आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना पडला दुष्काळाचा विसर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नगर : जानेवारी महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळावर चर्चाच झाली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही दुष्काळाचा विसर पडला का? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागाचे सर्व अर्थकारण जिल्हा परिषदेवर अवलंबून असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकारीच दुष्काळाच्या विषयावर गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना देखील दुष्काळाचा विसर पडला की काय? असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहेत. 


नगर जिल्ह्यात यंदा अवघा ४० ते ४५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. कमी पावसामुळे धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात खालावत चालला आहे. त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडत चालल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसते. कमी पावसामुळे ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात पाणी टँकर सुरू झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत टँकरची संख्या झपाट्याने वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ३५० हून पाणी टँकर सुरू आहेत. जानेवारी अखेरपर्यंत ही संख्या ४०० वर जाणार आहे. फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत जिल्ह्यात एक हजारांहून अधिक पाणी टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. खरीप हंगाम वाया गेला. जनावरांना पाणी नाही, चारा नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झालेले आहे. गेल्या महिन्यातच राज्य सरकारने जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ५०० हून अधिक गावे दुष्काळी म्हणून जाहीर केले. या गावांत दुष्काळी उपाययोजना लागू झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात किती लाभार्थींना उपाययोजनांचा लाभ मिळाला, याची अधिकृत माहितीही प्रशासनाला नाही. पाणी नसल्याने ग्रामीण भागात चाऱ्याची टंचाईही देखील निर्माण झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर चारा अन्य जिल्ह्यांत नेण्यास बंदी घातली आहे. मात्र, ही बंदी देखील कागदावरच राहिली आहे. 


चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात असताना प्रशासन मात्र कागदोपत्रीच घोडे नाचवत आहे. प्रशासनाकडून अजून शासनाकडून छावण्यांबाबत निर्णय आलेला नाही, असे सांगत आहे. ग्रामीण भागात दुष्काळामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते बिघडली असताना राजकीय पक्षांचे नेते मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत. दुष्काळाची सर्वाधिक झळ ग्रामीण भागाला यंदा बसणार आहे. त्यात पालकमंत्र्यांचा मतदार संघ असलेला कर्जत-जामखेड, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदे, पारनेर व नगर या तालुक्यांना दुष्काळाची झळ बसत आहे. उत्तर नगर जिल्ह्यात मुळा, प्रवरा व गोदावरी कालव्यामुळे सध्या टंचाईची स्थिती नसली, तरी भविष्यात या भागालाही दुष्काळाचा फटका सहन करावा लागणार आहे. दुष्काळासारख्या गंभीर विषयावर जिल्हा परिषदेच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणे अपेक्षित असताना या विषयावर सत्ताधारी व विरोधकांनीही देखील मौन पाळले. 


दुष्काळासाठी विशेष सभा बोलवा 
नगर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी व चाराटंचाई निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळावर चर्चा होणे अपेक्षित होती. मात्र, ती झाली नाही. दुष्काळासारख्या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेने विशेष सभा बोलवावी.'' जालिंदर वाकचौरे, गटनेते, भाजप. 


पालकमंत्री ही गप्पच... 
दुष्काळाची झळ पालकमंत्री राम शिंदे यांचा मतदारसंघ असलेला कर्जत-जामखेडला बसत असताना पंधरा दिवसांपूर्वी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाईचा आढावा घेतला. मात्र, त्या आढव्यातून ठोस पर्याय निघाला नाही. त्यामुळे ही बैठक केवळ चर्चेसाठीच होती का? असा प्रश्न या निमित्त पुढे आला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...