आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्योत्तर मूल्यव्यवस्थांच्या स्थित्यंतरांची मीमांसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऋषिकेश देशमुख  

श्रीकांत देशमुख यांची खरी ओळख कवी हीच आहे. आता ते ‘पिढीजात’ या कादंबरीच्या रूपाने वाचकांसमोर आले आहेत. कादंबरीचा पट हा व्यापक आहे. स्वातंत्र्योत्तर काळाने स्वीकारलेल्या भांडवली अर्थव्यवस्थेपासून ते जागतिकीकरणोत्तर काळाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थ व्यवस्थेपर्यंतचा असा मोठा कॅनव्हास तिच्यात आहे. ही कादंबरी भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील घडत गेलेल्या स्थित्यंतराचा चिकित्सक आढावा त्या स्थित्यंतरांच्या कार्यकारणभावासह घेत राहते.


कादंबरी साहित्याच्या सर्व प्रकारचं समुच्चय असतं. कादंबरी या एकाच वाड्मय प्रकारात कविता-कथा-ललित यांचा अद्भुत संयोग लेखकाला करता येतो आणि तो श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्या 'पिढीजात' या कादंबरीत फारच उत्कटपणे केला आहे. कवितेसाठी २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर आलेली कलाकृती म्हणून "पिढीजात' या कादंबरीचं वेगळं स्थान मराठी साहित्यात आहे.

"पिढीजात' म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा हक्काने हस्तांतरित झालेला वारसा. प्रथमदर्शनी पिढीजात या नावावरून त्या वारशाचे गौरवीकरण झालेले आहे की काय, असं वाटू शकतं. पण भारतात वेळोवेळी वेगवेगळी आक्रमणं झाली त्या आक्रमणात जे जेते होते त्या नव्या राज्यकर्त्यांनी त्यांना अनुकूल असणारी सर्वंकष शोषणकारी व्यवस्था इथे आकाराला आणली आणि त्याच सर्वंकष शोषणकारी व्यवस्थांचे पिढी दर पिढी कसे हस्तांतरण झाले आहे आणि त्यात सर्वसामान्य माणूस नेहमीच कसा पिचला गेला आहे याचे प्रतीक म्हणून "पिढीजात' हे शीर्षक मोठे बोलके आणि तेवढेच प्रत्ययकारी आहे. 

कादंबरीचा पट हा व्यापक आहे. स्वातंत्र्योत्तर काळाने स्वीकारलेल्या भांडवली अर्थव्यवस्थेपासून ते जागतिकीकरणोत्तर काळाने स्वीकारलेल्या खुल्या अर्थव्यवस्थेपर्यंतचा असा मोठा कॅनव्हास तिच्यात आहे. ही कादंबरी भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील घडत गेलेल्या स्थित्यंतराचा चिकित्सक आढावा त्या स्थित्यंतरांच्या कार्यकारणभावासह घेत राहते. आजपर्यंतच्या मराठीतल्या राजकीय कादंबऱ्यांत उच्चस्तरीय राजकारणातला अटळ नि अपरिहार्य अशा स्वरूपाचा सत्तासंघर्ष आलाय. सत्तालालसा केंद्रस्थानी असणाऱ्या त्या कादंबऱ्या राजकीय मूल्यऱ्हास ठळक करतात. तर पिढीजात ही कादंबरी उच्चस्तरीय राजकारणात सर्वसामान्य माणूस त्याच्याही नकळतपणे कसा भरडला जातो याचे चित्रण संदर्भासहित स्पष्ट करते. त्यामुळे ही कादंबरी केवळ राजकीय कादंबरी नाही तर ती सामाजिक व राजकीय या दोन्हींंच्या समांतर काठाने प्रवास करणारी, एकूण सर्व स्थित्यंतरांंमुळे बदलत जाणाऱ्या संदर्भांच्या आपल्या जगण्याच्या शक्यतांचा शोध घेणारी महत्त्वपूर्ण कलाकृती आहे. ही कादंबरी जरी मराठीत असली तरी तिचा शोध हा एकूण भारतीय लोकशाहीच्या पाना-मुळांचा आहे. स्व ते समष्टी असा तिचा मोठा प्रवास आहे.  भारतीय लोकशाही ही शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था व पत्रकारिता या चार स्तंभांवर आधारलेली आहे.पण या चारही स्तंभांना भ्रष्टाचार, धार्मिकता, जातीयता व असहिष्णुता यांची वाळवी लागली आहे आणि हे स्तंभ आतमधून पोखरून गेलेली आहेत हेच प्रखर वास्तव आहे. ती वाळवी सगळी व्यवस्था कशी खिळखिळी करत गेली, करत आहे याचा नेमका शोध श्रीकांत देशमुख यांनी आपल्या पिढीजात या कादंबरीच्या विस्तृत व व्यापक अवकाशात घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.  

