट्रीमिंग, डिजिटल गेमिंगसोबतच स्क्रीन मनोरंजनाचे अनेक पर्याय समोर आल्याने भारतीय निर्मात्यांना हे समजून घ्यावे लागेल की व्यावसायिक रूपात कायम राहण्यासाठी गुणवत्ता हाच एकमेव मार्ग असेल.


तोपर्यंत न्यूयॉर्कमध्ये राहणारा माझ्यासारखा भारतीय चित्रपटाचा चाहता मॅनहॅटनमधील हिंदी चित्रपट दाखवणाऱ्या थिएटरमध्ये जात राहील. माझे खूप प्रेम असलेल्या आणि आठवण येत असलेल्या देशाशी जोडून राहण्याचे ते एक माध्यम आहे. भविष्यात एक दिवस मला ‘पॅरासाइट’सारखा एक भारतीय चित्रपट मिळेल, अशी आशा मी कायम बाळगत राहीन.


रुचिर शर्मा, द न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक

X