आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपया ७२.६७ पर्यंत घसरला, नियंत्रणासाठी उपाय करण्याचे रिझर्व्ह बँकेला सरकारचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जागतिक व्यापारी युद्धाची शक्यता, विदेशी गुंतवणूकदारांकडून हाेणारी विक्री आणि निर्यातकांच्या वतीने डॉलरची मागणी यांचा विचार करता भारतीय चलनातील घसरण सुरूच आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७२ पैशांच्या घसरणीसह विक्रमी ७२.४५ वर बंद झाला. ही १३ आॅगस्टनंतर रुपयातली सर्वात मोठी घसरण आहे. त्या दिवशी रुपयात ११० पैशांची घसरण झाली होती. सोमवारी झालेल्या व्यवहारात हा १.३ टक्के म्हणजेच ९४ पैशांच्या घसरणीसह ७२.६७ पर्यंत पोहोचला होता. त्या वेळी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात डॉलरची विक्री केल्याने, रुपयाची स्थिती थोडी सुधारली होती. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने रिझर्व्ह बँकेला रुपयात आणखी घसरण थांबवण्यासाठी उपाय करण्याचे सांगितले आहे. आशियाई देशांतील चलनांपैकी सर्वाधिक १३ टक्क्यांची घसरण रुपयातच झाली आहे. सलग सात दिवस झालेल्या घसरणीनंतर शुक्रवारी रुपयात २६ पैशांची तेजी नोंदवण्यात आली होती. त्याच दिवशी अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधील २६७ अब्ज डॉलरच्या (१९ लाख कोटी रुपये) आयातीवर शुल्क लावण्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे सोमवारी पुन्हा रुपयामध्ये घसरण झाली. 


स्विस ब्रोकरेज संस्था यूबीएसने भारतीय चलनात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. जीएसटी संकलनात घट होत असून राज्यांचा तोटा मिळवल्यास हा जीडीपीच्या ६.५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता या संस्थेने व्यक्त केली आहे. सरकारने ५.९ टक्के तुटीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. ऑक्टोबर-मार्च सहामाहीत जीडीपी विकास दर कमी होऊन ७ ते ७.३ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज यूबीएसने व्यक्त केला आहे.

 
रुपयात घसरणीचा परिणाम : कच्च्या तेलाच्या आयात बिलात ८७ टक्के वाढ 
जुलै महिन्यात कच्च्या तेलाच्या आयात बिलात ८७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जुलै २०१७ मध्ये ३७,२७७ कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात झाले होते. जुलै २०१८ मध्ये ते ६९,९१२ कोटी रुपये झाले आहे. अलीकडच्या काळात कच्च्या तेलाच्या दरात सलग वाढीमुळे दर ७५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. सोमवारी कच्चे तेल ७७.५ डॉलरच्या जवळपास होते. 


रिझर्व्ह बँक कोणते उपाय करू शकते? 
- एनआरआयसाठी डिपॉझिट योजना जाहीर करू शकते. एनआरआयच्या जमामुळे देशात डॉलरचा प्रवाह वाढेल 
- रुपयाला वाचवण्यासाठी मे महिन्यात रिझर्व्ह बँकेने ५.८ अब्ज डॉलर आणि जूनमध्ये ६.१८ अब्ज डॉलरच्या विदेशी गंगाजळीची विक्री केली होती. 


मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ४६८ अंकांच्या घसरणीसह ३७,९२२ या पातळीवर बंद झाला, तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १५१ अंकांच्या घसरणीसह ११,४३८ या पातळीवर बंद झाला. मोठ्या शेअरमध्ये एचडीएफसी, रिलायन्स, आयटीसी, एचडीएफसी बँक यांच्यातील विक्रीमुळे व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ५०७ अंकांनी घसरला होता. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे दोन लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक १.६८ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...