आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या प्रश्नांकडे डॉक्टर लक्ष देतील का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान होते तेव्हापासून मला डॉक्टर्स आवडतात. त्याचे विशेष कारण म्हणजे आमचे फॅमिली फिजिशिअन डॉक्टर मुखर्जी यांच्या क्लिनिकमध्ये विविध प्राण्यांच्या आकाराच्या गोळ्यांनी भरलेली एक बरणी असे व मी त्यातून हव्या तेवढ्या गोळ्या फस्त करू शकत असे.
आज सांगायला संकोच वाटतो, पण लहानपणी मी अनेकदा मरणाचा खोकला किंवा डोकेदुखीने त्रस्त असल्याचे नाटक केले आहे. कारण एकच दवाखान्यात जाऊन गोळ्या खाता याव्या. मी जवळपास दररोज त्या दवाखान्यात जाऊन बराच वेळ मजेत घालवत असे. जांभळ्या माकडाच्या गोळ्या मला फार आवडत. मी मोठी झाले. डॉक्टर मुखर्जीही थकले होते. त्यांनी क्लिनिकमध्ये एक सहायक डॉक्टर नियुक्त केला होता. हा देखणा तरुण डॉक्टर माझ्या आवडत्या हॉलीवूड अभिनेत्यासारखा दिसे. म्हणूनच आईने फॅमिली डॉक्टर बदलेपर्यंत मी माझे खोकल्याचे नाटक सुरूच ठेवले होते.
आज मी मोठी व समजूतदार आहे. ‘सत्यमेव जयते’चा निर्माता आमिर खानप्रमाणे मलाही जाणवले आहे की, डॉक्टर्स परफेक्ट नसतात. आमिर खान त्याच्या कार्यक्रमात रडण्यात गुंग असल्यामुळे डॉक्टरांना जे प्रश्न विचारू शकला नव्हता, ते मी विचारू इच्छिते.
- डॉक्टर्स त्यांच्या प्रतीक्षाकक्षात जुनी, रद्दड मासिके का ठेवतात? त्या मासिकांमध्ये स्कर्व्हीसारख्या रोगांवरील अत्याधुनिक उपचारांशी संबंधित लेख असतात. डॉक्टरांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या ब्यूटीपार्लरमध्ये लाइफस्टाइल व पॉलिटिक्ससारख्या मनोरंजक विषयावरची पुस्तके असतात. डॉक्टरांनो, आम्हाला तासन्तास वाट पाहायला लावता, मनोरंजक किमान वाचण्याजोगी चार पुस्तके तरी तुमच्या प्रतीक्षा कक्षात ठेवा!
- वैद्यकीय महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात रुग्णाला लिहून देण्याची औषधे अत्यंत घाणेरड्या अक्षरात कशी लिहावी हे शिकवण्यासाठी स्वतंत्र वर्ग असतो का? तुमचे घाणेरडे अक्षर वाचणे कधीकधी औषध विक्रेत्यांनाही शक्य होत नाही व आमच्या हाती चुकीची औषधे दिली जातात, हे लक्षात घ्या. आमच्यासाठी एक उपाय करा. अक्षर सुवाच्य होईपर्यंत ‘मी माझे अक्षर सुधारेन’ असे तुमच्या रायटिंग पॅडवर दररोज 100 वेळा लिहा.
-विमानतळावरून काही गुण घ्या व तुमच्या क्लिनिकमध्ये बाहेरील बाजूस एका भागात कॉफी शॉप, फूट मसाज पार्लर सुरू करा. एकदा मी फ्ल्यूच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे गेले होते, पण तेथे माझा नंबर येण्यासाठी चार तास वाट पाहावी लागल्याने मला वेगळेच दोन आजार झाले. भुकेमुळे जीव कासावीस झाल्याने पित्त झाले व चार तास अंग चोरून बसावे लागल्यामुळे रक्ताभिसरणात अडथळे निर्माण झाले.
प्रिय डॉक्टरांनो, तुम्हा सर्वांबाबत माझ्या फक्त एवढ्याच तक्रारी आहेत. लवकरात लवकर या सर्व समस्यांवर उपाय शोधा, हीच नम्र विनंती!