Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Rupee falls, dollar uptrending; effect on import

रुपयाची घसरण, डॉलर वधारतोय, आयातीचे घोडे अडले, निर्यात ठप्प

श्रीनिवास दासरी | Update - Sep 12, 2018, 11:34 AM IST

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया मोठ्या प्रमाणात घसरतोय. मंगळवारी डॉलरचा दर होता ७२ रुपये ४५ पैसे. गेल्या महिनाभरातच ३ रुप

 • Rupee falls, dollar uptrending; effect on import

  सोलापूर- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया मोठ्या प्रमाणात घसरतोय. मंगळवारी डॉलरचा दर होता ७२ रुपये ४५ पैसे. गेल्या महिनाभरातच ३ रुपये ३५ पैशांनी त्यात वाढ झाली. त्याचा मोठा फटका आयात करणाऱ्या उद्योग घटकांना बसत असून, प्रामुख्याने रासायनिक उत्पादन क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे डॉलर वाढला, की निर्यातदारांची चांदी असते, असे म्हणतात. परंतु मागणीच नसल्याने निर्यात करायची तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यंत्रमागांवरील उत्पादनांची निर्यात ७० टक्के ठप्प झाली. एकूणच स्थितीकडे पाहिल्यास खाताही येत नाही अन् सोडून देताही येत नाही, अशी झाली.


  चिंचोळी आैद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखाने आहेत. त्यांचा प्रमुख कच्चामाल अायात होतो अन् पक्कामाल निर्यात केला होतो. त्यामुळे त्यांचे समीकरणच बिघडले. ६२ ते ६४ रुपये डॉलरचा दर असताना त्यांनी मागणी नोंदवली. त्याआधारे पक्क्या मालाचे दर ठरवले. दरम्यान, रुपया गडगडला अन् उत्पादन खर्चाचा समतोल बिघडला. कमी-अधिक कालावधीसाठी या घडामोडी नित्याच्या असतात. परंतु डॉलर वधारतच असल्याने उत्पादक मंडळी हवालदिल झाली. आणखी किती वाढणार याचा अंदाज बांधत बसली.


  निर्यातदारांस आशादायी
  डॉलरच्या वाढत्या दरामुळे आयातदारांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली. त्याचा आलेख आणखी कुठंवर जाईल, त्याचा काही अंदाज बांधता येईना. अशा स्थितीत विमा उतरवून समतोल राखण्याचा एक मार्ग अाहे. शंभर टक्के निर्यात करणाऱ्यांना तर चांगलेच दिवस आले म्हणायचे.
  - डी. राम रेड्डी, सहव्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाइन्स


  निर्यात धोरण ठरवावे
  उद्योगांच्या आधुनिकीकरणासाठी परदेशी बनावटीच्या यंत्रसामग्रीची आयात केली जाते. ६२ ते ६४ रुपये डॉलरचे दर असताना अशा मागणी नोंदवल्या गेल्या. परंतु त्यात ८ ते ९ रुपयांची वाढ झाल्याने उद्योजकांचे बजेटच कोलमडले. ही स्थिती पाहता, निर्यात धाेरण आखणे गरजेचे वाटते.
  - राजू राठी, अध्यक्ष, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स

  ७० टक्के निर्यात ठप्प
  चीन, पाकिस्तान, बांग्लादेश, व्हिएतनाम येथेही टॉवेलचे उत्पादन सुरू झाले. सोलापूरच्या उत्पादकांशी स्पर्धेत उतरले. त्यामुळे सोलापूरच्या यंत्रमागांवरील उत्पादनांची निर्यात सुमारे ७० टक्के ठप्पच झाली. पाश्चात्य देशांमध्ये निर्यात धोरण सर्वांना समान नाही. त्याचाही फटका बसतो.
  - पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष जिल्हा यंत्रमागधारक संघ

Trending