तथागत गौतम बुद्ध म्हणतात, जो दुःखाला पाहतो, तो दुःखाच्या कारणाला, दुःखनाशाला आणि दुःखनाशाच्या मार्गालाही पाहतो.

तर एकूण आपल्या दुःखनाशाचा मार्ग शोधणे हीच प्रत्येक माणसांची तीव्र इच्छा राहिलेली आहे आणि तो त्यासाठीच प्रयत्नशील असतो. मात्र इथल्या व्यवस्था तुमच्या दुःखाची ओळखच तुम्हाला होणार नाही याची खबरदारी घेण्यात यशस्वी झालेल्या आहेत म्हणून संभ्रम निर्माण झालेला आहे. तुमच्या जगण्याचे प्रश्न तुम्हाला कळले की तुम्ही तेच सोडवत बसाल आणि त्यायोगे तुमची प्रगती रोखता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नांची ओळख न होऊ देता तुमच्या अस्मितेचा, भावनिकतेचा मुद्दा गोंजारत ठेवायचा, त्यात तुम्ही अडकलात की त्याच मुद्द्यांना प्रफुल्लित करायचं म्हणजे राज्य करायला ते मोकळे असा हिशेब असतो. हे सगळं अत्यंत शांत व संयमितपणे सुरू राहतं. त्यात सर्वसामान्य माणूस अधिकाधिक गुंतत राहतो. त्याला या सूत्रबद्ध चक्रव्यूहाची काहीच कल्पना असत नाही अशा संभ्रमाचा नेमका उलगडा श्रीकांत देशमुख यांनी "पिढीजात' या कादंबरीत केला आहे. जो आजच्या भारतीय समूह माणसाचं प्रातिनिधिक रूप म्हणून ठळकपणे दृग्गोचर होतो. 

"पिढीजात' ह्या कादंबरीचा नायक नवनाथ शेळके हा प्रशासन व्यवस्थेतील (वर्ग एकचा) एक महत्त्वाचा अधिकारी आहे. तो जिल्हा उपनिबंधक म्हणजे डीडीआर आहे. जो व्यवस्थेचा अपरिहार्य भाग असूनही अत्यंत धाडसाने त्यातील अनेक सूक्ष्मस्तरीय अशा अदृश्य वास्तवाला दृश्यमान करतो आणि त्यामुळेच या कथनाला प्रखर वास्तवाचा नैतिक आधार आहे.

नवनाथ शेळके ज्या जिल्ह्यात नोकरीला आहे त्या जिल्ह्यातील बंद पडलेल्या "पद्मश्री सहकारी साखर कारखान्याचा' अवसायक म्हणूनही त्याची नेमणूक केली जाते. ती जबाबदारी पार पाडताना त्याला टोकावर राजकीय सत्तासंघर्ष कसा असतो याचा अनुभव येतो. त्या राजकारणात निष्पाप कर्मचारी व शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी कशी होते हे पाहावं लागतं. जिल्ह्यात रावसाहेब आवटे व विद्यमान आमदार दयानंद शिंदे यांच्यात राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. दयानंद शिंदे कारखाना पुन्हा सुरू होणार नाही याची अत्यंत दक्षपणे खबरदारी घेतात. कारण कारखाना पुन्हा सुरू झाला तर कर्मचारी व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व त्यातून रावसाहेब आवटेचे वर्चस्व पुन्हा वाढेल. जे दयानंद शिंदेंना परवडणारे नाही. त्यामुळेच कारखाना बंद ठेवण्यास व बंद पडलेल्या कारखान्यामुळे जिल्ह्यातील जनतेला कसं आर्थिक व मानसिक त्रासातून जावं लागतं हे लोकांना पटवून देत त्या सगळ्यांना रावसाहेब आवटेच कसे जबाबदार आहेत हे सिद्ध करत स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घ्यायची असते. अर्थात आवटे हे तर या सगळ्यांना जबाबदार आहेत, यात शंकाच नाही. मात्र ज्या जनतेची अपार काळजी दयानंद शिंदे करतात त्यांनाही जनतेच्या आजच्या प्रश्नांचे भांडवल करत, लोकभावना तीव्र करत राहायचे आहे. ते प्रश्न तर सोडवायचे नाहीत. ते प्रश्न ज्वलंत व चिरंतन ठेवत शिंदेंना राजकीय स्वार्थ साधायचा आहे. त्या लोकप्रश्नाचं चिरंतनत्व दयानंद शिंदेंचे राजकीय भविष्य व जिल्ह्यावर आपली पकड मजबूत करण्याचं साधन आहे. राजकारणाच्या क्रूर खेळात जनता दोन्ही बाजूंनी कशी भरडली जाते, राजकारणात सर्वसामान्य माणसाला कसे वेठीस धरले जाते, त्याच्याही नकळतपणे तो कसा पिचला व पिडला जातो हे अदृश्य वास्तव पिढीजात समोर आणते. ज्याची कल्पनाही सर्वसामान्य माणसाला नसते. राजकारण हा केवळ सत्तासंघर्ष नसतो तर त्याला असे अनेक पदर असतात जे की आपल्या कुणालाच स्पष्टपणे दिसून येत नाहीत. मात्र त्याची तीव्र झळ सगळ्यांना अपरिहार्यपणे सहन करावी लागते. 

