आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पानाचे दुकान चालवत शिक्षण पूर्ण, आता मजुरांच्या मुलांसाठी मोफत शाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझा जन्म धनबाद जिल्ह्यातील कतरास गावात झाला. त्या वेळी झारखंड हा बिहारचाच भाग होता. माझे आजोबा १९४० मध्ये कामाच्या शोधात ते उत्तर प्रदेशातून बिहारला आले. कोळसा खाणीत मजुरी करू लागले. येथे त्यांनी थोडी जमीन खरेदी केली. आजोबांनंतर ती माझे वडील राजेंद्र सोनार यांना मिळाली. वडिलांचे पानाचे दुकान होते. दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आम्ही पाच भावंडे आणि आई-वडिलांचे पोट कसेबसे भरत होते. नंतर कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण झाले तेव्हा आमच्या जमिनीचे अधिग्रहण झाले. त्या बदल्यात वडिलांना बीसीसीएलमध्ये मजुराची नोकरी मिळाली. वडील खाणीत जात होते, त्यामुळे पानाच्या दुकानाची जबाबदारी माझ्यावर आली. आमच्या गावात सगळेच मजूर असल्याने अनेकांची मुलेही कामावर जात होती. अशा वातावरणात एका मोडक्या सरकारी शाळेत माझे शिक्षण सुरू झाले. त्यासोबत दुकानही चालवत होतो. २००० मध्ये दहावी पास झालो. आमच्या विभागातून १,२९७ मुलांपैकी १०८ मुले पास झाली. त्यात मी टॉपवर होतो. पण मलाही ४० टक्केच मार्क होते. यावरून शिक्षणाचा दर्जा कसा होता, याची कल्पना येईल. दहावीच मला फक्त २ रुपये शुल्क लागले. पण पुढील शिक्षणाचा खर्च वाढतच गेला. वह्या-पुस्तके खरेदी करावी लागली. २००० रुपये पगारात वडिलांनी माझ्या दोन्ही बहिणींचे लग्न केले आणि ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे पुढे शिकायचे असेल तर स्वत:च्या मेहनतीवर कमावून शीक, असे वडिलांनी सांगितले. मला शिकवण्याची त्यांची खूप इच्छा होती, पण परिस्थिती त्यांच्या हाताबाहेरची होती. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मी ट्यूशन सुरू केल्या. असाच संघर्ष करत १२ वी पास झालो. त्यानंतर एलआयसी एजंट बनलो. या कामात पैसा मिळू लागला. त्यामुळे राष्ट्रीय उद्योग संस्था (एनआयटी), दुर्गापूर येथून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एजंटचे काम करतानाच एमबीए झालो. लखनऊमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेतून एमडीपी केले. २००७ मध्ये कॅट परीक्षा दिली, तेव्हा कोल इंडिया लिमिटेड (कोलकाता) येथे नोकरी मिळाली. माझ्या शिक्षणासोबत मी दोन लहान भावांनाही शिकवले. आज ते दोघही आयआयटीयन आहेत. २०१२ मध्ये माझे लग्न झाले. पत्नी प्रोफेसर आहे. तिचा स्वभाव माझ्याशी मिळताजुळता आहे. एवढ्या वर्षाच्या संघर्षात मी नेहमी विचार करत असे, धनबादला बदली करून तेथील मजूर मुलांसाठी काहीतरी करायचे. कोलकात्यात पाच वर्षे नोकरी केल्यानंतर माझी बदली धनबाद कोळसा खाणीत झाली. गंमत म्हणजे इथे पंप ऑपरेटर म्हणून माझे वडील काम करतात आणि मी मोठा अधिकारी म्हणून काम पाहतो. 


तेथील स्थिती पाहिली असता, काही अधिकाऱ्यांची मुले न शिकल्यामुळे अनुकंपा नियुक्तीनुसार मजूर बनले होते. तर याउलट माझे वडील मजूर असूनही शिक्षणामुळे मी अधिकारी बनलो. माझ्या गावातील परिस्थितीही फार सुधारली नव्हती. खाणीतील मुजरांच्या मुलांची स्थिती पाहून त्यांचे आयुष्य बदलण्याचा निर्णय घएतला. मी त्यांना मोफत शिकवायला सुरुवात केली. पण एवढे पुरेसे नव्हते. त्यामुळे २०१५ मध्ये दोन खोल्यांचे घर घेऊन ‘पाठशाला’ नावाने एका शाळेची नोंदणी केली. सुरुवातीला मुले फरशीवर बसूनच शिकत होती. हळूहळू फर्निचर वाढले. प्रोजेक्टर, एलसीडी, अॅक्वागार्ड इत्यादी सुविधा वाढल्या. अशा प्रकारे पाचवी इयत्तेपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली. आमच्या शाळेत वह्या-पुस्तके, शिक्षण सर्व मोफत आहे. त्यानंतर माझा जन्म झाला, त्या गावी मी दुसरी शाळा उघडली. येथे जवळपास १० किलोमीटर परिसरात शाळाच नव्हती. मी माझ्या जुन्या घरात ८ लाख खर्च करून चार खोल्यांची शाळा सुरू केली. येथेही केवळ खाणीत काम करणाऱ्या मजुरांचीच मुले शिकतात. हे मजूर कमावलेला पैसा दारूच्या व्यसनात घालवतात. आम्ही मुलांना दोन टी शर्ट देतो. त्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे इतर कपडेही नसतात. पुढील सत्रापासून दहावीपर्यंत शाळा सुरू करण्याचे माझे प्रयत्न आहेत. आज येथे ३०० विद्यार्थी असून १९ शिक्षक त्यांना शिकवतात. माझा पगार दीड लाख रुपये असून त्यापैकी ६० हजार रुपये मी दर महिन्याला शिक्षकांच्या पगारावर खर्च करतो. माझी पत्नी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तिचा पगारही भरपूर आहे. त्यात घर चालते. पण आज पत्नीच्या मदतीशिवाय हे काम झालेच नसते. माझे मित्र, दोन भाऊ, पत्नी आणि इतर लोकांच्या सहकार्यानेच शाळेचे काम एवढे विस्तारले आहे. आमचे काम पाहून समाजातील मदतीचे हातही पुढे आले. शाळेतून उत्तम गुणांनी पास झालेल्या मुलांचे बाहेर शिक्षण सुरू आहे. त्यांनाही आर्थिक मदत पुरवण्याचे काम आम्ही करतो. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, झारखंड सरकारच्या अनेक मंत्र्यांनी माझ्या कामाची स्तुती केली. पण सरकारी मदत कुणीही केली नाही. सध्या केवळ नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीवर शाळा सुरू आहे. सरकारी मदत मिळण्याचे आमचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.    
शब्दांकन- एहसान फैज, प्रतिनिधी, कतरास

बातम्या आणखी आहेत...