आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी शाळेतील ग्रामीण विद्यार्थी परदेशी पाहुण्यांना निराेप देताना अस्खलित इंग्रजीत म्हणाले, 'डू कम अगेन, वुई विल मिस यू लाॅट..'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- 'सर व्हेन विल यू रिटर्न बॅक? प्लीज बी इन टच वुईथ अस.. युवर अॅक्टिव्हिटी इज व्हेरी माेटिव्हेटिंग.. कीप इट अप.. डू कम अगेन.. वुई विल वेलकम यू अलवेज.. वुई विल मिस यू लाॅट...,' शिंदे येथील गुरुकुल विद्यालयाचे विद्यार्थी पाणावलेल्या डाेळ्यांनी परदेशी पाहुण्यांना निराेप देत हाेते... या पाहुण्यांच्या सहवासात महिन्याभराच्या काळात विद्यार्थी अस्खलित इंग्रजी बाेलू लागले हाेते. याच अात्मविश्वासपूर्ण भाषेत त्यांनी पाहुण्यांना निराेप दिला अाणि मग या साध्याभाेळ्या मुलांच्या डाेळ्यातील निरागस भाव पाहून पाहुण्यांचेही डाेळे पाणावले.. 


अायसेक इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून स्पेनहून अालेले जोसेल लुईस आणि झेवियर सर्राटे हे तरुण शाळेत महिनाभर प्रशिक्षणासाठी अाले हाेते. या काळात पाहुण्यांची विद्यार्थ्यांशी मस्त गट्टी जमली हाेती. गाणी, गाेष्टी, विविध खेळ खेळताना विद्यार्थी त्यांच्याशी चांगले इंग्रजी बाेलू लागले. बाेलताना काही व्याकरणाच्या चुका झाल्यास त्या तेथेच पाहुणे सुधारत. इतकेच नव्हे तर व्याकरण अगदी साेपे करून त्यांनी शिकविले. 


या काळात त्यांनी मुलांना व्याकरणासह शब्दाेच्चार, परदेशातील खेळ शिकविले. या पाहुण्यांशी गप्पा मारण्याची साऱ्यांनाच उत्सुकता वाटायची. त्यामुळे त्यांच्याशी सुरुवातीला ताेडक्या-माेडक्या भाषेत संवाद सुरू झाला. त्यांच्याशी केवळ इंग्रजीतच बाेलावे लागत असल्याने सरावाने महिन्याभरात विद्यार्थी चांगल्या पद्धतीने इंग्रजी बाेलू लागले अाणि उपक्रमाचा उद्देशही त्यातून अापाेअापच सफल झाला. मुलांनीही या परदेशी पाहुण्यांना कबड्डी अाणि खाे-खाेसारखे खेळ शिकविले. 


परदेशी पाहुण्यांसह डाेंगरावर राेवली बिजे
परदेशी तरुणांनी प्रशिक्षणाच्या अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांसाेबत संपूर्ण दिवस घालवला. जवळपासच्या डाेंगरावर विविध फळझाडांच्या बिया टाकत वृक्षाराेपणाचे बिज रुजवले. विशेष म्हणजे वृक्षाराेपणाची ही पद्धत पाहुण्यांना अापल्या विद्यार्थ्यांनी लक्षात अाणून दिली. 


बहरीन, तुर्की, रशियन युवकांचेही अाधी याेगदान 
मुलांमधील इंग्रजीची भीती दूर व्हावी, त्यांना चांगले इंग्रजी बाेलता यावे यासाठी संस्थेच्या माध्यमातून दाेन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात अाहे. गेल्यावर्षी बहरीन, तुर्की अाणि रशियातील युवकांनी या शाळेत एक महिन्याचे प्रशिक्षण दिले हाेते. 
- ज्ञानेश्वर जाधव, संस्थापक, गुरुकुल शिक्षण संस्था 


अायसेकमार्फत हाेते हे कार्य 
विद्यार्थिदशेतच मुलांमध्ये नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व विकास होऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण व्हावी, त्यांना इंग्रजीत संवाद साधता यावे यासाठी 'ना नफा, ना ताेटा' या तत्त्वावर अायसेक उपक्रम राबवित आहे. पाश्चात्त्य देशातील तरुणाईला भारतीय संस्कृती, येथील परंपरा, सद्यस्थिती याचा अभ्यास करता यावा तसेच स्थानिक युवकांनाही पाश्चात्त्य देशातील संस्कृती आणि सद्यस्थितीचा अभ्यास करता यावा हादेखील अायसेकचा उद्देश अाहे. १२७ देशांत कार्यरत ही संघटना सामाजिक ग्लाेबल इंटर्नशिप अशा दाेन प्रकारांत अापले उपक्रम स्थानिक स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवित अाहे. या संघटनेत जागतिक स्तरावरील सुमारे एक लाख विद्यार्थी जाेडले गेले असून, ती जगातील सर्वात माेठी युवा संघटना ठरली अाहे. ही सामाजिक संस्था युनिसेफसोबत काम करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...