एकूण भारतीय प्रशासनाचा चेहरा मांडणे हा या कादंबरीचा मुख्य हेतू आहे. नायक सहकार क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे त्याबद्दल अधिक आलंय. सोबतच महसूल, ग्रामीण विकास, शिक्षण व पोलिस प्रशासन असे सगळे क्षेत्रही त्यातल्या जळजळीत वास्तवासह कादंबरीत आलेले आहे. नक्षलवादासारखे प्रश्नही आलेले आहेत. कादंबरीच्या मलपृष्ठावर असणारा मजकूर हा आदिवासी भागात लेखकाने ऐकलेल्या बंजारा प्रार्थना गीत ऐकल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आहे. ती केवळ प्रतिक्रिया नाही तर समूहासाठी मागितलेले ते पसायदान आहे. मूळ प्रश्नाकडे न जाता वरवरच्या सुधारणा करणे आणि सामान्यांची दिशाभूल करणे हा या व्यवस्थेचा स्थायीभाव आहे,  हे लेखकाला दर्शवायचे आहे. प्रशासन ही व्यवस्था भीती वाटावी अशी का निर्माण झाली? नववसाहतवाद असे तिचे रूप का झाले? दमनयंत्रणा हेच तिचे खरे रूप आहे का? असा प्रश्न आणि चिंतनस्वर ही कादंबरी प्रकर्षाने प्रकट करते.
 
"पिढीजात' ह्या कादंबरीतून भारतीय प्रशासकीय व्यवस्था आपल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणासह मराठी साहित्यात पहिल्यांदाच आली आहे. ह्या कादंबरीत तळपातळीवरचा, परिघाबाहेरचा माणूस केंद्रस्थानी आहे. तो कसा एकूण व्यवस्थेत कुठेच नाही आणि त्याशिवाय कुठलीच व्यवस्था कशी आकारालाही येत नाही. पण त्याला त्याची जाणीवच नसते, याची जाणीव करून देणारी आहे आणि त्यामुळेच ही कादंबरी एकाच वेळी सामाजिक व राजकीय कादंबरीचा कोलाज साकारण्यात यशस्वी झाली आहे  लेखक मूळचे कवी असल्यामुळे कथनाला काव्यमय गद्यता प्राप्त झालेली आहे. काही स्वगते वाचत असताना दीर्घ कविताच वाचतोय की काय, असंही वाटत राहतं. स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत झालेल्या अनेक दृश्य-अदृश्य स्थित्यंतरांची, कालबदलाचि त्यांच्या कार्यकारणभावांसह ही कादंबरी सखोल चिकित्सा करते आणि त्यामुळेच ती कालभान देणारी कलाकृती आहे, यात शंकाच नाही.
कादंबरी :  पिढीजात

लेखक :  श्रीकांत देशमुख

मुखपृष्ठ व अंतर्गत मांडणी :- चंद्रमोहन कुलकर्णी

प्रकाशक :  राजहंस प्रकाशन, पुणे.

किंमत :  ६००. पृष्ठे : ६०४

लेखकाचा संपर्क :- ९९२३०४५५५०